पूर्वीचे भारताचे परराष्ट्र धोरण आणि सध्या भारत राबवत असलेले विदेश धोरण यांच्यामध्ये जनतेलाही लक्षात येण्यासारखा भेद दिसत आहे. परराष्ट्र धोरण किंवा परराष्ट्र विभाग काय काम करतो ? किंवा या विभागाची फारशी माहितीही भारतियांना नव्हती. भारतियांची आखाती देशांत निर्माण झालेल्या तणावातून सुटका करणे, कॅनडाने भारतीय राजदूताला तेथून हाकलल्यानंतर त्याच भाषेत कॅनडाला उत्तर देतांना भारतातील त्यांच्या राजदूताला हाकलणे, ‘जी २०’ परिषदेच्या वेळी संयुक्त घोषणापत्रावर पहिल्याच दिवशी सर्व देशांची सहमती घडवून आणणे, कतार या आखाती देशामध्ये ८ भारतियांना झालेली फाशीची शिक्षा रहित करून त्यांना सुखरूप मायदेशी आणणे, अमेरिकेच्या समवेत चालू असलेले करयुद्ध अशा अनेकविध प्रसंगी भारतियांनी परराष्ट्रनीतीची चुणूक अनुभवली.

१. हनुमान आणि कृष्ण यांच्या धोरणांचा संयोग

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात सांगितले होते, ‘देशाचे परराष्ट्र धोरण रामायण आणि महाभारत यांच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणजे ‘रामायणा’मध्ये हनुमानाने शत्रूशी वापरलेले धोरण आणि ‘महाभारता’त वापरलेली कृष्णनीती यांचा उपयोग आम्ही परराष्ट्राची धोरणे आखतांना किंवा निर्णय घेतांना करत आहोत. भारतीय स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या स्वार्थांध आणि देशविरोधी सत्ताकाळानंतर भारतात असे प्रथमच घडत आहे की, परराष्ट्र नीतीसाठी हिंदु धर्मग्रंथांतील शिकवणीचा आधार घेतला जात आहे. ‘भारताची परराष्ट्रनीती आणखी कठोर आणि वेगवान व्हावी’, असेच प्रत्येक भारतियाला वाटत असते.
२. जम्मू-काश्मीर प्रश्नावर अधिक कठोर व्हावे !
पाकिस्तान हा सातत्याने संयुक्त राष्ट्रांमध्ये जम्मू-काश्मीरविषयक विधाने करत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने ‘काश्मिरींना स्वयंनिर्णयाचा अधिकार देणे, काश्मीर प्रश्न सुटल्यास भारत-पाक तणाव निवळेल, काश्मीरमधील स्थानिकांवर अत्याचार होत आहे’, अशी वेगवेगळी विधाने पाक करत असतो. एका बाजूला काश्मीर प्रश्नाविषयी संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलायचे आणि दुसर्या बाजूला तेथे आतंकवादी कारवायाही चालू ठेवायच्या, तसेच ‘जगासमोर सातत्याने भारताशी चर्चा करण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत; मात्र भारत प्रतिकूल आहे’, असे चित्र निर्माण करायचे. यामुळे भारताची बाजू आक्रमकपणे मांडण्यासह पाकवर प्रत्यक्ष कारवाई करणेही आवश्यक आहे. खरेतर भारतानेच पुढाकार घेऊन पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेवर पाकिस्तान कशा प्रकारे अत्याचार आहे, तेथे कशी अराजकाची स्थिती आहे’, ते मांडत रहाणे आवश्यक आहे, म्हणजेच काश्मीर प्रश्नावर अधिक कठोर आणि आक्रमक होण्याची आवश्यकता आहे.
भारताकडे ‘जागतिक शक्ती’ म्हणून पहाण्यास भाग पाडावे !

‘जागतिक संघर्षाच्या काळात (उदा. रशिया-युक्रेन किंवा आखाती देश) भारताने ‘शांततादूत’ म्हणून स्वतःची भूमिका स्पष्ट आणि सक्रीय करणे, तसेच जगाला भारताकडे केवळ एक बाजारपेठ म्हणून नाही’, तर एक ‘उत्तरदायी जागतिक शक्ती’ म्हणून पहाण्यास भाग पाडणे आवश्यक आहे. इस्रायल आणि हमास संघर्षाच्या वेळी भारताने पॅलेस्टाईनच्या सार्वभौमत्वाचा विषय सांगितला, तरी हमासच्या आतंकवाद्यांना आश्रय देण्याविषयीच्या सूत्रावर भारताने कठोर निषेध का केला नाही ? जे देश आतंकवादाविरुद्ध कठोर आणि कायमस्वरूपी कारवाई करत आहेत, त्यांना भारताने पाठिंबा द्यायला हवा. केवळ जागतिक स्तरावर स्वत:ची संतुलित, शांततावादी छबी राखण्याला अशा वेळी अर्थ रहात नाही. जे अयोग्य आहे, ते ‘अयोग्य’ म्हणण्याचे धाडस भारताने दाखवायला हवे !
– श्री. यज्ञेश सावंत
३. बांगलादेशाला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कारवाईची चेतावणी

बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर प्रतिदिन अत्याचार होत असल्याच्या घटना घडत असतात. सामूहिकरित्या हिंदूंना ठार करणे, हिंदु तरुणी-महिलांवर सामूहिक अत्याचार करणे, क्षुल्लक कारणांवरून हिंदूंच्या हत्या करणे असे प्रकार होत आहेत. पाक, तसेच बांगलादेश येथील हिंदूंवर अत्याचार होत असल्यामुळे त्यांना भारतात आश्रय देण्यासाठी केंद्रशासनाने कायदे केले आहेत; मात्र त्याला केवळ कायदे करून भारतात वसवणे, हे उत्तर नसून हिंदूंवरील प्रत्येक अत्याचाराच्या वेळी कठोर शब्दांत निषेध करून वेळप्रसंगी कारवाईची चेतावणी देणे वा प्रत्यक्ष कारवाई करणे आवश्यक आहे. बांगलादेश आणि शत्रूदेश पाकिस्तान कठोर निषेधाला तेवढा बधणार नसला, तरी सध्याच्या गुळमुळीत उत्तर देण्याच्या पद्धतीमुळे हिंदु समाजाचा आत्मविश्वास मात्र नक्की उणावतो. बांगलादेशावर कारवाई करण्याच्या मानसिकतेत सध्या रहाता आले नाही, तरी गंभीर परिणामांची चेतावणी, प्रसंगी मुत्सद्देगिरीने त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याची भूमिका भारताने सतत घेत राहिली पाहिजे.
४. चीनच्या अरुणाचल प्रदेशावरील दाव्यावर प्रत्युत्तर हवे !
भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये जर भारताचे पंतप्रधान गेले वा केंद्र सरकारने तेथे काही कार्यक्रम आयोजित केला, तर चीनचा तीळपापड होतो आणि तो निषेध करतो. खरेतर आधीच चीनने भारताचा अक्साई चीन, शक्सगाम व्हॅली हा एकूण ४३ सहस्र १८० चौरस कि.मी.हून अधिक भूभाग गिळंकृत केला आहे, तरीही त्याविषयी काही बोलणे तर दूरच; पण चीन भारताच्या अविभाज्य भूभागावर दावा सांगत आहे. भारत केवळ पोकळ निषेध करण्याच्या पलीकडे काही करत नाही. आता भारतानेही चीनचे तिबेट, हाँगकाँग आणि तैवान या बोचर्या भागावर बोलणे आवश्यक आहे. तिबेटमधील लोकांना स्वायत्तता देणे, हाँगकाँगवरील चीनचे नियंत्रण अमान्य करणे आणि तैवान स्वतंत्र राष्ट्र म्हणून पाठिंबा देणे, अशा सूत्रांवर भारताने चीनला सुनावत रहायला हवे. सर्वच भारतियांसाठी अत्यंत पवित्र आणि भगवान शिवाचे निवासस्थान कैलास पर्वत अन् मानसरोवर तिबेटमध्येच आहे. त्यामुळे तिबेटवरील चीनच्या अवैध नियंत्रणाविरुद्ध भारताने आवाज उठवावा.
जागतिक नेतृत्व बनण्यासाठी पावले उचलावीत !

भारताचा समावेश विकसनशील देशांमध्ये आहे, म्हणजे पाश्चात्त्यांच्या दृष्टीने भारत विकसनशील, तर युरोप, अमेरिका हे विकसित देश आहेत. भारतात गरिबी, बेरोजगारी, झोपडपट्ट्या इत्यादींकडे बोट दाखवून ‘विकसनशील’ म्हटले जाते; मात्र देशातील या समस्यांसाठी भारतावर आजवर राज्य करणारे शासनकर्ते उत्तरदायी आहेत. भारताचा जो भाग दाखवला जात नाही, तो म्हणजे अफाट आध्यात्मिक संपदा, ज्ञानभांडार, भारताची मूल्ये, संस्कार, प्राचीन शास्त्रे इत्यादी कुठल्याही देशाकडे नाहीत. भारताच्या या अमूल्य ठेव्याविषयी जागतिक स्तरावर विषय मांडून ‘भारत हे प्राचीन वैभवसंपन्न आणि ज्ञानसंपन्न राष्ट्र आहे. भारताकडे असलेले शास्त्रज्ञान जगात कुणाकडेही नाही, भारतच सर्व शास्त्रे अन् तंत्रज्ञान यांचा उगम आहे. मानवाच्या खर्या विकासाचा (आध्यात्मिक उन्नतीचा) परमोच्च मार्ग आणि आदर्श भारताकडेच आहे’, हे सांगावे लागेल. ‘जागतिक समस्यांचे उत्तर केवळ भारताकडेच आहे’, हे जगाला पटवून द्यावे लागेल. आफ्रिकी, लॅटिन अमेरिकन आणि आशियाई देशांच्या समस्या जागतिक व्यासपिठावर मांडत रहाणे, तसेच या देशांचा आवाज बनून भारताने स्वतःचे जागतिक स्थान अधिक भक्कम करणे आवश्यक आहे.
– श्री. यज्ञेश सावंत
५. श्रीलंकेला धाकात ठेवणे
श्रीलंका आणि त्या खालोखाल पाकिस्तान भारतीय मासेमारांना हद्द चुकवल्यावरून अनेक वेळा अटक करतात. ज्या श्रीलंकेला भारत मोठ्या प्रमाणात साहाय्य करतो, ती श्रीलंका भारतीय मासेमार, तेथील सिंहली हिंदू यांच्यावर दादागिरी करते. चीनच्या हेरगिरी करणार्या नौका, पाणबुड्या स्वत:च्या बंदरांत लावण्यास अनुमती देते, त्या श्रीलंकेला धाकात ठेवणे आवश्यक आहे. भारत सरकारचे धोरण शेजारी देशांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा पुरस्कार आणि त्यांच्याशी चांगले संबंध ठेवणे असले, तरी जेव्हा शेजारी देश भारतविरोधी भूमिका घेतील, तेव्हा कठोर पावले उचलून त्यांना भारताच्या शक्तीची चुणूक दाखवणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी भारताला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; मात्र भारतीय गुप्तचरांनी कसब दाखवत शेजारील देशांमध्ये जाऊन हे चक्रव्यूह भेदून देशाला मोकळे केले. त्यामुळे आता परराष्ट्र विभागाचे खरे दायित्व आहे की, भारताच्या शेजारी देशांमध्ये भारताचे शक्तीशाली स्थान अधोरेखित होईल.
६. खलिस्तान्यांना संरक्षण देणार्यांवर डोळे वटारावेत !

कॅनडात खलिस्तानी चळवळ वाढण्यासाठी मोकळे वातावरण आणि सुविधा यापूर्वीच्या सरकारने उपलब्ध करून दिल्या. खलिस्तानी आतंकवादी कधी कॅनडामधून, तर आता अमेरिकेतून ‘भारताचे विमान बाँबने उडवू, भारताच्या अमुक शहरात बाँबस्फोट घडवून आणू, भारताला उद्ध्वस्त करू’, अशा धमक्या देतात आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांना कामाला लावतात. खलिस्तानवाद्यांना आश्रय देणार्या देशांना भारताने उघडे पाडावे. त्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपिठाचा उपयोग करावा. खलिस्तानवाद्यांना भारताच्या कह्यात देण्याची मागणी लावून धरावी. भारत आणि भारतियांची सुरक्षा हेच सर्वाेच्च प्राधान्य ठरवून प्रसंगी संबंधित देशांना व्यापार, संरक्षण आणि सहकार्य अशा ठिकाणी जिथे जमेल तेथे कोंडीत पकडावे.
भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी जागा मागावी !

‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद’ म्हणजे अमेरिकेच्या हातचे बाहुले झाली आहे. या परिषदेसाठी अमेरिकाच अधिक देणगी देते. प्रत्यक्षातही ही परिषद सध्या विविध देशांमध्ये चालू असलेल्या संघर्षाच्या काळात कुचकामी ठरत असून तिचा फोलपणा भारताने उघड केलाच पाहिजे. तिच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, तसेच भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवण्यासाठी आक्रमक आणि सातत्यपूर्ण मुत्सद्देगिरीचा संकल्प करणे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सदस्यत्व न मिळाल्यास भारताने पुढाकार घेऊन नवीन सुरक्षा परिषदेची घोषणा करावी आणि त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जागतिक शक्तींना करावे अन् भारत हे सहज करू शकतो.
– श्री. यज्ञेश सावंत
७. मालदीवला निर्णायक समज द्यावी !
मालदीवसारखा छोटासा देश ज्याची अर्थव्यवस्थाच भारतीय पर्यटकांवर अवलंबून आहे, तो भारताकडे डोळे वटारून पहातो आणि धमकावतो. ‘हे भारताच्या परराष्ट्रनीतीचे अपयश आहे’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? अशा छोट्या देशांना भारताने निर्णायक समज देऊन कारवाईची चेतावणी द्यावी. छोटे देश भारताला ललकारू लागले, तर ‘भारताचा कमकुवतपणा’ या दृष्टीने जग पहाते. त्यामुळे मालदीवला आर्थिक बहिष्कारासह थेट सैन्य कारवाईची चेतावणी द्यावी.
८. ‘ओआयसी’ला तंबी

जगातील ५७ मुसलमान देशांची संघटना असलेली ‘ओआयसी’, म्हणजे ‘इस्लामी सहकार्य संघटना’ ही भारतात दंगल झाली किंवा काश्मीरविषयक काही घडामोड घडली, तर भारतात नाक खुपसते. भारताचा निषेध वगैरे करण्याचे धाडस करते. पाक या संघटनेद्वारे ‘इस्लामी नाटो’ उभारण्याचा प्रयत्न करत आहे. ‘ओआयसी’ला तंबी देण्यासह ‘चीनमधील उघूर मुसलमानांवरील अत्याचार, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाकडून इराण आणि अन्य मुसलमान देशांवर थेट आक्रमण होतांना ही संघटना काही बोलत नाही’, हा भाग जोरदारपणे मांडायला हवा. यासह या संघटनेचा कुचकामीपणा आणि अस्तित्व यांविषयी जगात प्रश्न निर्माण करणे आवश्यक आहे.
गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ दिवस आहे. त्यामुळे भारताने स्वत:च्या प्राचीन काळात डोकावून, तसेच दैवी शक्तींचे जागरण करून जगाला स्वत:च्या आध्यात्मिक नेतृत्वाने बांधण्याचा आणि जगात स्वतःच्या मुत्सद्देगिरीचा डंका वाजवण्याचा संकल्प करावा !
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
India Slams Bangladesh : अल्पसंख्यांकांवरील अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही !
Indus Water Treaty Crisis : सिंधू जल वाटप करारावरून पाकने काश्मीरमधील सीमेवर तैनात केले ३५ ड्रोनविरोधी युनिट !