मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !

डावीकडून श्री. महेश पाठक, ह.भ.प. श्री. दत्तात्रय चोरगे महाराज, श्री. सुनील घनवट, श्री. संजय ढेकणे, श्री. पराग गोखले

मंचर (जिल्हा पुणे) – महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ रहित करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने सोहमनगरी, मंचर (तालुका आंबेगाव) येथे मंदिर विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा संयोजक ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज यांनी मंदिर महासंघाने आतापर्यंत राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांनी सध्याच्या काळात मंदिरांवर होणारे आघात रोखण्यासाठी काळानुसार मंदिरांचे संघटन करणे आवश्यक असल्याचे उपस्थितांना सांगितले. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रस्तावित कायद्याच्या प्रावधानांची सविस्तर माहिती दिली. या वेळी मंचर येथील जनसेवक संजय थोरात, विश्वविक्रमी कीर्तनकार बाजीराव महाराज बांगर, तसेच लेण्याद्री देवस्थानाचे विश्वस्त अधिवक्ता संजय ढेकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.