पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !

  • नाशिक येथील ‘टीसीएस्’मधील कॉर्पाेरेट जिहादचे प्रकरण

  • आरोपींनी पीडितेला भजन ऐकणे आणि मंदिरात जाणे बंद करण्यास सांगितले !

नाशिक – येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (‘टी.सी.एस्.’) आस्थापनातील लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणांच्या आरोपपत्रात नवीन माहिती समोर आली आहे. आरोपपत्रानुसार आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून पीडितांना लक्ष्य केले. वर्ष २०२२ ते २०२६ या कालावधीत १८ ते २५ वयोगटांतील महिला कर्मचार्‍यांना लक्ष्य करण्यात आले आहे. एका पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिला पाकिस्तानी मौलवी तारिक जमील आणि झाकीर नाईक यांचे व्हिडिओ दाखवले जात होते. गेल्या आठवड्यात नाशिकच्या न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार पीडितांना इस्लामविषयी माहिती मिळावी यासाठी हे व्हिडिओ दाखवण्यात आले होते. आरोपींनी पीडितेला भजन ऐकणे आणि मंदिरात जाणे बंद करण्यास सांगितले. ‘अल्लाह सर्व गुन्हे क्षमा करील’, असेही त्यांना सांगण्यात आले. नाशिक येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मध्ये काम करणार्‍या ९ पीडित महिलांनी एप्रिलमध्ये पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. त्यानंतर आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपपत्रामध्ये १०६ साक्षीदारांच्या साक्ष समाविष्ट आहेत. यांत तक्रारदार, तिची आई, ‘टी.सी.एस्.’चे कर्मचारी,व्यवस्थापन, ‘लैंगिक छळ प्रतिबंधक समिती’चे सदस्य आणि प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी यांचा समावेश आहे.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या साक्षीमध्ये सांगितले की,

१. आरोपींनी ‘मानसिक ताण’ अल्प करण्याच्या बहाण्याने तिच्या दुर्बलतेचा अपलाभ घेतला. एक आरोपी दानिश शेख, जो आधीच विवाहित आहे, त्याने लग्नाचे आमीष दाखवून लैंगिक शोषण केले. जेव्हा पीडितेला तिच्या भविष्याविषयी भीती वाटू लागली, तेव्हा आरोपी म्हणाला, ‘‘घाबरू नकोस, ‘विश्वास ठेव, अल्लाह आपल्यासमवेत आहे. देवाचे भजन ऐकणे आणि मंदिरात जाणे बंद कर, ताण अल्प होईल.’’ नंतर त्याने ‘तस्बीह’ वाचायला सांगितले. (अल्लाहचे गुणगान गाणे याला ‘तस्बीह वाचणे’, असे म्हणतात.)

२. तिसर्‍या ‘एफ्.आय.आर्.’ (प्रथम माहिती अहवाल) मध्ये पीडितेने सांगितले, ‘‘मी डिसेंबर २०२४ मध्ये कार्यालयामध्ये होते. तेव्हा शफी शेख कामाच्या बहाण्याने जवळ येऊन बसला आणि जाणूनबुजून माझ्या पायाला आपला पाय घासण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझे ‘कीपॅड’ वापरण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मी माझी आसंदी (खुर्ची) दूर केली, तेव्हा तो हसत निघून गेला. फेब्रुवारी २०२६ मध्ये तौसीफने माझ्या धर्माला (हिंदु धर्माला) अल्प लेखण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितले की, कृष्णाने १६ सहस्र महिलांशी लग्न केले, यावरून कृष्ण कसे होते ?,हे कळते. भगवान शंकरांना हे माहीत नव्हते का की, गणेश पार्वतीचे पुत्र आहेत ? जर माहीत नव्हते, तर देवी पार्वतीला पुत्र कसा झाला ? त्यांनी गणेशाचे शीर का कापले ? (हिंदु धर्मातील या लीलेमागे सखोल आध्यात्मिक आणि तात्त्विक अर्थ आहे, जो स्थूल बुद्धीच्या जिहादी मानसिकतेला कधीही समजू शकत नाही ! – संपादक)

आरोपी पीडितेला सांगत असत इस्लामविषयी माहिती !

दानिशने तिच्या बँक खात्यांची आणि ‘युपीआय पिन’ची (डिजिटल पैसे देण्याची प्रणालीचा क्रमांक) संपूर्ण माहिती घेतली होती. दानिशने इतर आरोपी तौसीफ आणि निदा यांना सांगितले होते की, त्यांनी मला इस्लामिक धर्माविषयी माहिती द्यावी. त्यामुळे तौसीफ आणि निदा वेळोवेळी मला इस्लामविषयी सांगत असत.

हिंदु देवी-देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी !

मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये प्रविष्ट केलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी ते डिसेंबर २०२५ पर्यंत तिचे कार्यालयामध्ये लैंगिक शोषण झाले. ती महिला आस्थापनात ‘क्रेडिट कार्ड’ ग्राहकांच्या तक्रारी ऐकत असे. तिने सांगितले, ‘‘तौसीफ अत्तार स्वतःचा धर्म श्रेष्ठ असल्याचे दाखवत असे आणि हिंदु धर्माला अल्प लेखत असे. तो म्हणायचा की, खरा देव तोच आहे, जो अदृश्य आहे. हिंदु धर्मात देव दिसतात; म्हणून ते खोटे आहेत.

 खासगी माहितीच्या आधारावर ‘लक्ष्य’ निवडत असत !

आरोपी नवीन रुजू होणार्‍या कर्मचार्‍यांच्या खासगी माहितीच्या आधारावर ‘लक्ष्य’ निवडत असत. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कौटुंबिक समस्यांनी ग्रासलेल्या कर्मचार्‍यांना लक्ष्य केले जात असे. अटक करण्यात आलेली एच्.आर्. (मानव संसाधन) व्यवस्थापक अश्विनी चेनानी हिने तौसीफ अत्तारसमवेत ३८ वेळा, दानिश शेखसमवेत १ वेळा, रजा मेमनसमवेत २२ वेळा आक्षेपार्ह ‘चॅट’ (संभाषण) केले होते. पीडित मुलींनी जेव्हा आरोपींच्या विरोधात तक्रार केली, तेव्हा अश्विनीने जाणीवपूर्वक तक्रारीकडे दुर्लक्ष केले. उलट तिने पीडितेलाच फटकारले. अन्वेषणात हे ही समोर आले की, जेव्हा पीडित त्रस्त असत, तेव्हा एच्.आर्. व्यवस्थापक त्यांच्याशी संपर्क साधून विश्वास संपादन करत असे आणि हळूहळू त्यांच्या रहाणीमानात पालट करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असे.

‘व्हॉट्सॲप’ गट बनवला

आरोपींनी एक ‘व्हॉट्सॲप’ गटही बनवला होता, जिथे ते लक्ष्यावर चर्चा करत असत आणि धार्मिक, तसेच आस्थापनाशी संबंधित सूत्रांवर बोलत असत. पोलीस या ‘डिजिटल’ पुराव्यांचीही चौकशी करत आहेत.

आतापर्यंत अटक केलेले आरोपी

आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींमध्ये आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, तौसीफ अत्तर आणि इतर यांचा समावेश आहे. अश्विन चेनानी यांनाही अटक करण्यात आली आहे. एस्.आय.टी. या संपूर्ण प्रकरणाचे अन्वेषण करत आहे आणि १२ हून अधिक संभाव्य पीडितांची ओळख पटवण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

जोपर्यंत हिंदु तरुणींना स्वतःच्या धर्माचे श्रेष्ठत्व, इतिहास आणि तत्त्वज्ञान माहीत असणार नाही, तोपर्यंत असे जिहादी लोक त्यांच्या धर्माविषयीच्या अज्ञानाचा अपलाभ घेत रहातील. यासाठी प्रत्येकाने धर्मशिक्षण घेणे अनिवार्य आहे. हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ घेणार्‍या जिहादी प्रवृत्तींना आणि त्यांच्या पाठीराख्यांना प्रशासनाने वेळीच ठेचून काढत अत्यंत कठोर कायदेशीर शिक्षा दिली पाहिजे !