युरोपियन प्रवाशांच्या इतिहासासंबंधीच्या नोंदींची पारख न करता त्या स्वीकारू नका !

आज ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती (दिनांकानुसार)’ आहे. त्या निमित्ताने…

छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, त्यांचे कार्य यांविषयी मराठी मनामध्ये अत्यंत आदराचे आणि पवित्र स्थान आहे. मी तर म्हणेन की, असे स्थान असलेलेच मन ‘मराठी’ आहे. तसे उगाचच नाही. छत्रपतींचे कार्यच तितके भव्य आहे. एका इतिहास लेखकाने म्हटल्यानुसार ‘या राजाने स्वत:ची स्मृती रहावी, यासाठी ना ‘पिरॅमिड’ बांधले, ना संगमरवरी भव्य मंदिर.’ काही शतकांपूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तीमत्त्वाची स्मृती मराठी मनांना आजही एक आदर्श म्हणून प्रेरणा देत असते. 

छत्रपती शिवाजी महाराज

असे असतांना त्यांच्या संबंधाने कोणत्याही कारणाने का असेना, काही अयोग्य उल्लेख होणे चुकीचे आहे. आज कुणी एकाने दुसर्‍या कुणाला ‘रास्कल’ (नीच) संबोधलेले तिसर्‍याच्या ते कानावर पडले, तर त्याच्या मनात ज्याला ‘रास्कल’ म्हटले, त्याच्याविषयी काय प्रतिमा होईल, याचा थोडा विचार करा. भारताच्या मातीची, संस्कृतीची आणि येथील भाषेची काहीही जाण नसणार्‍यांच्या नोंदी ग्राह्य धरून इतिहासलेखन होणे, ही समस्या आहे.

भाग १ 

विल्यम डॅलरिंपल यांच्या पुस्तकात छत्रपती शिवराय आणि मावळे यांच्याविषयीचे चुकीचे लिखाण !

१. पार्श्वभूमी

विल्यम डॅलरिंपल लिखित ‘द अनार्की : द ईस्ट इंडिया कंपनी, कार्पोरेट व्हायोलन्स, एंड द पिलेज ॲाफ एन एंपायर’ हे इंग्रजी भाषेतील पुस्तक वर्ष २०१९ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकाचा उद्देश सांगतांना लेखक सांगतो, ‘एकाच लंडन कार्यालयातून चालवल्या जाणार्‍या एकाच व्यावसायिक संस्थेने वर्ष १७५६ ते १८०३ या कालावधीत या विशाल उपखंडाचे स्वामी म्हणून बलाढ्य मोगल साम्राज्याची जागा कशी घेतली, या प्रश्नाचे उत्तर देण्याचा हा एक प्रयत्न आहे.’ या पुस्तकात प्रारंभी ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पाय ठेवला, तेव्हा तसेच नंतर या देशातील विशेषकरून राजकीय स्थितीविषयी त्यांनी प्रथम मांडणे स्वाभाविक आहे. त्या अंतर्गत प्रारंभीला ब्रिटीश, फ्रेंच, नवाब, मराठे इत्यादींमधील प्रमुख व्यक्तीमत्त्वांचीही आणि नंतर त्यांच्या कार्याविषयी मोजकी माहिती देण्यात आली आहे.

२. ‘द अनार्की’मधील ‘मराठ्यां’संबंधीचे खटकणारे उल्लेख 

डॉ. दुर्गेश सामंत

या पुस्तकाच्या ‘१५९९’ या प्रकरणात औरंगजेबाविषयी माहिती सांगतांना डॅलरिंपल छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सैनिक आणि त्यांचे कार्य यांच्याविषयी माहिती देतात. ही माहिती २ पानी असून त्यातील काही वाक्ये येथे देत आहे. त्यातील मला अधिक खटकणारे उल्लेख अधोरेखित केले आहेत.

‘….शिवाजी भोसले या हिंदु ‘वॉर लॉर्ड’च्या नेतृत्वाखाली मराठा गनिमी आक्रमणकर्त्यांनी दख्खनवर कब्जा केलेल्या मोगल सैन्याविरुद्ध आक्रमणे चालू केली.’ या लिखाणानंतर काही वाक्यांनंतर पुढील उल्लेख येतो, ‘…मराठ्यांचे घोडदळ त्यांच्या कमालीच्या वेगवान हालचालींसाठी (mobility) आणि मोगल फौजेच्या फळीमागे दूरवर जाऊन आक्रमण करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जात असे. हे घोडेस्वार दिवसाला ५० मैलांचे अंतर कापू शकत होते; कारण त्यांच्याकडे कोणतेही ओझे किंवा अधिकची शिदोरी नसे; त्याऐवजी ते स्थानिक प्रदेशावरच उदरनिर्वाह करत. (कारण) शिवाजी महाराजांचे धोरणसूत्र होते, ‘लूट नाही, तर वेतन नाही.’ (“…. They could cover fifty miles in a day because the cavalrymen carried neither baggage nor provisions and instead lived off the country: Shivaji’s maxim was ‘no plunder, no pay’.)

हे सूत्र तत्कालीन इंग्रज प्रवासी डॉ. जॉन फ्रायर कृत नोंदींवर आधारित आहे, असे दिसते. याच डॉ. फ्रायरचा दाखला देत लेखकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैनिकांविषयी पुढे मांडले आहे, ‘…सैन्यात असलेले हे ‘नेकेड, ‘स्टार्व्हड रास्कल्स’, केवळ ‘भाले आणि २ इंच रुंद लांब तलवारींनी’ सज्ज असायचे. ते मैदानी युद्ध कदाचित् जिंकू शकणार नाहीत; परंतु ‘अचानक छापा टाकणे आणि लूट करण्यात’ ते कमालीचे निष्णात होते.’ …या सर्वांतून जे ध्वनित होते, ते मला खटकते.

आत्ता खंडण करण्याचे कारण

कुणालाही प्रश्न पडेल की, वर्ष २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या, तसेच मुख्य विषय वेगळाच असलेल्या पुस्तकात जाता जाता कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्याविषयी कुणाला काही खटकले, तर आता त्याविषयी खास टीकात्मक लिखाण करण्याचे कारण काय ? इत्यादी; परंतु यात जे चूक आहे, ते कधीही का असेना सांगायलाच हवे आणि खरोखरीचा उत्तम आदर्श असलेल्या छत्रपती शिवरायांना मानणार्‍यांवरही अन्याय होऊ नये, यांसाठी ‘द अनार्की’मधील चुका दाखवायला हव्यात. त्यातही पुस्तकाला प्राप्त मान्यता पाहून तर कुणालाही असेच वाटेल.

– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत

३. जगभरातील प्रसिद्धीमाध्यमांनी उचलून धरलेले पुस्तक

वर्ष २०१९ मध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यावर त्याविषयीची परीक्षणे विदेशातील (‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ यांसह) मोठ्या नियतकालिकांमध्ये पुस्तक परीक्षणे मांडणार्‍या प्रतिष्ठित संकेतस्थळांवर आणि व्हिडिओद्वारे प्रसिद्ध झाली आहेत अन् ती अद्याप वाचनासाठी उपलब्ध आहेत, तसेच भारतातील मोठ्या नियतकालिकांनीही या पुस्तकाला उचलून धरले आहे.

४. परीक्षणांतून पुस्तकातील इतिहासाला प्राप्त मान्यता 

यासाठी एक उदाहरण पहा. ‘The Times Literary Supplement’मध्ये परीक्षण लिहिणार्‍या तीर्थंकर रॉय यांनी या पुस्तकाला ‘लेखकाच्या इतिहासाच्या मूळ स्रोतांचा अभ्यास आणि इतिहासविषयीची उत्तम दृष्टी दिसून येते. हे पुस्तक अलीकडच्या काळातील भारतीय इतिहासासंबंधी सांगणार्‍या उत्तम पुस्तकांपैकी एक आहे’, असे म्हटले आहे. एकूण या सर्व परीक्षणांचे सार आहे की, हे पुस्तक जिज्ञासूंसाठी वाचनीय निश्चित आहे आणि यातील सांगितलेले जसेच्या तसे स्वीकारायला काहीच हरकत नाही. अगदी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘वाचायची पुस्तके’ या त्यांच्या सूचीतही त्याचे नाव आहे. हे सर्व असे असणे यांत आश्चर्य काही नाही. नामवंत प्रकाशन संस्था, लेखकाचे स्थान इत्यादींमुळे संबंधित व्यवस्थेमध्ये ते पुस्तक प्रसिद्धीच्या वरच्या श्रेणीत रहाणार, हे उघड आहे. त्यासह ‘हे पुस्तक वाचावे’, असे सांगणारी परीक्षणे इत्यादी केवळ वर्ष २०१९ मध्येच प्रसिद्ध झाले असे नसून अगदी वर्ष २०२४ पर्यंत हे चालू आहे, हे लक्षात घ्यावे. ‘विकीपिडीया’ या संकेतस्थळावरील माहितीनुसार या पुस्तकावर आधारित टीव्ही मालिका चालू करायचा विचार चालला असल्याचेही दिसून येते.

५. चुका दाखवणारे मोजके लेख आणि त्यातील सार 

पुस्तकाला वाचनीय इत्यादी ठरवणार्‍या वरील प्रसिद्धीच्या तुलनेत क्वचित काहींनी या पुस्तकातील चुकांविषयी लिहिले आहे.

अ.‘swarajyamag.com’ या संकेतस्थळावरील लेख : या लेखात ‘साम्राज्यवाद्यांच्या दृष्टीतून इतिहासाचे चित्रण, मोगलांना ते भारतियांच्या दृष्टीने विदेशी आहेत, हे स्पष्टपणे नसणे’, यांसारख्या उणिवा दाखवून देण्यात आल्या आहेत. जवळपास शेवटी डॅलरिंपल यांनी महाराजांच्या राज्याभिषेकाविषयी सांगितले आहे. त्या वेळी ‘छत्रपती’ या शब्दाचे इंग्रजीकरण लेखकाने ‘लॉर्ड ऑफ अंब्रेला’ असे केल्याचे संकेतस्थळावरील हा लेख दाखवून देतो.

आ. ‘anoopverma.com’मधील लिखाण : या विस्तृत लेखात डॅलरिंपल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजा न म्हणता ‘वॉर लॉर्ड’ म्हणणे आणि त्यांना किरकोळ व्यक्तीमत्त्व असे काहीसे सुचवतांना नादिरशाहला मात्र मोठे व्यक्तीमत्त्व असे ध्वनित केल्यातील विरोधाभास इत्यादी सूत्रे सांगितली आहे. अभ्यासकांनी ती स्वत: पहावीत. (इतिहासात ‘वॉर लॉर्ड’ ही संज्ञा जे खासगी सैन्य उभारून लुटपाट करतात, ज्यांची सत्ता केवळ ‘शक्ती’ आणि ‘भीती’ यांवर आधारलेली असते त्यांच्यासाठी वापरतात. त्यांची सत्ता अवैध मानली जाऊ शकते. यासंदर्भात आकलनासाठी वर्तमानकाळातील उदाहरण म्हणजे तालिबान सत्ताधीश होण्याआधी ५-१० वर्षे त्याचे घटक असलेल्या सिराजउद्दीन हक्कानीसारख्यांना ‘वॉर लॉर्ड’ म्हटले जात असे. याउलट राजाला (किंग) सहसा वंशपरंपरागत किंवा धार्मिक ‘वैधता’ असते आणि लोक त्याला कायद्याने सत्ताधीश मानतात.) खरेतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ‘स्वतंत्र सार्वभौम राजा’ असे घोषित करण्यासाठीच करण्यात आला होता.

इ. श्री. सुधीर लोहोगावकर यांचा संदर्भासहित लेख : या लेखकाने (eSamskriti.com) आपल्या प्रदीर्घ लेखात ‘दी अनार्की’मध्ये अनेक ठिकाणी उल्लेखित घटनांचे दिनांक, त्यांची स्थळे यांच्या अचूकतेसंदर्भात लेखक गंभीर नसल्याचे, तसेच ‘हे लिखाण मोगलांच्या दृष्टीकोनातून असून त्यात मराठ्यांना आक्रमक इत्यादी दाखवण्यात आले आहे’, असे म्हटले आहे. या लेखात त्यांनी जागोजागी संदर्भही दिले आहेत. अधिक माहितीसाठी अभ्यासकांनी ते स्वत: वाचावे.

६. प्रस्तुत लेखाचे कारण 

प्रसिद्ध झालेल्या वरील लेखांतून काही प्रमाणात ‘दी अनार्की’मधील सदोषता दाखवण्यात आली असली, तरी वर अधोरेखित सूत्रांसंबंधाने विशेष उल्लेख वा तितकेसे स्पष्टीकरण नाही. ‘दी अनार्की’ वाचल्यास या उल्लेखांवरून सध्याच्या काळातील अमराठी मनाच्या वाचकाला वाटेल की, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे ‘लुटारू’ होते, जणू ‘लूट करणे’, हीच त्यांची सामान्य नीती होती, तसेच पुस्तकातील राजांच्या मावळ्यांना उद्देशून संबोधित असलेले ‘नेकेड’, ‘स्टार्व्हड’ आणि ‘रास्कल’ हे शब्दही खटकतात. या सगळ्यामुळे थोडक्यात डॅलरिंपल यांच्या पुस्तकाची प्रसिद्धी पहाता त्यातून अप्रत्यक्षपणे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे सैन्य अणि त्यांचे कार्य यांविषयी चुकीचा संदेश ध्वनित होत आहे, असे दिसते. हे चुकीचे असून तसे चुकीचे का आहे, हे सांगणे आणि यातून असे का होते, हे स्पष्ट होणार्‍या महत्त्वाच्या सूत्रसंबंधाने योग्य ते प्रबोधन होणे, हा या लेखाचा उद्देश आहे.

७. ‘नेकेड’, ‘स्टार्व्हड’ आणि ‘रास्कल’ यांचे अर्थ अन् छत्रपती शिवरायांनी केलेल्या वसुलीला ‘लूट’ म्हणणे चुकीचे ! 

‘लूट’ किंवा ‘लुटारू’, ‘नेकेड’, ‘स्टार्व्हड’ आणि ‘रास्कल’ या शब्दातून काय ध्वनित होते, याविषयी क्षणभर विचार करा. ‘रास्कल’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ ‘धूर्त’ किंवा ‘नीच’, ‘तत्त्वहीन’ किंवा ‘अप्रामाणिक’ (a mean, unprincipled, or dishonest person), असा होतो. आता आपण वरील उल्लेखांच्या सापेक्ष थोडी वस्तूस्थिती समजून घेऊ. ‘नेकेड’ शब्दाचा शब्दश: अर्थ आहे नग्न. ‘स्टार्व्हड’, म्हणजे उपाशी. सोबत मराठी माणूस मुळातच लहान चणीचा आहे, याची नोंद घ्यावी.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.२.२०२६)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1009886.html

संपादकीय भूमिका

छत्रपती शिवरायांविषयी चुकीचे लिखाण प्रसिद्ध होत असतांना शिवप्रेमींनी त्याचे खंडण करून सत्य इतिहास मांडणे अनिवार्य !