१९ फेब्रुवारी या दिवशी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती (दिनांकानुसार)’ साजरी झाली. त्या निमित्ताने…
विल्यम डॅलरिंपल यांच्या ‘द अनार्की : द ईस्ट इंडिया कंपनी, कार्पोरेट व्हायोलन्स, एंड द पिलेज ॲाफ एन एंपायर’ या पुस्तकात छत्रपती शिवराय आणि मावळे यांच्याविषयी चुकीचे लिखाण !

छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, त्यांचे कार्य यांविषयी मराठी मनामध्ये अत्यंत आदराचे आणि पवित्र स्थान आहे. मी तर म्हणेन की, असे स्थान असलेलेच मन ‘मराठी’ आहे. तसे उगाचच नाही. काही शतकांपूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तीमत्त्वाची स्मृती मराठी मनांना आजही एक आदर्श म्हणून प्रेरणा देत असते. असे असतांना त्यांच्या संबंधाने कोणत्याही कारणाने का असेना, काही अयोग्य उल्लेख होणे चुकीचे आहे. आज कुणी एकाने दुसर्या कुणाला ‘रास्कल’ (नीच) संबोधलेले तिसर्याच्या ते कानावर पडले, तर त्याच्या मनात ज्याला ‘रास्कल’ म्हटले, त्याच्याविषयी काय प्रतिमा होईल, याचा थोडा विचार करा. भारताच्या मातीची, संस्कृतीची आणि येथील भाषेची काहीही जाण नसणार्यांच्या नोंदी ग्राह्य धरून इतिहासलेखन होणे, ही समस्या आहे. १९ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पार्श्वभूमी, ‘द अनार्की’मधील ‘मराठ्यां’संबंधीचे खटकणारे उल्लेख, खंडण करण्याचे कारण, चुका दाखवणारे मोजके लेख आणि त्यातील सार, प्रस्तुत लेखाचे कारण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
भाग २
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1009637.html

९. इतिहासकालीन वस्तूस्थिती
पुस्तकात उल्लेखित वर्णन करणारे शब्द, म्हणजे डॉ. फ्रायर या तत्कालीन इंग्रज प्रवाशाने केलेल्या वर्णनाचे शब्दशः उद्धरण आहे. त्यामुळे त्या वेळच्या अन्य इतिहास संसाधनातून स्पष्ट होणारी संबंधित सूत्रांच्या संदर्भातील नेमक्या वस्तूस्थितीचे सार समजून घेऊ.
९ अ. अल्प सामान आणि साधा वेश हे महाराजांच्या सैनिकांचे वैशिष्ट्य : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आणि मोगल सैनिक यांची तुलना करून पहाणे बोधप्रद ठरेल. मोगलांचे सैन्य जात असे, तेव्हा त्यांच्या समवेत स्त्रिया, तसेच अन्य लवाजमा असे. यामुळे ते म्हणजे जणू काही एक चालते नगर वाटेल, अशी स्थिती होती. तुलनेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सैनिक अगदी न्यूनतम साहित्य समवेत ठेवत.

डोक्यावर पागोटे (फेटा), अंगात जॅकेट, गच्च बांधलेले धोतर असा त्यांचा वेश असे, तर त्यांच्यातील अधिकारी यासह डोक्यावर शिरस्त्राण आणि अंगात जाडजूड चिलखतसदृश सुताचा सदरा घालत असत. स्वत: राजे अत्यंत साधेपणाने रहात. सुरतेला कामगिरीवर जातांना ते स्वत: घोड्यावर स्वार होऊन गेले होते, तर वाटेत त्यांनी भूमीवरच विश्रांती घेतल्याचा उल्लेख आढळतो. महाराज स्वत: एक वेळचे भोजन घेत. मावळे खोगीराखाली (घोड्यावर बसण्यासाठी असलेले आसन) बसेल एवढेच उर्वरित साहित्य ठेवत असत. (मराठी प्रजेचा आहार भाकरी आणि सोबत जे असेल ते, असा साधाच असे, हे सांगायला इतिहासातील नोंदी नकोत !) या साधेपणाकडे पाहून त्यांच्या संबंधाने तुच्छतादर्शक विधाने कुणी करत असेल, तर त्याला ना छत्रपती शिवाजी महाराज ज्या संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करतात त्या संस्कृतीची जाण आहे, ना तिच्यातील मूल्यांची, असे म्हणावे लागते.
९ आ. सैन्याला कडक शिस्तीचे वळण लावणारे महाराज ! : छत्रपती शिवाजी महाराज यांनी सैन्याला कडक शिस्त लावली होती. सैनिक जेथे रहात असतील, तेथे स्त्रियांना येण्यास पूर्ण बंदी होती. एवढेच नव्हे, तर कुठेही मोहीम चालवली, तरी ‘बालके, गाय आदी पशू, ब्राह्मण, स्त्रिया, प्रार्थनास्थळे यांना हातसुद्धा लावायचा नाही’, असे महाराजांचे सैनिकांना कडक निर्देश होते. कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक शिक्षा होती.
९ इ. छत्रपती शिवरायांनी छापा मारून केलेल्या वसुलीला ‘लूट’ संबोधणे चुकीचे ! : छत्रपती शिवाजी महाराज यांना अथवा त्यांच्या सैनिकांची ‘लूट करणारे’, अशी प्रतिमा निर्माण होणे का चुकीचे आहे, ते संक्षिप्तपणे पाहू.
९ इ १ : सैन्य उभारणीसंबंधीची छत्रपती शिवाजी महाराजांपुढील समस्या : छत्रपती शिवाजी महाराज यांनी कार्य चालू केले, तेव्हा ज्या मराठ्यांचा कल सैन्यात जावे, असा असेल ते स्वाभाविकपणे आधीच त्या काळातील मुसलमान बादशाहच्या चाकरीत या ना त्या प्रकारे जोडले गेलेलेच होते. त्यामुळे राजांना उर्वरित समाजातूनच लढवय्ये सिद्ध करावे लागणार होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना मोठ्या इस्लामी सत्तांच्या विरोधात संघर्ष करायचा, तर आर्थिक जोडणीही चांगली असावीच लागणार होती. एवढेच नव्हे, तर या कार्यासाठी त्यांना आणि अनुयायांना सतत दक्ष अन् कार्यरत रहावे लागणार होते.
९ इ २. खड्या सैन्याचे प्रमाण अधिक : त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सामान्य जनतेतून खड्या सैन्याची (सैनिकसेवा हीच उपजीविका असणारे) उभारणी करणे, यावर भर दिला. हे सैन्य पावसाळ्यात ४ मास तंबूत रहात असे. ते घरी जात नसत. त्यांची व्यवस्था राज्यप्रशासन करत असे. अन्य ८ मास हे सैनिक कामगिरीवर असत. त्याकाळी अन्य राजसत्तांच्या सैन्यात खड्या सैन्याचे प्रमाण तुलनेने न्यून असे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात खडे सैन्य अनुमाने ६० ते ७० टक्के इतके होते.
९ इ ३. सैन्याला रोख रकमी नियमित वेतन : छत्रपती शिवाजी महाराज यांनी जहागीरदारी, म्हणजे कोणता तरी प्रांत कुणा सरदाराला दिला, त्याने त्यातून उत्पन्न मिळवावे, यासह सैन्य त्याच्या मर्जीप्रमाणे बाळगावे, ही इतरत्रची प्रचलित पद्धत बंद केली होती. ते त्यांच्या सैन्याला रोख रकमी नियमित वेतन देत असत.
९ इ ४. शत्रूप्रदेशावरील छाप्यातून जमा पै न् पै राज्याच्या खजिन्यात : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्याने शत्रूच्या प्रदेशावर छापा मारून संपत्ती जमा केली, तरी त्यातील एक पैही सैनिकांना जात नसे. ती सर्वच्या सर्व राज्याच्या खजिन्यात जमा होत असे. ही शिस्त पाळली जात आहे ना, याची खात्री करण्यासाठी त्यांची अंतर्गत हेरव्यवस्था होती. हे धन जमा करून राजांनी गड बांधणे, असलेले गड मजबूत करणे, आरमार उभे करणे, आधुनिक शस्त्रसामग्री जमा करणे, अशी अनेक कार्ये केली.
९ इ ५. शत्रूप्रदेशातून सरसकट ‘लूट’ नाही : छत्रपती शिवाजी महाराज यांनी शत्रूच्या दिसेल, त्या प्रदेशावर छापे मारून त्यांना सरसकट ‘लुटले’ नाही. सुरतेवरील छाप्यामध्येही महाराजांनी अनेकांना सूट दिली होती. उदाहरणार्थ ‘तेथे कुणा मोठ्या धनिकाचे नुकतेच निधन झाले होते. तो चांगला दानशूर होता, हेही महाराजांना समजले. त्यांनी मग त्याच्या घराला वसुलीतून वगळले. एवढेच नव्हे, तर अन्य कुणी चुकूनसुद्धा त्यांच्या घराला त्रास देऊ नये; म्हणून तेथे बंदोबस्त ठेवला’, असा उल्लेख आढळतो. जे शत्रूक्षेत्र त्यांच्या त्यांच्या राजसत्तेला जेवढा कर देत असेल, त्याचा चौथा हिस्सा (चौथ) एवढे धन छत्रपती शिवाजी महाराज यांना मिळाले, तर त्या प्रदेशावर आक्रमण केले जात नसे. बर्याचदा असे देणार्यांना त्यातही काही सूट मिळत असे.
९ इ ६. नाईलाजास्तव ‘लूट’ : ‘मराठ्यांना ‘लुटारू’ म्हणणे’, या प्रकारच्या वर्णनातून असे ध्वनित होते की, अनिर्बंध विध्वंस, लूट, क्रौर्य आदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छाप्यांची अंगभूत वैशिष्ट्ये असावीत. प्रत्यक्षात तसे नसून त्यांचे छापे मानवी सभ्यता सांभाळून होते. प्रत्येक खेपेला महाराजांच्या सैन्याने सुरतेच्या सीमेवर पोचल्यानंतर ‘त्यांच्याकडे योग्य तेवढे धन पाठवून द्यावे’, असा संदेश त्या नगरात दिलेला आहे. त्यासाठी समयमर्यादा दिलेली आहे. असेच कारवार, वेंगुर्ला, हुबळी येथील छाप्यांविषयीही आहे. नगरनिवासी त्याप्रमाणे न वागल्यासच बळाचा वापर करून पुढील कारवाई करण्यात आली आहे. याला विदेशी नोंदींमध्येही दुजोरा मिळतो. ‘प्रार्थनास्थळांना हात लावायचा नाही’, असे महाराजांच्या सैनिकांना निर्देश असल्याने तेथून संपत्ती लुटली असे झालेले नाही. यासह महाराजांचे स्पष्ट आदेशच असायचे, ‘विरोध झाला, तरच हिंसा !’
९ इ ७. मोगल सैनिकांच्या वर्तनाशी तुलना : जेथे मोगल सैनिक आक्रमण करत, तेथे अन्य जनतेला त्रास देत असत. यासह ते वाटेत आलेली आणि त्यांना विरोध करणार्यांचीही उभी पिके नष्ट करत जात, त्या खेडुतांना त्यांचे सामान वाहायला लावत, पशूंची कत्तल करत, रहाती घरे पाडून जळणासाठी लाकूड मिळवत, हे लक्षात घ्यायला हवे. अधिक तुलनेसाठी एकच उदाहरण देतो. शहाजहांनने बंगालमधील हुगळी येथे पोर्तुगीजांवर आक्रमण करून त्या नगराची लूट केली. त्यानंतर ४ सहस्र ४०० जणांना बंदी बनवण्यात आले. त्यातील ५०० जणांना आगर्याला पाठवण्यात आले. मुलींना बादशाह आणि त्याचे सरदार यांच्या जनानखान्यासाठी वाटण्यात आले. मुंबईस्थित इंग्रजांच्या वखारीतील सैनिकांनी तेथील जनतेला अकारण त्रास दिल्याचा उल्लेख एका लेखकाने केलेला आढळतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सैन्य धोरण, प्रशासन नीती अथवा त्यांची इतरांसमवेतची तुलना इत्यादी हा या लेखाचा विषय नाही म्हणून येथे थांबतो; मात्र मांडलेल्या सूत्रांतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यामागील मूळ विचार किंवा भूमिका स्पष्ट व्हावी. त्या दृष्टीकोनातून त्यांनी ‘लूट’ केली, असे जे म्हटले जाते, त्याकडे पहावे. मग लक्षात येते की, हे किती चुकीचे आहे.

१०. काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेली चूक
डॅलरिंपल यांच्या पुस्तकातील अयोग्य वाटणारे उल्लेख वाचल्यानंतर त्यासारखे काही घडलेले एक जुने उदाहरण आठवते. जवाहरलाल नेहरू लिखित ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक भारताच्या एकूण इतिहासासंबंधी आहे. काही दशकांपूर्वी ते प्रथम प्रसिद्ध झाले तेव्हा त्यातील छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सैनिक यांच्या संबंधाने असलेल्या विधानांवर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते.
११. जुन्या नोंदी आणि त्यावर आधारित इतिहास
आता आपण थोडे खोलात जाऊ. कोणत्याही काळातील व्यक्ती वा परिस्थिती यांच्यासंबंधी माहिती देणारी काही तत्कालीन संसाधने असतात. यांत शिलालेखांपासून विदेशी प्रवाशांच्या नोंदी असे बरेच काही येते. त्यांचा आधार घेत जेव्हा कुणी इतिहासकार एक संगतवारी लावतो, घटनांमागील कार्यकारण भाव प्रस्तुत करतो, काही निष्कर्ष काढतो आणि स्वतःचे मत मांडतो, तेव्हा तो एकप्रकारे त्या व्यक्तीचे किंवा समूहाचे रेखाटन करणारा इतिहास बनतो.
१२. अन्य विषयवस्तूच्या सापेक्ष मांडणी करतांनाही दुसर्यावर अन्याय नको !
डॅलरिंपल, तसेच नेहरू यांच्या लेखनाचा मूळ विषय भिन्न होता. डॅलरिंपल यांना त्यांच्या लेखनप्रवाहात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सैनिक यांच्यासंदर्भात तत्कालीन परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी काही मांडायचे होते. या अनुषंगाने ते जे काही लिहिणार त्यातून छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तीविषयी (तसेच समवेतचे मावळे) वाचकांचे काही मत बनणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी लेखन करतांना उपलब्ध साधनसामग्री नेमकी पारखून योग्य काळजी घ्यायला हवी होती. ज्या गोष्टी निर्विवाद मान्य झाल्या आहेत, त्यांच्या आधारे विषय मांडायला हवा होता.
१३. जवाहरलाल नेहरूंनी क्षमा मागणे आणि त्यांच्या चुकीचे कारण
जवाहरलाल नेहरूंच्या वर उल्लेखित लिखाणासंबंधाने राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर महाराष्ट्रातील काही काँग्रेस नेत्यांनी त्यांना पत्र लिहिले. त्यासह नेत्यांच्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी एत्तदेशीय कागदपत्रांचे पुरावे त्यांना पाठवून दिले. नेहरूंनी मग मान्य केले, ‘त्यांचे हे लेखन परदेशी इतिहासकारांच्या पूर्वग्रहदूषित माहितीवर आधारित होते. त्यांनी ते तुरूंगात असतांना लिहिले होते; म्हणून त्यांना सर्व संसाधने उपलब्ध नव्हती. त्यांनी त्यांच्याकडील जुन्या नोंदींवर आधारीत लिखाण केले इत्यादी.’
पुढील आवृत्त्यांमधून नेहरूंनी आक्षेपार्ह विधाने काढली. वर्ष १९५० मध्ये त्यांनी एका पत्राद्वारे क्षमा मागत स्पष्ट केले, ‘‘मी छत्रपती शिवाजी महाराज यांना नेहमीच एक महान भारतीय मानले आहे.’’
(क्रमशः)
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.२.२०२६)
भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1010269.html
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !