‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड (डावीकडे), तसेच माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड


कोल्हापूर, ५ जून (वार्ता.) –
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’तील पहिल्या टप्प्यातील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यात अंतर्गत परिसरातील ५ एकर भूमीचा समावेश आहे. यानंतर उर्वरित बाहेरील ५ एकर जागेचे सर्वेक्षण करण्यात येईल. मंदिर परिसरात ज्या लोकांच्या भूमी, जागा बाधित होणार आहेत त्यांची मागणी काय आहे ते समजून घ्यावे लागेल, तसेच या संदर्भातील प्रस्ताव सिद्ध करून पुढील प्रक्रिया करावी लागेल, अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ‘‘महाद्वाररस्ता ते शेतकरी संघ या परिघाचा विचार केल्यास एकूण १० एकर जागा आहे. या परिसराच्या भूसंपादनासाठी किती व्यय येणार ? हे पाहिले जाणार आहे. त्यानंतर जागेचे मूल्यांकन करण्यात येणार असून पुढे एक समिती गठित करण्यात येईल. या समितीपुढे व्ययाची माहिती सादर करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.’’

जुलैपर्यंत कोल्हापूर महापालिकेसाठी १०० ‘ई-बस’ येणार ! – डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त

या प्रसंगी कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड म्हणाले, ‘‘महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी वाहनतळासाठी आम्ही जागा शोधत आहोत. श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात भव्य असे भूमीखाली असणारे वाहनतळ आम्ही सिद्ध करत आहोत. जिथे २०० पेक्षा अधिक गाड्या बसू शकतील. याच समवेत शहरातील अन्य अनेक जागा वाहनतळांसाठी आम्ही शोधत आहोत. जुलैपर्यंत महापालिकेसाठी १०० ‘ई-बस’ येणार आहेत. या बस वापरून आम्ही वाहनतळापासून श्री महालक्ष्मीदेवी मंदिरापर्यंत भाविकांना विनामूल्य सोडण्यासाठी विशेष सेवा देणार आहोत.

येत्या वर्षभरात शहरातील जटील वाहतुकीचे नियोजन सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या माध्यमातून ज्या सुविधा भाविकांना देणे शक्य आहेत, त्या सर्व सुविधा देण्यासाठी आमचे प्रयत्न असतील.’’

 देवस्थानांच्या भूमी शोधण्यासाठी खासगी आस्थापनाकडून व्यापक सर्वेक्षण ! – गजानन गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी

‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’च्या असलेल्या जागांविषयी अधिक माहिती देतांना निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव म्हणाले, ‘‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या राज्यात कुठे कुठे भूमी आहेत ? हे शोधण्यासाठी एका खासगी आस्थापनाला काम देण्यात आले आहे. या आस्थापनाने ‘ड्रोन’ वापरून हे काम पूर्ण केले आहे. या आस्थापनाने मंदिरांच्या भूमी, त्यांचे नकाशे, जागांवर झालेले अतिक्रमण यांसह सर्व बारकाव्यांचे सर्व काम पूर्ण केले आहे. देवस्थानांच्या ज्या मालमत्ता आहेत, त्या मालमत्तांच्या संदर्भात संबंधित जिल्ह्यांचे महसूल अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून त्यांच्या या संदर्भात बैठका होत आहेत.’’

शहरातील काही ठिकाणी शासकीय जागांवर खासगी लोक वाहनतळासाठी जागा देऊन वाहनचालकांकडून पैसे वसूल करत असल्याचे सूत्र पत्रकारांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्यावर महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड म्हणाले, ‘‘शहरातील काही ठिकाणी मोकळ्या जागांचा काही जण खासगी कारणांसाठी अपलाभ घेत असून याविषयी लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.’’