हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !

मुख्य कार्यकारी अधिकारी पोलिसांच्या कह्यात !

पुणे – हिंजवडी येथील राजीव गांधी ‘आयटी पार्क’ (माहिती तंत्रज्ञान आस्थापनांसाठी सिद्ध केलेला विशेष परिसर) मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापनाने रातोरात कार्यालय बंद केले. त्यामुळे आस्थापनात काम करणारे ७०० अभियंते एका रात्रीत बेरोजगार झाले. पोलिसांनी आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल ठाकरे यांच्यावर कारवाई करून त्यांना कह्यात घेतले. आस्थापनातील कर्मचार्‍यांनी फसवणुकीची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली. पोलिसांनी मनुष्यबळ प्रमुख आणि व्यवस्थापन यांच्यावरही गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी आणखी कुणाचा समावेश होता का ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.

व्यवस्थापनाने मागील वर्षभरात नवीन आणि प्रशिक्षणार्थी उमेदवारांना नोकरी दिली. काही महिने आस्थापनाचे काम सुरळीत चालू होते; मात्र फेब्रुवारीपासून परिस्थिती पालटण्यास आरंभ झाला. कर्मचार्‍यांच्या वेतनाला विलंब झाला. त्यामुळे कर्मचार्‍यांनी ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ संघटनेकडे म्हणणे मांडले. त्यानंतर फोरमच्या पुढाकाराने पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली. आस्थापन बंद केल्याने कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. कामगार आयुक्तालयाने या संपूर्ण प्रकरणाची नोंद घेतली आहे. पोलीस करत असलेल्या कारवाईच्या आधारे कामगार आयुक्त पुढील कारवाई करतील, अशी माहिती साहाय्यक कामगार आयुक्त एस्.टी. शिर्के यांनी दिली.

संपादकीय भूमिका

कर्मचार्‍यांच्या आर्थिक हानीला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !