मोरगाव (पुणे) येथे ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ आदर्श माता-पित्यांचा सत्कार !

सत्कार झालेले माता-पिता

मोरगाव (जिल्हा पुणे) – मानवी जीवनातील ‘श्री गुरूंचे स्थान’ हे अनन्यसाधारण आहे. मुलांच्या जीवनात त्यांचे आई-वडील हे त्यांचे प्रथम गुरु आणि मार्गदर्शक असतात. मुलांच्या बालपणापासून त्यांचा त्याग, कष्ट, संघर्ष, समर्पण आणि त्यांच्या संस्कारांना कृतज्ञतापूर्वक वंदन करण्यासाठी ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ माता-पित्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन मोरगाव येथे करण्यात आले होते.

स्वत:च्या पाल्यांना योग्य संस्कार आणि शिक्षण देऊन समाजात मानाचे स्थान मिळवून देणार्‍या ३३ पालकांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फेटा, शेला, श्रीफळ, हार आणि पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. पाल्यांचाही शाल, श्रीफळ आणि हार देऊन सत्कार करण्यात आला. ‘माता-पित्यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे’, असे मनोगत उपस्थित माता-पित्यांनी या वेळी व्यक्त केले. प्रसिद्ध तंतूवादक श्री. सुहास काटदरे आणि सौ. काटदरे, श्री. रवीदादा कसरेकर (प.पू. भक्तराज महाराज यांचे धाकटे पुत्र), डॉ. तुषार दाते (अस्थिरोग शल्यचिकित्सक), श्री. अजित देशपांडे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या ३३ माता-पित्यांचा परिचय श्री. तुळशीराम पिसाळ यांनी उपस्थितांना करून दिला.

या कार्यक्रमाला प.पू. भक्तराज महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र पू. नंदूदादा कसरेकर आणि ‘हरि ॐ तत्सत्’ परिवाराचे प्रेरणास्थान अन् मार्गदर्शक सद्गुरु श्रीराम दाते (काका) यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ‘आई-वडिलांचा सन्मान होणारे घर हे मंदिरासमान असते’, असे मत पू. नंदूदादांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात मांडले. सूत्रसंचालन डॉ. सागर विद्वांस यांनी केले. श्री. दिलीप दळवी (सर) यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता डॉ. अंकुश पवार यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली.