ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा उलगडलेला जीवनपट !
‘भारत ही संतांची भूमी आहे. भारतात अनेक थोर संतांनी जन्म घेतला. या संतांनी साधनेद्वारे ईश्वराच्या ‘सत्-चित्-आनंद’ या स्वरूपाची अनुभती घेतली. ‘या अवस्थेला प्राप्त होण्यातच मनुष्यजन्माची सार्थकता आहे’, हे जाणून त्यांनी लोकांनाही साधना शिकवून त्यांना आनंदाचा मार्ग दाखवला. काही संतांनी लोकांना साधना शिकवण्यासोबतच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचेही महान कार्य केले. सध्याच्या २१ व्या शतकात अशा प्रकारचे कार्य करणारे संत म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! प्रस्तुत लेखाद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये, त्यांचा जीवनप्रवास, त्यांचे अध्यात्मप्रसाराचे आणि राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य आदींचे ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून विश्लेषण केले आहे.
(भाग १)

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांची काही असामान्य वैशिष्ट्ये
१ अ. सामाजिक समस्यांमागील मूळ कारण शोधून त्यावरील उपाय सांगणे
‘अध्यात्मज्ञान’ ही भारताची समृद्ध परंपरा आणि अनमोल ठेवा आहे; परंतु भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताची शिक्षणव्यवस्था, न्यायव्यवस्था, राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था इत्यादी भारतीय संस्कृतीच्या मूल्यांवर अधिष्ठित न होता पाश्चात्त्य विचारसरणीवर उभी राहिली. साहजिकच अध्यात्मज्ञान आणि नीतीमूल्ये यांना भारतीय व्यवस्थेत स्थान मिळाले नाही. त्यामुळे समाजात रज-तम गुणांचे प्राबल्य वाढून स्वार्थ, संकुचितपणा, बहिर्मुखता, अनैतिकता, नास्तिकता, भ्रष्टाचार यांचे पेव फुटले. परिणामी सामाजिक समस्या वाढून समाज अधिक दुःखी झाला. ‘अशा काळात समाजाला पुन्हा सुखी व्हायचे असेल, तर लोकांनी साधना करून त्यांच्यातील स्वभावदोषांचे निर्मूलन करायला हवे. असे केल्याने समाजाची सात्त्विकता वाढून तो खर्या अर्थाने सुखी होईल. हे घडण्यासाठी समाजात आध्यात्मिक स्तरावर परिर्वतन होण्याची आवश्यकता आहे’, असा विचार गुरुदेवांनी प्रथम मांडला.

१ आ. ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगणे
‘कर्म, ज्ञान, ध्यान, भक्ती आदींपैकी कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी शिष्याची खरी उन्नती गुरुकृपेने होते. गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी शिष्याने गुरूंना अपेक्षित असलेली कृती करणे आवश्यक असते’, हा सिद्धांत गुरुदेवांनी मांडला; यालाच ‘गुरुकृपायोग’ म्हणतात. गुरुकृपायोगानुसार साधनेची २ अंग आहेत – व्यष्टी साधना आणि समष्टी साधना. व्यष्टी साधना म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाची साधना (उदा. स्वभावदोष-निर्मूलन, नामजप, त्याग करणे इत्यादी), तर समष्टी साधना म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाची साधना (उदा. अध्यात्मप्रसार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती करणे इत्यादी). व्यष्टीसोबत समष्टी साधना केल्यामुळे साधकाची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होते. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यामुळे जून २०२५ पर्यंत सनातनचे १३० साधक संतपदी विराजमान झाले आहेत आणि १ सहस्रहून अधिक साधक संतपदाकडे वाटचाल करत आहेत.
१ इ. आपत्काळाची पूर्वसिद्धता करून घेणे
संतांकडे द्रष्टेपण असते. ‘आगामी काळ आपत्काळाचा आहे’, असे गुरुदेवांनी सांगितले आहे. पूर, भूकंप, महामारी यांसारख्या नैसर्गिक आपत्ती, तसेच गृहयुद्ध, महायुद्ध यांसारखी संकटे उद्भवल्यास आपले जीवन धोक्यात येऊ नये, यासाठी गुरुदेवांनी प्रथमोपचार प्रशिक्षण, औषधी वनस्पतींची लागवड, बिंदूदाबन-उपचार, नामजप-उपाय, प्राणशक्तीवहन उपाय इत्यादी शिकून घेण्यास समाजाला प्रोत्साहित केले. यासाठी त्यांनी ‘आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका संकलित करून प्रकाशित केली.
१ ई. साधनेच्या बळावर स्वतःच्या महामृत्यूयोगावर मात करणे
अनेक संत आणि ज्योतिषी यांनी ‘गुरुदेवांचा महामृत्यूयोग वर्ष २००७ मध्ये आहे’, असे सांगितले होते. गुरुदेवांच्या कुंडलीत अष्टम (मृत्यू) स्थानात ‘चंद्र’ असून प्रथम (देह) स्थानात ‘मंगळ’ हे ग्रह आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेकदा मृत्यूयोग आले; मात्र त्यांच्या उच्च आध्यात्मिक स्थितीमुळे त्यांनी मृत्यूयोगांवर मात केली आणि ‘साधनेच्या बळावर मृत्यूयोगासारखी संकटेही टाळता येतात’, हे सिद्ध केले.
१ उ. गुरुदेवांची लक्षावधी किलोमीटर दूरवर पोचणारी सकारात्मक प्रभावळ !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन विभागाने गुरुदेवांच्या वय वर्षे २ ते ८२ या कालावधीतील छायाचित्रांची सकारात्मक ऊर्जा लोलकाने मोजली. त्यांपैकी त्यांच्या वय वर्षे ८२ च्या छायाचित्राची सकारात्मक प्रभावळ तब्बल २,७२,६०० किलोमीटर इतकी आहे ! यावरून गुरुदेवांमधील चैतन्य किती दूरपर्यंत पोचते, हे लक्षात येते.
प्रायोगिक स्तरावर साधना शिकवणे

‘अध्यात्मात तात्त्विक ज्ञानाला केवळ २ टक्के, तर प्रत्यक्ष कृती करण्याला ९८ टक्के महत्त्व आहे’, हे गुरुदेवांनी सांगितले. ते म्हणतात, ‘साधनेतील एखादी कृती केली की, अनुभूती येते, अनुभूतीमुळे श्रद्धा वाढते, श्रद्धेमुळे भाव जागृत होतो अणि जेथे भाव आहे, तेथे देव आहे !’ गुरुदेवांच्या अशा प्रायोगिक शिकवणीमुळे साधक अध्यात्म प्रत्यक्ष जगण्याचा प्रयत्न करतात.
– श्री. यशवंत कणगलेकर (ज्योतिष विशारद) आणि श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.७.२०२५)
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण
गुरुदेवांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना आणि गुरुदेवांनी केलेले व्यापक कार्य यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण आता पाहूया.
२ अ. साधनापूर्व जीवन
२ अ १. सात्त्विक कुटुंबात जन्म होणे आणि कुटुंबातील सर्वांची अध्यात्मात प्रगती होणे : गुरुदेवांचा जन्म प.पू. (कै.) बाळाजी आठवले आणि पू. (कै.) सौ. नलिनी आठवले यांच्या पोटी झाला. गुरुदेवांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर सात्त्विकतेचे अन् साधनेचे संस्कार केले. ते दोघेही संत होते. गुरुदेवांना एकूण ४ बंधू. त्यांपैकी २ ज्येष्ठ बंधू (सद्गुरु (कै.) डॉ. वसंत आठवले आणि पू. अनंत आठवले) अन् १ कनिष्ठ बंधू (पू. डॉ. विलास आठवले) हे संतपदी पोचले, तर १ कनिष्ठ बंधू ((कै.) डॉ. सुहास आठवले) यांचीही आध्यात्मिक उन्नती झाली. अशा प्रकारे ‘एकाच कुटुंबातील सर्व सदस्य आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असणे’, हे सध्याच्या काळातील एक दुर्मिळ उदाहरण आहे.

२ अ १ अ. ज्योतिष विश्लेषण : जन्मकुंडलीतील चतुर्थ स्थान हे व्यक्तीवर बालपणी झालेले संस्कार दर्शवते, तर द्वितीय स्थान हे कुटुंबाची एकंदर स्थिती दर्शवते. गुरुदेवांच्या कुंडलीत चतुर्थ स्थानाचा स्वामी बुध ग्रह ‘बाराव्या’ (मोक्ष) स्थानात असून तो शनि ग्रहाच्या युतीत आहे. कुंडलीतील द्वितीय स्थानाचा स्वामी चंद्रही अष्टम या आध्यात्मिक स्थानात आहे. हे योग व्यक्तीच्या घरात आध्यात्मिक वातावरण असल्याचे आणि कुटुंबातील सदस्य आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असल्याचे दर्शवतात.
२ अ २. वैद्यकीय शिक्षण आणि मनोविकारांवरील संमोहन-उपचारपद्धतींविषयी संशोधन : वर्ष १९६१ ते १९६४ या कालावधीत गुरुदेवांनी ‘ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई’ येथे वैद्यकीय शिक्षण घेऊन ‘एम्.बी.बी.एस्.’ ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी मुंबईतील रुग्णालयांत ५ वर्षे नोकरी केली. या कालावधीत त्यांनी रुग्णांचे मनोविकार बरे करण्याच्या दृष्टीने संमोहनशास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी ४.७.१९७१ या दिवशी मनोविकारांवरील संमोहन-उपचारपद्धतींविषयी प्रगत संशोधन करण्यासाठी इंग्लंडला प्रस्थान केले.
२ अ २ अ. ज्योतिष विश्लेषण : गुरुदेवांच्या कुंडलीत बुध, शनि आणि हर्षल यांची युती आहे. हा योग उत्तम संशोधकबुद्धी आणि संशोधनकार्य दर्शवतो. बुध, शनि आणि हर्षल यांचा चंद्र (मन) आणि नेपच्यून (भावना) यांच्याशी नवपंचमयोग आहे. हा योग मनोविकारांशी संबंधित संशोधनासाठी अत्यंत पूरक आहे. प्रथम स्थानाचा स्वामी बुध आणि नवम स्थानाचा स्वामी शनि हे बाराव्या (विदेशाशी संबंधित) स्थानात असल्याने विदेशातील वास्तव्य दर्शवतात. गुरुदेवांनी विदेशात प्रस्थान केले, तेव्हा त्यांच्या कुंडलीत राहू ग्रहाची महादशा आणि बुध ग्रहाची अंतर्दशा चालू होती. कुंडलीत राहू ग्रह तृतीय स्थानात आणि बुध ग्रह बाराव्या स्थानात आहेत. ही स्थाने विदेशातील प्रवासासाठी पूरक आहेत.
२ अ ३. मनोरुग्णांचे मनोविकार दूर करण्यासाठी स्वयंसूचनांच्या नवीन पद्धती विकसित करणे : साधारणपणे मनोरुग्णांचे मनोविकार दूर करण्यासाठी मानसोपचारतज्ञ त्यांना ‘काळजी, निराशा’ इत्यादी लक्षणे दूर करण्याच्या गोळ्या (औषधे) देत असत; पण त्यामुळे रुग्णांच्या स्वभावदोषांचे निर्मूलन होत नसल्याने त्यांचे आजार तसेच रहायचे. ‘रुग्णांचे आजार दूर होण्यासाठी त्यांच्या स्वभावदोषांचे निर्मूलन होणे आवश्यक असते. ते दोष दूर झाल्यावर त्यांच्यावरील उपचार अधिक परिणामकारक होऊ शकतात’, हे लक्षात येऊन गुरुदेवांनी स्वभावदोषांचे निर्मूलन करण्यासाठी स्वयंसूचनांच्या नवीन पद्धती शोधल्या, उदा. ‘अयोग्य कृतीची जाणीव आणि तिच्यावर नियंत्रण मिळवणे’, ‘अयोग्य प्रतिक्रियांच्या जागी योग्य प्रतिक्रिया निर्माण करणे’, ‘प्रसंगाचा मनात सराव करणे’ इत्यादी. या पद्धतींचा उपयोग केल्यामुळे रुग्ण स्वतःला स्वयंसूचना देऊ शकत असे आणि त्याचा मनोविकार लवकर बरा होत असे.
२ अ ४. भारतात पुनरागमन आणि ‘संमोहन-उपचारतज्ञ’ म्हणून केलेले कार्य : इंग्लंडमध्ये संमोहन-उपचारपद्धतींवर यशस्वी संशोधन केल्यानंतर गुरुदेव ११.६.१९७८ या दिवशी भारतात परतले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे ‘संमोहन-उपचारतज्ञ’ म्हणून स्वतःचे चिकित्सालय चालू केले. ते ‘संमोहन-उपचारशास्त्रात प्राविण्य मिळवलेले भारतातील पहिले आधुनिक वैद्य (डॉक्टर)’ ठरले ! वर्ष १९७८ ते १९८३ या कालावधीत गुरुदेवांनी १०० हून अधिक आधुनिक वैद्य (डॉक्टर), दंतोपचारतज्ञ (डेंटिस्ट), मानसोपचारतज्ञ आदींना संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार यांचे सिद्धांत अन् प्रात्यक्षिके यांविषयी मार्गदर्शन केले. वर्ष १९९४ पर्यंत त्यांच्याकडे १ सहस्रहून अधिक रुग्णांवर केलेल्या संमोहन-उपचारांची परिपूर्ण माहिती (केस स्टडी) असलेला मोठा संग्रह निर्माण झाला होता.
२ आ. साधनेला आरंभ केल्यानंतरचे जीवन
२ आ १. साधनेला आरंभ होणे : ‘संमोहन-उपचारतज्ञ’ म्हणून कार्यरत असतांना गुरुदेवांच्या लक्षात आले की, ‘संमोहन-उपचारांनी सुधारणा न झालेले काही मनोरुग्ण हे संतांनी सांगितलेली साधना केल्यानंतर, तसेच नारायणबली, त्रिपिंडी श्राद्ध, नागबली असे धार्मिक विधी केल्यानंतर बरे होतात.’ हे पाहून ‘केवळ स्वभावदोष आणि अहं हेच सर्व मनोविकारांचे मूळ कारण नसते, तर ‘प्रारब्ध अन् वाईट शक्तींचा त्रास (टीप १)’ ही आध्यात्मिक कारणेही त्यामागे असू शकतात’, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी वर्ष १९८३ पासून ते संतांकडे जाऊ लागले आणि संतांनी सांगितल्यानुसार त्यांनी लगेचच साधनेला आरंभही केला.
| टीप १ – वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच, तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |
२ आ १ अ. ज्योतिष विश्लेषण
१. गुरुदेवांच्या कुंडलीत प्रथम स्थानाचा स्वामी बुध आणि नवम स्थानाचा स्वामी शनि हे बाराव्या स्थानात आहेत. बारावे स्थान हे अध्यात्माशी संबंधित स्थान आहे. हे स्थान बहिर्मुखतेकडून अंतर्मुखतेकडे, मायेकडून ईश्वराकडे आणि संकुचिततेकडून व्यापकतेकडे प्रवास दर्शवते. गुरुदेवांच्या कुंडलीत बारावे स्थान बलवान असल्याने त्यांचे अध्यात्मात पदार्पण झाले.
२. गुरुदेवांच्या कुंडलीत वर्ष १९६१ ते १९७९ या कालावधीत राहू ग्रहाची दशा होती. राहू ग्रह धन, प्रसिद्धी इत्यादी मायेतील गोष्टी देतो. गुरुदेवांचे शिक्षण, विदेशातील संशोधन कार्य, संशोधनकार्यामुळे मिळालेली प्रसिद्धी आदी गोष्टी राहू महादशेत झाल्या. राहू ग्रहाची महादशा संपल्यानंतर वर्ष १९७९ मध्ये गुरु ग्रहाची महादशा चालू झाली. गुरु ग्रह ज्ञान, साधना, गुरुकृपा, धर्म आदींचा कारक आहे. त्यामुळे गुरु ग्रहाची दशा चालू झाल्यानंतर गुरुदेवांचा अध्यात्माशी संबंध आला.
२ आ २. गुरुप्राप्ती होणे : वर्ष १९८३ ते १९८७ या कालावधीत गुरुदेवांनी अध्यात्मातील अधिकारी असलेल्या २५ हून अधिक संतांकडे जाऊन अध्यात्माचा अभ्यास केला. २३.७.१९८७ या दिवशी त्यांची भेट इंदूरचे संत प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी झाली आणि दुसर्याच दिवशी त्यांच्याकडून गुरुमंत्र मिळाला. त्या वेळी गुरुदेवांच्या कुंडलीत गुरु ग्रहाची महादशा आणि केतूची अंतर्दशा चालू होती. कुंडलीत केतू ग्रह ‘नवम’ या गुरुकृपेशी संबंधित स्थानात आहे.
२ आ ३. व्यष्टी साधना आणि गुरुसेवा : शिष्याचे तन, मन आणि धन गुरुचरणी अर्पण झाल्यावर त्याची आध्यात्मिक उन्नती होते. गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी शिष्य डॉ. आठवले यांना (गुरुदेवांना) प्रथम अखंड नामस्मरण करण्यास सांगितले. त्यानुसार गुरुदेवांनी नामजप करण्यास आरंभ केला अन् ८ मासांतच त्यांच्याकडून अखंडपणे नामजप होऊ लागला. अशा प्रकारे गुरुदेवांनी त्यांचे मन अर्पण केले. त्यानंतर प.पू. भक्तराज महाराजांनी त्यांना शरिराने सेवा करायला सांगतिली. गुरूंच्या आज्ञेनुसार गुरुदेवांनी आश्रमाची स्वच्छता करणे, दगड-काटे उचलणे, जेवणाच्या पत्रावळी उचलणे इत्यादी सेवाही केल्या. यामुळे त्यांचे तनही अर्पण झाले. तन आणि मन अर्पण केल्यावर गुरुदेवांनी त्यांचे धन अन् चिकित्सालय हेही गुरूंना अर्पण केले. तन, मन आणि धन यांच्या रूपात अहंकार, ममता, इच्छा अन् कामना यांचाच त्याग झाल्याने त्यांचे चित्त शुद्ध झाले. त्यामुळे भक्तराज महाराज यांनी प्रसन्न होऊन गुरुदेवांना पुढील आशीर्वाद दिला – ‘‘डॉक्टर, तुम्ही आम्हाला तन-मन-धन दिले; आम्ही तुम्हाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दिले !’’ प.पू. भक्तराज महाराजांनी गुरुदेवांना भारतात आणि विदेशात अध्यात्मप्रसार करण्यास सांगितले. प.पू. भक्तराज महाराजांनी वर्ष १९९५ मध्ये देहत्याग केला.
२ आ ३ अ. ज्योतिष विश्लेषण : गुरुदेवांना गुरुप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी झोकून देऊन साधना केल्यामुळे त्यांची २-३ वर्षांतच आध्यात्मिक उन्नती झाली. गुरुदेवांच्या कुंडलीत बाराव्या स्थानात असलेली बुध आणि शनि यांची युती समर्पणभाव, त्यागी वृत्ती, मायेपासून अलिप्तता, चिंतनशीलता, गांभीर्याने कर्म करणे, तत्त्वनिष्ठता आदी अध्यात्माला पूरक वैशिष्ट्ये दर्शवते. गुरुदेवांची आध्यात्मिक उन्नती गुरु ग्रहाच्या महादशेत आणि शुक्र ग्रहाच्या अंतर्दशेत झाली. त्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह ‘पंचम’ (उपासना) स्थानाचा स्वामी असून ‘मीन’ या त्याच्या उच्च राशीत आहे.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. यशवंत कणगलेकर (ज्योतिष विशारद) आणि श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.७.२०२५)
संपर्क : [email protected]
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !