विश्वकल्याणासाठी आध्यात्मिक मूल्यांवर आधारित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा संकल्प करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा उलगडलेला जीवनपट ! 

‘भारत ही संतांची भूमी आहे. भारतात अनेक थोर संतांनी जन्म घेतला. या संतांनी साधनेद्वारे ईश्वराच्या ‘सत्-चित्-आनंद’ या स्वरूपाची अनुभती घेतली. ‘या अवस्थेला प्राप्त होण्यातच मनुष्यजन्माची सार्थकता आहे’, हे जाणून त्यांनी लोकांनाही साधना शिकवून त्यांना आनंदाचा मार्ग दाखवला. काही संतांनी लोकांना साधना शिकवण्यासमवेतच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचेही महान कार्य केले. सध्याच्या २१ व्या शतकात अशा प्रकारचे कार्य करणारे संत म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! प्रस्तुत लेखाद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये, त्यांचा जीवनप्रवास, त्यांचे अध्यात्मप्रसारचे आणि राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य आदींचे ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून विश्लेषण केले आहे.

२८ डिसेंबर २०२५ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांची काही असामान्य वैशिष्ट्ये आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/991346.html

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण

२ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले आध्यात्मिक कार्य 

२ उ १. अध्यात्मप्रसार : गुरूंच्या आज्ञेनुसार प.पू. डॉ. आठवले यांनी अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू केले. वर्ष १९९१ ते १९९९ या कालावधीत त्यांनी अध्यात्माचे अभ्यासवर्ग घेणे, गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करणे, अध्यात्मावरील ग्रंथांचे संकलन करणे, जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करून त्यांना मार्गदर्शन करणे, सार्वजनिक सभा घेणे इत्यादी कार्य केले. त्यामुळे सहस्रो जिज्ञासू आणि साधक त्यांच्याशी जोडले गेले.

२ उ १ अ. ज्योतिष विश्लेषण : गुरुदेवांच्या जन्मकुंडलीत प्रथम स्थानाचा स्वामी बुध आणि नवम स्थानाचा स्वामी शनि यांची बाराव्या स्थानात युती आहे, तसेच गुरु ग्रह बाराव्या स्थानात आहे. हे योग व्यापक आध्यात्मिक कार्य दर्शवतात. गुरुदेवांच्या कुंडलीत वर्ष १९९५ मध्ये गुरु ग्रहाची महादशा संपली. त्यानंतर शनि ग्रहाची महादशा चालू झाली. गुरु ग्रहाची महादशा असतांना गुरुदेवांची अधिकतर व्यष्टी साधना घडली; म्हणजे अध्यात्म समजून घेणे, प्रत्यक्ष साधना करणे, गुरुप्राप्ती होणे, तन-मन-धनाचा त्याग करणे, गुरुसेवा करणे इत्यादी. वर्ष १९९५ मध्ये शनि महादशा चालू झाल्यानंतर त्यांची समष्टी साधना मोठ्या प्रमाणात चालू झाली.

२ उ २. सनातन संस्थेची स्थापना : अध्यात्मप्रसाराच्या कार्याची व्याप्ती वाढल्यानंतर गुरुदेवांनी २२.३.१९९९ या दिवशी सनातन संस्थेची स्थापना केली. ‘सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आनंद कसा मिळवावा ? आनंदप्राप्तीसाठी साधना कशी करावी ?’, याचे तात्त्विक आणि प्रायोगिक स्तरांवरील मार्गदर्शन सनातन संस्थेद्वारे केले जाते. सनातन संस्थेच्या वतीने साधना-सत्संग, बालसंस्कारवर्ग, साधना-शिबिरे, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, धर्मशिक्षण देणारी प्रदर्शने, गुरुपौर्णिमा महोत्सव आदी उपक्रमांचे आयोजन केले जाते.

२ उ ३. सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा : सनातनने नोव्हेंबर २०२५ पर्यंत ‘अध्यात्म, साधना, व्यक्तिमत्त्व विकास, हिंदु आचारांमागील शास्त्र, धार्मिक कृतींमागील शास्त्र, देवतांच्या उपासनेमागील शास्त्र, बालसंस्कार, आपत्काळातील जीवितरक्षण, हिंदु राष्ट्राची स्थापना, संतांची चरित्रे’ आदी विषयांवर ३६८ ग्रंथ-लघुग्रंथ प्रकाशित केले असून त्यांपैकी २७० ग्रंथ-लघुग्रंथांचे संकलन स्वत: गुरुदेवांनी केले आहे, तसेच अन्य ९६ ग्रंथ-लघुग्रंथांच्या संकलनाच्या सेवेत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. या ग्रंथांमधील ५० टक्के ज्ञान गुरुदेवांना आतून स्फुरलेले आहे, तर २० टक्के ज्ञान हे साधकांना सूक्ष्मातून मिळालेले ईश्वरी ज्ञान आहे. गुरुदेवांच्या जन्मकुंडलीतील बाराव्या स्थानातील बुध आणि गुरु हे ग्रह ग्रंथनिर्मिती दर्शवतात.

महर्षींनी उलगडलेले गुरुदेवांचे अवतारत्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

थोर महर्षींनी सहस्रो वर्षांपूर्वी नाडीपट्ट्यांमध्ये भविष्य लिहून ठेवले आहे. गुरुदेवांच्या कुंडलीत बुध महादशा चालू झाल्यानंतर (वर्ष २०१४ नंतर) त्यांच्या जीवनात सप्तर्षींचे आगमन झाले. तेव्हापासून सप्तर्षींनी ‘सप्तर्षि जीवनाडीपट्टी’च्या माध्यमातून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्म धर्मसंस्थापनेचे अवतारी कार्य करण्यासाठी झाला आहे’, असे वेळोवेळी सांगून त्यांचे अवतारत्व उलगडले आहे.

– श्री. यशवंत कणगलेकर आणि श्री. राज कर्वे

२ उ ४. आश्रमांची निर्मिती : ‘साधकांना पूर्णवेळ साधनेसाठी अनुकूल वातावरण उपलब्ध व्हावे’, यासाठी गुरुदेवांनी आश्रमांची निर्मिती केली आहे. आश्रमातील साधक ईश्वरप्राप्तीसाठी नियमित साधना करतात, तसेच राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या कार्यात त्यांचे योगदान देतात. सनातनच्या आश्रमांमध्ये ‘सनातन प्रभात’ नियत्कालिके, ‘सोशल मिडिया’ (समाजमाध्यमे), ग्रंथ-निर्मिती, कला, ध्वनीचित्रीकरण, आध्यात्मिक संशोधन आदींशी संबंधित सेवा चालते. आश्रमांमध्ये राखली जाणारी स्वयंशिस्त, स्वच्छता, नियोजनबद्धता आणि साधकांमधील नम्रता, प्रेमभाव, समर्पणभाव, यांमुळे सनातनच्या आश्रमांमध्ये पुष्कळ प्रमाणात सात्त्विकता अनुभवास येते. सनातनचे आश्रम म्हणजे जणू भावी हिंदु राष्ट्राच्या प्रतिकृती आहेत. गुरुदेवांच्या जन्मकुंडलीतील बाराव्या स्थानातील गुरु आणि शनि हे ग्रह आश्रमांची निर्मिती दर्शवतात.

२ उ ५. आध्यात्मिक संशोधनाचे कार्य : गुरुदेवांचा मूळ पिंड संशोधनाचा आहे. पूर्वी ‘संमोहन-उपचारतज्ञ’ म्हणून कार्यरत असतांना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन केले. नंतर आध्यात्मिक क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर त्यांनी अध्यात्मशास्त्रातही विपुल संशोधन केले. त्यांनी ‘सूक्ष्मातील वाईट शक्ती’ यांमुळे मनुष्याला होणार्‍या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांचा अभ्यास केला आणि त्रासांच्या निवारणासाठी सोपे, अभिनव आणि बिनखर्चिक उपाय शोधले, उदा. वास्तूशुद्धी करणे, पंचतत्त्वांशी संबंधित उपाय करणे, विकार-निर्मूलनासाठी नामजप करणे, प्राणशक्तीतील अडथळे शोधून ते मुद्रा आणि नामजप यांद्वारे दूर करणे, रिकाम्या खोक्यांचे उपाय करणे इत्यादी. गुरुदेवांच्या कुंडलीतील बुध, शनि आणि हर्षल यांची असलेली युती संशोधनकार्यासाठी अत्यंत अनुकूल आहे.

२ उ ६. सूक्ष्म ज्ञानाच्या संदर्भातील कार्य : वर्ष १९८२ पासून, म्हणजे साधनेत येण्याच्या आधीपासूनच गुरुदेवांना सूक्ष्मातील कळू लागले. आरंभीच्या काळात त्यांना एखाद्या प्रश्नाच्या उत्तराविषयी ‘हो’ किंवा ‘नाही’, असे उत्तर सूक्ष्मातून कळायचे. साधनेत आल्यानंतर त्यांना या उत्तरांचा कार्यकारणभाव कळू लागला. पुढे त्यांनी साधकांनाही ‘सूक्ष्मातील गोष्टी कशा ओळखायच्या ?’, हे शिकवून त्यांनी साधकांची सूक्ष्मातील कळण्याची क्षमता विकसित केली. गुरुदेवांच्या कुंडलीत चंद्र, नेपच्यून आणि हर्षल या ३ ग्रहांचा एकमेकांशी नवपंचमयोग (शुभयोग) आहे. हा योग सूक्ष्मातील कळण्याची क्षमता दर्शवतो.

२ उ ७. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना : जगभरात भौतिक शिक्षण देणारी अनेक विद्यापिठे असली, तरी अध्यात्मशास्त्राचे परिपूर्ण, तसेच ईश्वरप्राप्तीचे शिक्षण देणारे एकही विद्यापीठ नाही. यासाठी २२.३.२०१४ या दिवशी गुरुदेवांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ हा न्यास (ट्रस्ट) स्थापन केला असून त्याद्वारे हे विश्वविद्यालय गोवा येथे उभारले जाईल. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ या न्यासाद्वारे सध्या संगीत, कला, ज्योतिष, वास्तू, हस्त-पादसामुद्रिक आदी भारतीय शास्त्रांमध्ये संशोधन चालू आहे. तसेच ‘व्यक्तीवर सत्त्व, रज आणि तम यांच्या स्पंदनांचा परिणाम कसा होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी व्यक्तीची प्रभावळ (ऑरा) मोजणार्‍या आधुनिक वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन केले जाते. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ न्यासाची स्थापना होण्याच्या वेळी गुरुदेवांच्या कुंडलीत शनि ग्रहाची महादशा आणि गुरु ग्रहाची अंतर्दशा चालू होती. हे दोन्ही ग्रह आध्यात्मिक स्वरूपाचे आहेत.

गुरुदेवांच्या जन्मकुंडलीच्या अभ्यासाद्वारे लक्षात आलेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

अ. कुंडलीतील धर्मत्रिकोण हा (१, ५, ९ ही स्थाने) व्यक्तीचा नैसर्गिक कल आणि तिचे जीवितकार्य दर्शवतो. गुरुदेवांच्या कुंडलीत १ ल्या स्थानाचा स्वामी बुध आणि ९ व्या स्थानाचा स्वामी शनि यांची १२ व्या स्थानात युती आहे. हा उच्च प्रतीचा आध्यात्मिक योग आहे. त्यामुळे ‘लोकांना साधना करण्यासाठी मार्गदर्शन करून समाजाची एकंदर सात्त्विकता वाढवणे’ हे त्यांचे जीवितकार्य झाले. कुंडलीत ५ व्या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह असून तो मीन या सत्त्वगुणी राशीत आहे. हा योग ‘व्यापकता’ (इतरांचे हित साधणे) आणि ‘प्रीती’ (इतरांवर निरपेक्ष प्रेम करणे) ही वैशिष्ट्ये दर्शवतो.

श्री. यशवंत कणगलेकर आणि श्री. राज कर्वे

आ. कुंडलीतील मोक्षत्रिकोण हा (४, ८, १२ ही स्थाने) व्यक्तीचा त्याग आणि तिने समाजासाठी केलेले कार्य दर्शवतो. गुरुदेवांच्या कुंडलीत ४ थ्या स्थानाचा स्वामी बुध आणि ८ व्या स्थानाचा स्वामी शनि यांची १२ व्या स्थानात युती आहे, तसेच १२ व्या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह दशम (कर्म) स्थानात आहे. त्यामुळे त्यांचा मोक्षत्रिकोणही बलवान असून त्यांनी समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आपले आयुष्य समर्पित केले.

इ. गुरुदेवांच्या कुंडलीत बाराव्या स्थानात एकत्र असणारे बुध, गुरु, शनि आणि हर्षल हे ग्रह ‘युगपुरुषत्व’ दर्शवतात. अशा दुर्मिळ योगांवर जन्मणार्‍या व्यक्ती या समाजाच्या उद्धारासाठी अवतरलेल्या दैवी विभूती असतात. अशा विभूतीच ‘हिंदु राष्ट्रा’च्या (ईश्वरी राज्याच्या) स्थापनेसारखे महान ध्येय ठेवू शकतात !


ई. गुरुदेवांच्या कुंडलीत परस्पर-विरोधी स्वभाव असणार्‍या ग्रहांमध्ये (शत्रूग्रहांमध्ये) कुयोग नाहीत, उदा. बुध-मंगळ, शनि-मंगळ, रवि-शनि इत्यादी. यावरून ‘गुरुदेवांचे व्यक्तीगत प्रारब्ध आणि देवाण-घेवाण हिशोब जन्मतःच अल्प होते आणि विशिष्ट कार्याच्या पूर्तीसाठी त्यांचा जन्म झाला आहे’, असे लक्षात येते.’


– श्री. यशवंत कणगलेकर (ज्योतिष विशारद) आणि श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.७.२०२५)

२ ऊ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी केलेले कार्य

२ ऊ १. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे दोन उद्देश

२ ऊ १ अ. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा पहिला उद्देश म्हणजे, भारतात हिंदु धर्माचे आणि हिंदूंचे रक्षण करणे : भारतात काही दशकांपासून धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी, ख्रिस्ती मिशनरी, धर्मांध इस्लामी गट, तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी इत्यादी राष्ट्र-धर्मविरोधी शक्ती भारतातील हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करू पहात आहेत. हिंदु धर्मावर विविध आघात, उदा. हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर, हिंदूंचा बुद्धीभेद करणे, विविध प्रकारचे जिहाद, देवतांचे विडंबन, मंदिरांचे सरकारीकरण, गोहत्या इत्यादी होत आहेत. ‘हिंदु धर्म हा भारताचा प्राण आहे. हिंदु धर्म नष्ट झाला, तर राष्ट्राचाही विनाश होईल’, हे जाणून गुरुदेवांनी वर्ष १९९८ मध्ये ‘भारतात ईश्वरी राज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करणे’, हाच हिंदूंच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवरील एकमेव उपाय आहे’, हा विचार जाहीरपणे मांडला.

२ ऊ १ अ १. हिंदु जनजागृती समिती : गुरुदेवांच्या धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या विचारांतून प्रेरणा घेऊन ‘हिंदु जनजागृती समिती’ची स्थापना झाली. या समितीच्या माध्यमातून धर्मशिक्षणवर्ग, राष्ट्र-धर्म जागृतीपर व्याख्याने, हिंदु राष्ट्र-जागृती सभा, अखिल भारतीय हिंदु अधिवेशने आदी उपक्रम राबवले जातात. यामुळे सर्वत्रचे हिंदुत्वनिष्ठ संघटित होत असून हिंदु धर्मावर होणार्‍या विविध आघातांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा दिला जात आहे.

२ ऊ १ आ. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा दुसरा उद्देश म्हणजे, सत्त्वगुणी समाज घडवणे : ‘हिंदु राष्ट्र म्हणजे केवळ हिंदूंचे राज्य’ असा संकुचित दृष्टीकोन नसून ‘विश्वकल्याणासाठी कार्यरत असलेल्या सत्त्वगुणी लोकांचे राष्ट्र’, अशी ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाची आध्यात्मिक व्याख्या गुरुदेवांनी केली आहे. ‘हिंदु राष्ट्र (ईश्वरी राज्य) स्थापन करणे’, ही केवळ राजकीय, सांस्कृतिक, वांशिक किंवा भौगोलिक प्रक्रिया नसून ती मुख्यत्वेकरून आध्यात्मिक प्रक्रिया आहे. हिंदु राष्ट्रातील शिक्षण, न्याय, राज्य इत्यादी व्यवस्था आध्यात्मिक मूल्यांवर आधारित असल्याने त्या लोकांचा भौतिक आणि मानसिक उत्कर्षासह आत्मिक विकासही साधतील ! ‘मानवाला भौतिकता, स्वार्थ, संकुचितता, अज्ञान, दुःख यांतून बाहेर काढून दिव्यता, व्यापकता, ज्ञान, सत्य, आनंद, प्रेम यांच्याकडे घेऊन जाणे’, हे हिंदु राष्ट्राचे दूरगामी ध्येय आहे !

२ ऊ १ आ १. ज्योतिष विश्लेषण : गुरुदेवांच्या जन्मकुंडलीतील बाराव्या स्थानातील गुरु, शनि आणि हर्षल हे ग्रह सामाजिक परिवर्तन घडवण्याची क्षमता दर्शवतात. गुरु, शनि आणि हर्षल हे ३ मंदगती ग्रह असून ते १४० किंवा १८० वर्षांनंतर एकत्र (युतीत) येतात. यापूर्वी वर्ष १९४० ते १९४२ या काळात म्हणजे दुसर्‍या महायुद्धाच्या काळात हे तिन्ही ग्रह एकत्र आले होते. गुरुदेवांच्या जन्म त्याच कालावधीतील, म्हणजे ६.५.१९४२ या दिवशी आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही ग्रह त्यांच्या कुंडलीत १२ व्या (मोक्ष, अध्यात्म) स्थानात आहेत. त्यामुळे गुरुदेवांनी भौतिक किंवा मानसिक स्तरापेक्षा आध्यात्मिक स्तरावरील परिवर्तनाला प्राधान्य दिले.

२ ए. गुरुदेवांच्या कुंडलीतील शनि ग्रहाची महादशा, म्हणजे परीक्षेचा कठीण काळ असणे

गुरुदेवांच्या कुंडलीत वर्ष १९९५ ते वर्ष २०१४ या कालावधीत शनि ग्रहाची महादशा होती. शनि ग्रहाची महादशा ही व्यक्तीची जणू परीक्षाच असते. शनि ग्रहाच्या महादशेत व्यक्तीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, तसेच आपल्या संकल्पावर दृढ रहावे लागते. गुरुदेवांच्या संदर्भात या काळाचे अवलोकन केल्यावर लक्षात येते की, गुरुदेवांनी या काळात अध्यात्मप्रसार आणि राष्ट्र-धर्मरक्षणाचे कार्य यांची घडी बसवण्यासाठी स्वतः अथक परिश्रम घेतले. हा काळ असा होता, जेव्हा धर्म, अध्यात्म, हिंदुत्व यांचे नाव घेणेही कठीण होते. बुद्धीवाद, पुरोगामित्व, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण, साम्यवाद, भौतिकवाद आदींमुळे राष्ट्र, धर्म आणि संस्कृती पोखरली जात होती. गुरुदेवांनाही या काळात तथाकथित बुद्धीवादी, पुरोगामी आणि समाजकंटक यांच्याकडून विविध प्रकारचे त्रास झाले. सनातनवर अन्याय्य बंदी आणण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु गुरुदेवांच्या कार्याचा पाया सत्यावर अधिष्ठित असल्यामुळे विरोधकांचे सर्व प्रयत्न विफल ठरले.

२ ऐ. गुरुदेवांच्या कुंडलीतील बुध ग्रहाची महादशा, म्हणजे त्यांच्या तपश्चर्येचे मिळालेले फळ असणे

वर्ष २०१४ मध्ये गुरुदेवांच्या कुंडलीत शनि ग्रहाची महादशा संपून बुध ग्रहाची महादशा चालू झाली. शनि ग्रहाच्या महादशेत गुरुदेवांनी आध्यात्मिक कार्याचे जे रोप लावले होते, त्याचे बुध ग्रहाच्या महादशेत वटवृक्षात रूपांतर झाले. गुरुदेवांचे अध्यात्मप्रसार आणि राष्ट्र-धर्मरक्षणाचे कार्य अनेक पटींनी वाढले. गुरुदेवांनी सिद्ध केलेल्या संतांनी अणि साधकांनी हे कार्य देश-विदेशांत पोचवले. परिणामी आज समाजात परिर्वतन दिसू लागले आहे. सनातन धर्मासाठी काळ अनुकूल होत चालला आहे. हिंदू संघटित होत आहेत. हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन होत आहे. हिंदु राष्ट्राच्या दिशेने भारत अग्रेसर होत आहे.

२ ऐ १. गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडणे : गुरुदेवांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा भव्यदिव्य कार्यक्रम झाला. या महोत्सवात संत, धर्माचार्य, विचारवंत, राजकीय नेते यांसह १ सहस्रहून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि ३० सहस्रांहून अधिक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते. एकूण ७९ वृत्तवाहिन्यांद्वारे १५ कोटींहून अधिक दर्शकांपर्यंत सनातन राष्ट्राचा संदेश पोचला. या महोत्सवाच्या रूपाने भारतात सनातन राष्ट्राचा शंखनाद झाला, म्हणजे त्याचे बीज रोवले गेले. आगामी काही वर्षांत या बिजाचे वटवृक्षात रूपांतर होईल, हे निश्चित ! (नुकताच नवी देहलीतील भारत मंडपम् येथेही १३ आणि १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. या कार्यक्रमात २ सहस्र ४०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. – संपादक)

(समाप्त)

– श्री. यशवंत कणगलेकर (ज्योतिष विशारद) आणि श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.७.२०२५)

संपर्क : [email protected]

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक