Iran War : नेतान्याहू यांच्यासमवेत चर्चा करून युद्ध संपवण्याचा निर्णय घेऊ ! – डॉनल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

नवी देहली / तेहरान (इराण) / पॅरिस (फ्रान्स) / वॉशिंग्टन (अमेरिका) – आखाती देशांत गेल्या १० दिवसांपासून चालू असलेल्या युद्धामुळे जगभरात चिंता वाढली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, जर मी आणि नेतान्याहू नसतो, तर इराणने इस्रायलला पूर्णपणे उद्ध्वस्त केले असते. इराण इस्रायल आणि आसपासच्या देशांना नष्ट करण्याच्या सिद्धतेत होता. आम्ही एकत्रितपणे काम केले आणि त्या देशाला थांबवले. हे युद्ध संपवण्याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन; मात्र सर्व गोष्टींचा विचार केला जाईल. याचा अर्थ असा की, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू त्यांचे मत मांडतील; परंतु अंतिम निर्णय माझाच असेल.

तेलाच्या किमती वाढणे जगाच्या शांततेसाठी लहान किंमत !

‘एक्स’वरील एका संदेशात ट्रम्प यांनी म्हटले की, इराणच्या अण्वस्त्रांचा धोका पूर्णपणे संपल्यानंतर तेलाच्या किमती लवकरच अल्प होतील. सध्या काही काळासाठी तेलाच्या किमती वाढल्या, तरी ती अमेरिका आणि जग यांच्या सुरक्षिततेसाठी एक लहान किंमत आहे. ज्यांना याविषयी वेगळे वाटते, ते मूर्ख आहेत, असेही त्यांनी म्हटले.

भारत सरकार युद्धाच्या वाढत्या तणावावर खूप गंभीर ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे राज्यसभेत निवेदन

युद्धामुळे आखाती आणि मध्यपूर्व देशांत अडकलेले भारतीय, तसेच ऊर्जा संकट या समस्यांवरून राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ केला. त्याच वेळी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी युद्ध परिस्थितीवर राज्यसभेत विधान केले. त्यांनी सांगितले की, सरकार या प्रदेशातील वाढत्या तणावावर खूप गंभीर आहे. भारताने २० फेब्रुवारी या दिवशी एक निवेदन प्रसारित करून चिंता व्यक्त केली आणि सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.

परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. संबंधित मंत्रालये योग्य पावले उचलण्यासाठी समन्वयाने काम करत आहेत. हा वाद भारतासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. आखाती देशांमध्ये सुमारे १ कोटी भारतीय रहातात. सहस्रो भारतीय विद्यार्थी आणि कामगार इराणमध्येही आहेत.

२. हा प्रदेश भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे; कारण तो तेल आणि वायू यांचा प्रमुख पुरवठादार आहे. पुरवठा साखळीतील व्यत्यय हे एक गंभीर सूत्र आहे. वाद सतत वाढत आहे, ज्यामुळे परिसरातील सुरक्षा परिस्थिती बिघडली आहे. याचा सामान्य जीवन आणि काम यांवर परिणाम होत आहे. या संकटात भारताने २ खलाशी गमावले आहेत आणि एक खलाशी अजूनही बेपत्ता आहे.

३. तेहरानमधील भारतीय दूतावास भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यास साहाय्य करत आहे. दूतावास पूर्णपणे सक्रीय आणि उच्च सतर्कता यांवर काम करत आहे. इराणमधील भारतीय व्यावसायिकांना आर्मेनियामार्गे भारतात परतण्यासाठी साहाय्य करण्यात आले आहे. आतापर्यंत अंदाजे ६७ सहस्र भारतीय नागरिकांनी परतण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आहे. सरकार भारतियांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

४. सध्या वरिष्ठ इराणी नेत्यांशी संपर्क साधणे कठीण आहे. तथापि इराणी परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे आभार मानले. भारताने मानवतेच्या कारणास्तव इराणी युद्धनौका ‘लावन’ला कोची बंदरात थांबण्याची अनुमती दिली होती, ज्याबद्दल इराणने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आक्रमणात इराणचे नवे सर्वाेच्च धार्मिक नेते मोजतबा खामेनी घायाळ ! – इस्रायलचा दावा

मोजतबा खामेनी

इस्रायली सुरक्षा अधिकार्‍यांच्या मते, इस्रायलच्या आक्रमणात मारले गेलेले  इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी इस्रायलने केलेल्या हवाई आक्रमणात गंभीररित्या घायाळ झाले आहेत.

यापूर्वी ‘इराण इंटरनॅशनल’ या वृत्तवाहिनीने दावा केला होता की, मोजतबा यांची त्यांच्या वडिलांचे उत्तराधिकारी म्हणजेच इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’ने निवड केली आहे.

आमच्या मान्यतेविना ठरवलेला नेता अधिक काळ टिकणार नाही ! – ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाला ‘अस्वीकारार्ह’ म्हटले आहे. ‘जर नव्या नेत्याला आमच्याकडून मान्यता मिळाली नाही, तर तो अधिक काळ टिकणार नाही’, अशी चेतावणी ट्रम्प यांनी दिली आहे. अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इस्रायल आणि अमेरिका यांच्या अनुमतीविना सर्वाेच्च नेते म्हणून निवडून येणार्‍या कुणालाही शोधून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

युद्धामागे इराणचे तेल साठेच ! – अमेरिकेच्या खासदारानेच केला दावा

अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्रॅहम

इराणवर करण्यात आलेली सैनिकी कारवाई केवळ अण्वस्त्रे रोखण्यासाठी नाही. अमेरिकेचे लक्ष्य इराणच्या नैसर्गिक संसाधनांवर, विशेषतः कच्च्या तेलाच्या अफाट साठ्यांवर आहे. ज्याप्रमाणे आम्ही व्हेनेझुएलामध्ये हस्तक्षेप करून तेथील तेल क्षेत्रावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रकार इराणमध्येही होण्याची शक्यता आहे, असे विधान अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्रॅहम यांनीच केले असून यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

फ्रान्स युद्धात अजिबात सहभागी होणार नाही ! – राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ‘इन्स्टाग्राम’वर युद्ध टाळण्याची विनंती करणार्‍या एका तरुणीला उत्तर देतांना म्हटले की, ‘मी तुमची चिंता समजतो आणि हे स्पष्ट करू इच्छितो की, ‘फ्रान्स युद्धात अजिबात सहभागी होणार नाही.’ दुसरीकडे अबू धाबी येथील फ्रान्सच्या नौदल तळावर ड्रोन आक्रमण झाल्यानंतर फ्रान्सने राफेल लढाऊ विमान आणि विमानवाहू युद्धनौका ‘चार्ल्स डी गॉल’ हिला भूमध्य समुद्रात पाठवले आहे.

आम्हाला युद्धात सहभागी व्हायचे नाही ! – इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी इराणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांपासून बचाव करण्यासाठी पर्शियन आखाती देशांमध्ये हवाई संरक्षण दल तैनात करण्यास सहमती दर्शवली आहे. अमेरिकी विमानांना तेथील इटलीचे तळ वापरण्याची अनुमतीही दिली आहे; मात्र थेट युद्धात सहभागी होणार नसल्याचेही मेलोनी यांनी घोषित केले आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्यांचे कुणीही पालन करत नाही ! – रशिया

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह आणि ‘क्रेमलिन’चे (रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाचे) प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी युद्धावर बोलतांना सांगितले की, आंतरराष्ट्रीय कायदा कायदेशीररित्या अस्तित्वात तर आहे; परंतु प्रत्यक्षात तो कार्यरत नाही. तो पूर्णपणे धोक्यात आहे. आम्ही कुणालाही आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्यास सांगू शकत नाही; परंतु कोणत्या कायद्याचे पालन करावे ? आज कुणीही हे स्पष्टपणे स्पष्ट करू शकत नाही.

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या खाली आहेत इंटरनेटच्या ‘सबमरीन फायबर ऑप्टिक केबल्स’ !

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक करण्यावर बंदी आली आहे. या सामुद्रधुनीचा वापर इंटरनेट सुविधेसाठीही करण्यात येतो. या समुद्राच्या खाली ‘सबमरीन फायबर ऑप्टिक केबल्स’चे जाळे पसरले आहे. यांमुळे जगभरातील इंटरनेट डेटा एका देशातून दुसर्‍या देशात पोचतो. तज्ञांच्या मते, जर या क्षेत्रात संघर्ष किंवा कोणत्याही प्रकारची अडचण आली, तर त्याचा परिणाम केवळ तेल बाजारावरच नाही, तर इंटरनेट सेवांवरही होऊ शकतो.

भारताच्या पश्चिम दिशेला जाणार्‍या ‘इंटरनेट ट्रॅफिक’चा जवळजवळ एक-तृतीयांश भाग या क्षेत्रातून जातो. याचा अर्थ असा की, भारतातून परदेशात जाणारा मोठा डेटा ट्रॅफिक याच मार्गावर अवलंबून आहे. हा डेटा ट्रॅफिक आपल्या महत्त्वाच्या आवश्यकता पूर्ण करण्यात साहाय्य करतो. यामध्ये ‘क्लाऊड कॉम्प्यूटिंग प्लॅटफॉर्म’, ‘आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय जाळे’, ‘बहुराष्ट्रीय आस्थापनांचे डिजिटल ऑपरेशन्स’, सामाजिक माध्यमे आणि स्ट्रीमिंग सेवा यांचा समावेश आहे.

तेहरानमध्ये पडला ‘काळा विषारी पाऊस’ !

इस्रायलने इराणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर केलेल्या भीषण आक्रमणांनंतर इराणची राजधानी तेहरानमध्ये ‘काळा विषारी पाऊस’ पडल्याची घटना घडली आहे. या प्रदूषणामुळे शहरात आरोग्य आणि पर्यावरण यांची आणीबाणी निर्माण झाली आहे.

इस्रायली आक्रमणाने इराणचे मोठे तेल साठे आणि शुद्धीकरण प्रकल्प जळून राख झाले. या आगीतून निर्माण झालेला प्रचंड काळा धूर, राख आणि घातक रसायने आकाशात ढगांमध्ये मिसळली गेली. जेव्हा तेहरानमध्ये पाऊस झाला, तेव्हा हा पाऊस काळ्या रंगाचा आणि चिकट स्वरूपाचा होता. यात मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बन्स आणि विषारी कण असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. या विषारी पावसामुळे तेहरानमधील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेचे विकार जडणार आहेत. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि शेतीचीही मोठी हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

युद्धामुळे केवळ जीवितहानी होत नाही, तर निसर्गाचाही मोठा र्‍हास होत असल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे. तेहरानमधील हा काळा पाऊस म्हणजे जागतिक पर्यावरणासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

आमच्यावर २३४ क्षेपणास्त्रे आणि ४२२ ड्रोन डागण्यात आले ! – कुवेत

कुवेतने सांगितले की, गेल्या ९ दिवसांत आमच्यावर २३४ क्षेपणास्त्रे आणि ४२२ ड्रोन डागण्यात आले आहेत. ही माहिती कुवेतच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

इराणमध्ये आतापर्यंत १० सहस्र सार्वजनिक इमारती उद्ध्वस्त

इराणची साहाय्य संस्था ‘इराणी रेड क्रेसेंट सोसायटी’ने म्हटले आहे की, अमेरिका आणि इस्रायल यांनी आमच्यावर केलेल्या आक्रमणांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. संस्थेच्या मते, आतापर्यंत ९ सहस्र ६६९ नागरी इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच ७ सहस्र ९४३ निवासी इमारती आणि १ सहस्र ६१७ व्यावसायिक इमारतीही नष्ट झाल्या आहेत.

तुर्कीयेने उत्तर सायप्रसमध्ये ‘एफ्-१६’ लढाऊ विमाने आणि हवाई संरक्षण प्रणाली तैनात केली

तुर्कीयेच्या संरक्षण मंत्रालयाने घोषणा केली आहे की, त्यांनी तुर्कीयेचे प्रजासत्ताक असलेल्या उत्तर सायप्रसमध्ये ६ ‘एफ्-१६’ लढाऊ विमाने आणि हवाई संरक्षण प्रणाली तैनात केली आहे. पालटत्या परिस्थिती आणि आवश्यकता पहाता अतिरिक्त पावले उचलली जातील.

इराणवरील आक्रमण थांबवण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये निदर्शने

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात निदर्शने करणार्‍यांनी अमेरिका आणि इस्रायल यांच्या  इराणवरील आक्रमणांचा विरोध केला. त्यांनी ही आक्रमणे, तसेच युद्ध त्वरित थांबवण्याची मागणी केली.