‘हेल्थ विथ आयुर्वेद’ उपक्रमाला आणखी एक मास मुदतवाढ
पणजी, ४ जून (वार्ता.) – राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालानुसार गोव्यातील मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. ही आपल्या राज्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. हे गंभीर आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे, तसेच आहारात साखर आणि तेल यांचे प्रमाण अल्प करणे, बाहेरचे अन्न आणि शीतपेय (‘सॉफ्ट ड्रींक्स) पिणे पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. आरोग्यदायी गोव्यासाठी आपण सर्वांनी आताच जागे होऊन प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका व्हिडिओद्वारे गोमंतकियांना हा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. मुख्यमंत्री सावंत हे स्वतः आयुर्वेद शाखेचे वैद्य आहेत.

ते पुढे म्हणाले, ‘‘गोव्यातील नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, तसेच मूत्रपिंड यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. सद्यःस्थितीत गोव्यात मधुमेहाचे प्रमाण २६.२ टक्के आहे, तर याची राष्ट्रीय सरासरी ११.४ टक्के इतकीच आहे. या खेरीज मधुमेहाच्या पूर्व टप्प्यावर (प्री-डायबिटीज) गोव्यातील २०.३ टक्के लोक आहेत, तर याची राष्ट्रीय सरासरी १५ टक्के आहे. उच्च रक्तदाबाचे गोव्यातील प्रमाण ४८.८ टक्के असून देशात हे प्रमाण ३५.५ टक्के आहे. गोव्यात लठ्ठपणाचे प्रमाण ४४.४ टक्के असून देशात ते २८ टक्के आहे. त्याचप्रमाणे वाढलेले पोट (सेंट्रल ओबेसिटी) असण्याचे गोव्यातील प्रमाण ५१.८ टक्के आहे, तर देशात हे प्रमाण ३.५ टक्के आहे. या गंभीर समस्येवर लोकांनी आतापासूनच योग्य कृती करण्यास प्रारंभ केला पाहिजे. सर्व वैद्यांनी (डॉक्टर, आयुर्वेदिक आणि इतर पॅथींचे वैद्य) या आजारांविषयी समाजात मोठ्या प्रमाणात जागृती करणे आवश्यक आहे. विशेषतः डॉक्टरांनी मधुमेह असणार्या रुग्णांना किडनीचे आजार होऊ नयेत, यासाठी कोणती काळजी घ्यावी, याचे योग्य मार्गदर्शन करावे. लहान मुलांसह सर्वांनीच बाहेरील प्रक्रियायुक्त अन्न (प्रोसेस्ड फूड) खाणे किंवा शीतपेय (‘सॉफ्ट ड्रींक्स) पिणे टाळले पाहिजे. यासमवेतच नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम करणे आवश्यक आहे. पूर्वी मूत्रपिंडाची ‘डायलिसिस’ करणारी यंत्रे केवळ दोन्ही जिल्हा रुग्णालये आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय येथेच उपलब्ध होती; मात्र ती आता राज्यातील ४० हून अधिक प्राथमिक आणि सामूहिक आरोग्य केंद्रे येथे बसवावी लागली आहेत. एका केंद्रात ४-५ ‘युनिट्स’ कार्यरत असूनही रुग्णांना ‘डायलिसिस’साठी प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे स्वत:ला किंवा स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांना ‘डायलिसिस’ करावे लागेल, अशी वेळच येऊ देऊ नका.’’
‘हेल्थ विथ आयुर्वेद’ उपक्रमाला आणखी एक मास मुदतवाढ
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘यापूर्वी राज्यात ५ मे ते ५ जून या कालावधीत ‘हेल्थ विथ आयुर्वेद’ (आयुर्वेदाच्या साहाय्याने निरोगी आरोग्य) या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील २० सहस्रांहून अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा यशस्वी लाभ घेतला आहे. लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून हा उपक्रम आता ५ जून ते ५ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. भविष्यात आजार होऊ नयेत; म्हणून आजच काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी स्वतःची दिनचर्या आणि ऋतुचर्या योग्य रितीने पाळावी.’’

‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा