‘म्हजे घर’ योजनेनंतर आता सरकारकडून ‘माझा फ्लॅट’ योजनेची घोषणा

 

पणजी, ४ जून (वार्ता.) – ‘म्हजे घर’ (माझे घर) योजनेच्या अंतर्गत मडगाव येथील रवींद्र भवनात सनद वितरण करण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘माझा फ्लॅट’ (माझी सदनिका) योजना चालू करण्याची घोषणा केली आहे. मडगाव येथील रवींद्र भवनात आयोजित कार्यक्रमात ‘म्हजे घर’ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना घराची आणि जागेची सनद अन् प्रमाणपत्र यांचे वाटप करण्यात आले. या वेळी सदानंद शेट तानावडे, सभापती गणेश गावकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, तसेच इतर आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘म्हजे घर’ ही योजना केवळ पात्र गोमंतकीय कुटुंबांसाठीच असून याद्वारे अवैध नव्हे, तर विविध कारणांमुळे कागदपत्रांअभावी रखडलेली अनियमित घरेच नियमित केली जात आहेत. लोकांच्या नावावर भूमी नसल्याने त्यांना वर्षानुवर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागत होता; परंतु सरकारने ‘माझे घर’ योजनेच्या अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या भूमी मूळ रहिवाशांच्या नावावर केल्या आहेत. ही योजना फसवी किंवा राजकीय लाभाची असल्याचा विरोधकांचा आरोप पूर्णपणे खोटा असून सरकारने दिलेली आश्वासने प्रामाणिकपणे पूर्ण केली आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या गैरसमजाला बळी पडू नये.’’

याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ‘माझा फ्लॅट’ योजनेची घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘गोव्यात सहस्रो सदनिकाधारकांना विविध कारणांमुळे मालकी हक्क मिळालेला नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र योजना आणली जाणार आहे.’’ या योजनेमुळे राज्यातील सहस्रो सदनिकाधारकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. यासंबंधी नियम आणि अटी निश्चित करण्याची प्रक्रिया चालू असून लवकरच या योजनेविषयी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीला काही महिने असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारने एका मोठ्या मतदारवर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.