१९ फेब्रुवारी या दिवशी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती (दिनांकानुसार)’ साजरी झाली. त्या निमित्ताने…
विल्यम डॅलरिंपल यांच्या ‘द अनार्की : द ईस्ट इंडिया कंपनी, कॉर्पोरेट व्हायोलन्स, एंड द पिलेज ॲाफ एन एंपायर’ या पुस्तकात छत्रपती शिवराय आणि मावळे यांच्याविषयीचे चुकीचे लिखाण !

छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, त्यांचे कार्य यांविषयी मराठी मनामध्ये अत्यंत आदराचे आणि पवित्र स्थान आहे. मी तर म्हणेन की, असे स्थान असलेलेच मन ‘मराठी’ आहे. तसे उगाचच नाही. काही शतकांपूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तीमत्त्वाची स्मृती मराठी मनांना आजही एक आदर्श म्हणून प्रेरणा देत असते. असे असतांना त्यांच्या संबंधाने कोणत्याही कारणाने का असेना, काही अयोग्य उल्लेख होणे चुकीचे आहे. आज कुणी एकाने दुसर्या कुणाला ‘रास्कल’ (नीच) संबोधलेले तिसर्याच्या ते कानावर पडले, तर त्याच्या मनात ज्याला ‘रास्कल’ म्हटले, त्याच्याविषयी काय प्रतिमा होईल, याचा थोडा विचार करा. भारताच्या मातीची, संस्कृतीची आणि येथील भाषेची काहीही जाण नसणार्यांच्या नोंदी ग्राह्य धरून इतिहासलेखन होणे, ही समस्या आहे. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पार्श्वभूमी, ‘द अनार्की’मधील ‘मराठ्यां’संबंधीचे खटकणारे उल्लेख, खंडण करण्याचे आणि प्रस्तुत लेखाचे कारण, इतिहासकालीन वस्तूस्थिती, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेली चूक अन् त्यांनी केलेली क्षमायाचना’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
भाग ३
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1009886.html

१४. विल्यम डॅलरिंपल यांची चूक पंडित नेहरूंच्या चुकीप्रमाणेच !
डॅलरिंपल यांचे लेखन चुकीचे आहे. त्यांना मांडायचे सूत्र अन्य प्रकारे मांडायला हवे होते आणि तसे ते मांडू शकले असते. त्यांच्याकडून कुठेतरी विदेशी लेखकांना ग्राह्य धरून पंडित नेहरूंनी केलेली चूक होत आहे, असे वाटते. अर्थात् केवळ हे सांगणे इथपर्यंत या लेखाचा उद्देश मर्यादित नाही. यातून या चुकीच्या सापेक्ष अधिक खोल विचार करणे, हे या लेखाचे मुख्य प्रयोजन आहे. तो करतांना आपण पुढे दिलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सूत्राकडे येतो.

१४ अ. विदेशी प्रवाशांच्या भारताविषयीच्या इतिहासविषयक नोंदींची विश्वासार्हता किती ? : ‘इंडियन हिस्टॉरिकल रिव्ह्यू’ या इतिहासविषयक संशोधन पत्रिकेत वर्ष २०१३ मध्ये मॉस्कोस्थित युजिना व्हिनेना या रशियन व्यक्तीचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखाचे शीर्षकच आहे, ‘रोड्स ऑफ (मिस) अंडरस्टँडिंग : युरोपियन ट्रॅव्हलर्स इन इंडिया (फिफ्टीन टू सेव्हन्टीन्थ सेंच्युरी).’ थोडक्यात सांगायचे, तर ‘१५ व्या ते १७ व्या शतकात भारताला भेट देणार्या युरोपियन प्रवाशांनी केलेल्या वर्णनातील सूत्रांचे ऐतिहासिक मूल्य संशयास्पद असून ते नीट पारखूनच घ्यावे’, असे त्यांनी या लेखात मांडले आहे.
१४ आ. युरोपियन प्रवाशांच्या नोंदी पारखून स्वीकाराव्यात ! : हा लेख सांगतो की, दीर्घकाळ वर उल्लेखित कालखंडातील इतिहास लेखकांनी त्या काळात भारताला भेट देणार्या प्रवाशांच्या नोंदी किंचितही विचारपूर्वक पारख न करता अन्य संसाधनांसह तौलनिक विचार न करता जशाच्या तशा वस्तूनिष्ठ म्हणून स्वीकारल्या आहेत. असे करतांना बर्याचदा त्यांनी पर्शियन (त्या काळातील एक राजभाषा) आणि विशेष करून भारतीय भाषांमधील नोंदींपेक्षा या युरोपियनांच्या प्रवास वर्णनातील नोंदी ग्राह्य धरल्या आहेत.
१४ इ. भारतीय समाज आणि संस्कृती यांची जाण नसलेले युरोपियन प्रवासी ! : या लेखात असेही मांडले आहे की, युरोपियन प्रवाशांकडून नोंदी योग्य होण्यासाठी त्यांना भारतीय समाज आणि संस्कृती यांची थोडी तरी जाण व्हायला हवी. त्यासाठी भारतीय भाषा यायला हव्यात. हे का महत्त्वाचे हे समजण्यासाठी जाता जाता एक उल्लेख करतो. प्रसिद्ध इतिहास लेखक सुरेंद्रनाथ सेन यांनी एका विदेशी बिशपने छत्रपती शिवाजी महाराजांना ‘मोगल राजा’ असे संबोधल्याचे दाखवून दिले आहे.
व्हिनेना यांच्या संशोधन लेखात त्यांनी ज्यांच्या नोंदी इतिहासासाठी विचारात घेतल्या जातात, त्या त्या काळातील युरोपियन प्रवाशांची नावे, कुणाला कोणती भाषा येत होती, हे एका चांगल्या तक्त्याच्या आधारे सांगितले आहे. संक्षेपात सार सांगायचे, तर फारच थोड्यांना पर्शियन, तर अगदी ४-६ जणांना तमिळ भाषा येत होती, हे त्यातून स्पष्ट होते. तत्कालीन मराठी आणि अन्य भारतीय भाषा तर कुणालाच येत नव्हत्या, हेही त्यात दिसते. डॅलरिंपल यांनी ज्या डॉ. फ्रायरचा हवाला देत माहिती दिली आहे, त्याला ना पर्शियन, ना अरबी, ना भारतीय भाषा येत होती, हेही यात दिसते.
या लेखातून स्पष्ट होणारी काही महत्त्वाची सूत्रे

या लेखातील माहितीतून, तसेच त्यातील विचारांतून प्राप्त दिशेने पुढे गेल्यास दिसणारी पुढील सूत्रे मांडावीशी वाटतात –
अ. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची राजवट यांच्यासंबंधी बोलतांना वा लिहितांना अद्यापही तत्कालीन युरोपियन प्रवाशांच्या नोंदी काहीही न पारखताच विचारात घेतल्या जातात, असे दिसते. असेच होत राहिले, तर त्यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे अनुयायी, तसेच सध्याच्या काळात त्यांचा जयजयकार करणारे यांच्याविषयीही तसेच चुकीचेच विचार वा अपसमज पसरत रहाणार.
आ. खरेतर एत्तदेशीय संसाधनांचा उपयोग न करता शिवछत्रपतींविषयी अथवा त्यांच्या कार्यकाळाविषयी केवळ विदेशी लेखकांच्या नोंदींच्या आधारे इतिहासलेखन करणे चुकीचे नव्हे, तर अन्यायकारकही आहे, हे भारतातील काही इतिहास लेखकांच्या अगदी स्वातंत्र्यपूर्वकाळात लक्षात आलेले आहे. असे असूनही वर्ष २०१९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सैनिक, म्हणजे ‘लुटारू’ इत्यादी म्हणण्यात येते, हे विचार करण्यासारखे आहे.
इ. वरील सूत्रामागील एक कारण, म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला प्रत्येक ‘अमराठी मना’पर्यंत पोचवण्यात आमचे ‘मराठी मन’ कुठेतरी अल्प पडत आहे का ? हे आपण पहावे. छत्रपती शिवरायांचे चरित्र आणि कार्य लोकांपर्यंत पोचवतांना त्यांनी मिळवलेले विजय इत्यादी, त्यांचे व्यक्तीमत्त्व, त्यांच्या कार्यातील रणनीती, प्रशासकीय धोरण इत्यादी पैलूंसंबंधी तत्कालीन मंडळींकडून जे चुकीचे ठरवण्यात आले आहे, ते चुकीचे कसे, हेही सांगितले जावे.
ई. भारताचा इतिहासासंबंधी अभ्यास करतांना येथील संस्कृती, भाषा आदींविषयी काही माहिती नसणार्यांच्या लेखनातील चुका उघड जनसामान्यांसमोर येण्यासाठी या संस्कृतीची जाण असणारे, तिच्याविषयी आत्मीयता असणारेच सांगू शकतात, ज्यांना शक्य आहे, त्यांनी त्याचा निरंतर अभ्यास करत रहावे.
उ. नेहरूंनी ज्याप्रकारे स्वतःची चूक क्षमायाचना करून, तसेच त्यांच्या पुस्तकाच्या पुढील आवृत्तीमध्ये सुधारली, त्याप्रमाणे डॅलरिंपल यांनी यातून बोध घ्यावा.
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत
१४ ई. डॉ. फ्रायरविषयी काही अन्य अनुषंगिक सूत्रे : डॉ. फ्रायर याने आपल्या प्रवासात केलेल्या नोंदी पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत. जवळपास वर्ष १९०० मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांचे संपादन करणार्यांनी ‘डॉ . फ्रायरची भारतीय भाषाविषयक अनभिज्ञता, त्याचा मुक्काम प्रामुख्याने इंग्रजांच्या मुंबई, सुरत इत्यादी ठिकाणी असलेल्या वखारीत असणे, त्यांची सूत्रे म्हणजे समुद्रकिनार्यावरील ऐकीव गप्पांवर आधारीत असू शकतात’, या मर्यादा आवर्जून नमूद केल्या आहेत.
१४ उ. मुसलमान बखरकारांच्या मर्यादा : मुसलमान बखरकार तत्कालीन इस्लामी शासकांच्या पदरी असल्याने ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सैनिक यांच्याकडे तुच्छतेने अन् पूर्वग्रहाने पहाणार, एवढेच नव्हे, तर त्यांचे गुण अन् यश यांची नोंद शक्यतो टाळणार, हे उघड आहे. त्यामुळे त्यांनी ‘काही स्तुती केली, तरच ती खरी, बाकी सर्व फुलोरा’, असे म्हणायला जागा रहाते.
१४ ऊ. विदेशी प्रवाशांच्या भारतीय संस्कृतीच्या अज्ञानाचा त्यांच्या नोंदींवर त्याच्यातील पडणारा प्रभाव : हा विषय समजायला थोडा किचकट वाटू शकतो. भारतात येणारा विदेशी आपल्या देशातील धर्म-संस्कृती यांची काय योग्य आणि अयोग्य हे ठरवणारी संदर्भ चौकट मनात घेऊन येत असतो. अनुमाने ९-१० शतकांपूर्वी तर हे अधिकच सत्य आहे. असे होणे स्वाभाविक आहे. या प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा साधेपणा पाहून त्यांना या संस्कृतीत एक मोठे समजले जाते, याची जाणीव असू शकत नाही. भारतीय संस्कृती त्याग आणि साधेपणा ही मूल्ये माणसाच्या आंतरिक प्रगतीची लक्षणे मानते. इतरांना मग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैनिकांचा, त्यांच्या राजाचा साधेपणा पाहून ते कर्तृत्वाने किती मोठे आहेत, हे लक्षातच येत नाही. स्वाभाविक मग अशांच्या पैसे जमा करण्याच्या कृत्याकडे पाहून त्यांना विदेशी संस्कृतीचा प्रभाव असलेले मन ‘लुटारू’, ‘नेकेड’, ‘रास्कल’ म्हणते. अर्थात् त्या काळी कुणी प्रवाशाने काहीही म्हटले, तर ते आता कशासाठी मांडायचे ?
(समाप्त)
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.२.२०२६)
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !