बसस्थानके आणि बसगाड्या यांची प्रत्येक ४ घंट्यांनी स्वच्छता होणार ! – परिवहनमंत्री

  • पर्यावरणदिनानिमित्त राज्यात ‘अत्याधुनिक स्वच्छता मोहिमे’चा शुभारंभ !

  • परिवहन विभागाचा स्तुत्यपूर्ण उपक्रम !

  • प्रवाशांनीही या मोहिमेत हातभार लावून स्वच्छता टिकवून ठेवून परिवहन विभागाला सहकार्य करावे !

परळ बसस्थानक येथे ‘राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमे’चा परिवहनमंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई – जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ‘राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमे’चा शुभारंभ परळ बसस्थानक येथे परिवहनमंत्री तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाला. ‘या उपक्रमामुळे राज्यातील बसस्थानके, बसगाड्या, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे अधिक स्वच्छ, सुंदर अन् प्रवासी-अनुकूल करण्याचा महामंडळाचा संकल्प आहे. बसगाड्या, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे यांची प्रत्येकी ४ घंट्यांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे’, असेही त्यांनी सांगितले. राज्यभरातील प्रमुख बसस्थानके आणि त्यांचा परिसर स्वच्छ करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक स्वच्छता उपकरणे वापरली जातील.