Shanishingnapur Devasthan Scam : शनिशिंगणापूर देवस्थान ऑनलाईन पूजा अ‍ॅप प्रकरणात अधिकारी आणि कर्मचारी यांनी केला अपहार !

७७ लाख ४६ सहस्र रुपयांचा अपहार !

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले श्री शनैश्चर देवस्थान

अहिल्यानगर – शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्चर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन आणि पूजा ॲपमधील अपहार प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण करून येथील सायबर पोलिसांनी नेवासा न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट केले आहे. देवस्थानाच्या अधिकृत अनुमती असलेल्या ॲपमधूनच अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात अनुमाने ७७ लाख ४६ सहस्र ३४१ रुपयांचा अपहार झाल्याचे अन्वेषणात स्पष्ट झाले असून ९ संशयित आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.

श्री शनैश्चर देवस्थानचे ऑनलाईन दर्शन आणि पूजा ॲप

१. ॲप अपहारप्रकरणाचे अन्वेषण पोलिसांनी हाती घेतल्यानंतर देवस्थानाच्या तत्कालीन अधिकारी-कर्मचारी यांनी ॲपधारकांना दिलेले अनुमती पत्र नव्याने सिद्ध करून कर्मचार्‍यांच्या अधिकोष खात्यावर आलेल्या रकमेविषयी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

२. कर्मचारी संजय पवार या कर्मचार्‍याने ॲपचे व्यवस्थापन पहाणार्‍या एकाला धमकावून बनावट अनुमती पत्र आणि हिशोब पोलिसांकडे सादर करण्यास भाग पाडल्याचे, तसेच स्वतःच्या स्वाक्षरीने पूजा करण्याची अनुमती दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

३. या संपूर्ण प्रकरणातून देवस्थानचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीच अपहाराचा डाव रचल्याचे स्पष्ट झाले असून भाविकांच्या श्रद्धेचा अपलाभ घेतल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.

४. देवस्थानचे विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी, पुजारी, ॲप मालक यांच्या अनुमाने १०० अधिकोष खात्यांची सविस्तर माहिती घेतल्यानंतर हा अपहार उघड झाला आहे. हा अपहार जवळपास ५०० कोटी रुपयांचा असल्याचा दावा केला गेला.

हे ही वाचा → देवस्थान प्रशासनातील अपव्यवहारामुळे श्री शनैश्वर मंदिर ट्रस्ट बरखास्त

५. हे प्रकरण विधीमंडळात गाजल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर या चौकशीला गती आली होती.

६. अन्वेषणाच्या वेळी असे निष्पन्न झाले की, देवस्थानाने अनुमती न दिलेल्या ॲपमधून ऑनलाईन सुविधेद्वारे पूजा करण्याचे आरक्षण झालेच नव्हते; मात्र देवस्थानाने ‘देवधाम’, ‘श्रीमंदिर’, ‘उत्सव’, ‘वामा’ आणि ‘शेमारू’ या ५ ॲप्सला ऑनलाईन पूजा, तसेच लाईव्ह दर्शन यांसाठी आरक्षण करण्याची अधिकृत अनुमती दिली होती.

संपादकीय भूमिका

  • हा आहे मंदिर सरकारीकरणाचा परिणाम !
  • कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शनैश्चर देवस्थानामध्ये भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या पैशांचा अपहार होणे, हा अत्यंत संतापजनक आणि गंभीर प्रकार आहे !