
डिचोली, ५ जून (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राजकीय आणि सामाजिक सुधारणा हीच त्यांची जीवननिष्ठा मानली. त्यांचे विचार कालातीत होते, असे उद्गार रवींद्र भवन सांखळीचे सदस्य श्री. सुदन कुळमुळे यांनी काढले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सांखळी येथील रवींद्र भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर डिचोलीचे माजी नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, ‘हर घर सावरकर’चे सदस्य श्री. राजेंद्र सावईकर, सूर्या फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. विष्णुदास चिपळूणकर, सचिव श्री. संदेश नागवेकर, कोषाध्यक्ष श्री. संदीप मणेरीकर आणि गीत सावरकरचे निर्मिती संयोजक प्रा. महेश नागवेकर उपस्थित होते. स्व. सावरकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली, तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
प्रा. नागवेकर म्हणाले, ‘‘गीत सावरकर’ हा कार्यक्रम सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार आहे. सावरकरांनी हिंदु समाजाला पोखरणारी जातीव्यवस्था संपवण्यासाठी काम केले. पतितपावन मंदिरात सर्व जातींना प्रवेश दिला. शाळेत एकाच बाकावर सवर्ण आणि अस्पृश्य यांना बसवण्याची मोहीम चालू केली. समाज जोवर एकसंघ होत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य टिकू शकणार नाही, अशी त्यांची धारणा होती.’’ रवींद्र भवनचे कर्मचारी तुकाराम यांनी मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र भवनचे श्री. लक्षराज आमोणकर यांनी केले.
त्यानंतर गोमंतकीय संगीतकार श्री. अजय नाईक यांनी संगीतबद्ध केलेला ‘गीत सावरकर’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. स्नेहल, दिव्या च्यारी आणि इतरांनी ‘ने मजसी ने…’हे सदाबहार स्फूर्तीगीत सादर केले. तसेच तेजस वेर्णेकर, दिव्या च्यारी, स्नेहल गुरव, उर्विजा नागवेकर, अर्कज नागवेकर यांनी विविध गीते सादर केली. संचित मणेरीकर या बालकलाकाराने ‘मर्म बंधातली ठेव ही’, हे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचा समारोप ‘जयोस्तुते’ हे स्वातंत्र्यसूक्त गात करण्यात आला. यामध्ये उपस्थित रसिकांनीही भाग घेतला. सुनीता फडणीस यांनी सूत्रसंचालन केले. या कलाकारांना संगीत साथ सर्वश्री सुरेश घाडी, महादेव गावडे, गोविंदा फडते, संचित मणेरीकर आणि दत्तराज च्यारी यांनी केली.
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !