‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !

पत्रकार परिषदेसाठी उपस्थित डावीकडून अविनाश भाले, सागर पाटील, विजय ससे, विष्णु सूर्यवंशी

      कोल्हापूर, ४ जून (वार्ता.) – ‘कोल्हापूर हायकर्स’ हे गेल्या १५ वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी विस्तारलेल्या स्वराज्याच्या भूमीवरून सह्याद्रीतील गडकोट, सप्तसिंधू नद्या, हिमशिखरे, देशभरातील ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळांवरून पवित्र जल संकलन करत आहेत. यंदाही दुर्गराज रायगड येथे ५ आणि ६ जून या दिवशी होत असलेल्या ‘३५२ व्या शिवराज्याभिषेक दिना’च्या निमित्ताने ‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहीम’ राबवण्यात आली. या मोहिमेद्वारे स्वराज्य, श्रद्धा, इतिहास, राष्ट्रभक्ती यांचा अद्वितीय संगम अनुभवण्यास मिळाला, अशी माहिती ‘कोल्हापूर हायकर्स’चे संस्थापक-अध्यक्ष श्री. सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी अविनाश भाले, विजय ससे, विष्णु सूर्यवंशी यांसह अन्य उपस्थित होते.

या वेळी पाठील म्हणाले…

१. यंदाच्या ‘पवित्र जल संकलन मोहिमे’त कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री नदी अशा नद्यांद्वारे, तसेच श्री क्षेत्र महाबळेश्वर, पंचंगगा मंदिर, जावळीच्या खोर्‍यातील प्रतापगड, तसेच हिमालयातील कुमाव पर्वत रागांमध्ये वसलेल्या भारत-नेपाळ-तिबेट(चीन) या सीमेवरील सुमारे १८ सहस्र ३०० फूट उंचीवरील लिपूलेख पास येथील पवित्र जल संकलन करण्यात आले.

२. या मोहिमेद्वारे आम्ही स्वराज्याच्या ऐतिहासिक परंपरेचे जतन, पवित्र नद्या आणि जलस्रोतांविषयी जनजागृती, पर्यावरण रक्षण आणि जलसंवर्धनाचा संदेश, इतिहास, अध्यात्म आणि निसर्गाचा सन्मान हा संदेश समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्नरत आहोत.