आमचा संयम संपत चालला आहे ! – Saudi Arabia

सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिंस फैसल

रियाध (सौदी अरेबिया) – अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाच्या २० व्या दिवसांनंतरही युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये एक तातडीची बैठक बोलावण्यात आल्यानंतर सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणला चेतावणी देत म्हटले की, आमचा संयम संपत चालला असून तुम्ही आमचे ऐकून घेतले पाहिजे. आम्ही प्रथम चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू; परंतु आवश्यकता भासल्यास सैनिकी कारवाई करण्यासही मागेपुढे पहाणार नाही. इराणने सौदी अरेबियातील समरेफ रिफायनरीला लक्ष्य करत त्यावर आक्रमण केले. या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने इराणला चेतावणी दिली आहे.

  • इराणमधील जगातील सर्वांत मोठ्या गॅस क्षेत्रावर आक्रमण

  • आता आखातातील तेल-गॅस तळांवर क्षेपणास्त्रे डागणार ! – इराणची चेतावणी

१८ मार्चला दक्षिण इराणमधील साऊथ पार्स गॅस क्षेत्र आणि असालुयेह शहरातील तेल-गॅस सुविधा येथे इस्रायलने हवाई आक्रमण केले. साऊथ पार्स हे जगातील सर्वांत मोठे नैसर्गिक वायूक्षेत्र मानले जाते. या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांमध्ये मोठ्या आक्रमणांची चेतावणी दिली आहे. इराणच्या रिव्हॉल्यूशनरी गार्डने लोकांना सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि कतार येथील प्रमुख तेल आणि गॅस ठिकाणांपासून दूर रहाण्यास सांगितले. या चेतावणीनंतर १९ मार्च या दिवशी इराणने सौदी अरेबियातील समरेफ रिफायनरीला लक्ष्य करत त्यावर आक्रमण केले.

कतारवरील आक्रमण सहन करणार नाही ! – ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

१८ मार्चच्या रात्री इराणने कतारमधील सर्वांत मोठ्या ‘रास लफान’ गॅस प्रकल्पावर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले. यानंतर तेथे आग लागली आणि मोठी हानी झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने आपत्कालीन पथके पाठवण्यात आली. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, इराणने मर्यादा ओलांडली आहे; कारण त्याने सामान्य नागरिक आणि महत्त्वाची ठिकाणे यांना लक्ष्य केले. अशा आक्रमणांमुळे संपूर्ण प्रदेशातील परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे सर्व देशांनी एकत्र येऊन तणाव अल्प करण्याचा आणि शांतता राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

संयुक्त अरब अमिरातला प्रतिदिन १० सहस्र कोटी रुपयांची हानी !

युद्धामुळे संयुक्त अरब अमिरातला प्रतिदिन १० सहस्र कोटी रुपयांची हानी होत आहे. ‘अल हबतूर ग्रुप’चे संस्थापक खलफ अहमद अल हबतूर यांनी ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आम्हाला युद्धात ढकलले’, अशी टीका केली.

इराणचे गुप्तचरमंत्री ठार

इराणचे गुप्तचरमंत्री इस्माईल खतीब

इराणचे गुप्तचरमंत्री इस्माईल खतीब हे इस्रायलच्या हवाई आक्रमणात ठार झाले आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी याला अधिकृतपणे दुजोरा दिला असून ‘ही एक भ्याड हत्या आहे’ अशी टीका त्यांनी केली.

संयुक्त अरब अमिरातमध्ये डिझेल भारतातील दरापेक्षा महाग

संयुक्त अरब अमिरात जगाला तेल विकतो; मात्र आता त्याच्याच देशात भारतातील दरापेक्षा डिझेल महाग झाले आहे. येथे एक लिटर डिझेलचे दर १०४ रुपये झाले आहे, तर भारतात देहलीमध्ये हाच दर ८७ रुपये आहे.  तेल उत्पादनात अमिरात जगात सातव्या क्रमांकावर आहे. येथे प्रतिदिन ४५ लाख बॅरल तेल उत्पादनाची क्षमता आहे.

चीनकडे जाणारी रशियाची तेल टँकर नौका भारताकडे वळली

रशियाची एक तेल टँकर नौका जी आधी चीनला जात होती, ती आता मार्ग पालटून भारतात येत आहे. ‘अक्वा टायटन’ नावाची ही नौका रशियाच्या बाल्टिक समुद्रातून तेल घेऊन निघाली होते आणि तिला चीनच्या रिझाओ बंदरावर जायचे होते; पण मार्चच्या मध्यात दक्षिण चीन समुद्रात पोचताच तिने तिचा मार्ग पालटला आणि आता ती २१ मार्च या दिशी मंगळुरू येथे पोचणार आहे. भारताने अचानक रशियाकडून तेल खरेदी वाढवल्याने ही नौका भारताच्या दिशेने वळली. भारताने एका आठवड्यात रशियाकडून अनुमाने ३ कोटी बॅरल तेल खरेदी केले. आतापर्यंत रशियाच्या ७ तेल टँकर नौकांनी भारताकडे मार्ग वळवल्याचे म्हटले आहे. इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत रशिया आता भारतासाठी एक मोठा तेल पुरवठादार बनत आहे आणि सध्या चीनपेक्षा भारताला अधिक प्राधान्य मिळत आहे.

भारताने इराणला पाठवले वैद्यकीय साहाय्य !

भारताने इराणी रेड क्रिसेंट सोसायटीला मानवतावादी साहाय्याचा पहिला टप्पा म्हणून जीवनरक्षक औषधे, शस्त्रक्रिया उपकरणे, वैद्यकीय किट आदी साहित्य पाठवले आहे.