पू. जयराम जोशीआजोबा यांच्या देहत्यागानंतर संतांनी दिलेले आशीर्वाद !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पू. आबांचे त्रास कळवल्यावर त्यांच्यात लगेच सुधारणा होत असे. यातून ‘त्यांचा संकल्प आणि आशीर्वाद अखंड कार्यरत आहे’, याची आम्ही सतत अनुभूती घेतली. 

पू. (कै.) जयराम जोशी

१. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ 

पू. आबांच्या देहत्यागानंतर श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘पू. आबा सूक्ष्मरूपाने सतत आपल्या समवेत असतील. स्थूलदेहाला मर्यादा असल्यामुळे पू. आबा कुठे जाऊ शकत नव्हते; पण आता त्यांनी त्यांचे पुढील कार्य सूक्ष्मातून चालू केले आहे. मिरज आश्रमातील साधकांना आधार देणे आणि त्यांचे कार्य पुढे चालू करणे, हे त्यांनी चालू केले आहे. संत कधी थांबत नाहीत. ते त्यांचे कार्य लगेच चालू करतात. आता पू. आबा अजून जलद गतीने कार्य करणार आहेत.’’

२. सद्गुरु स्वाती खाडये 

सद्गुरु स्वाती खाडयेताईंनी पू. आबांच्या पार्थिवाला हार घातला. ‘त्यांच्या माध्यमातून गुरुदेव उपस्थित आहेत’, असे आम्हाला जाणवत होते. पू. आबांना घेऊन जाणारे वाहन फुलांनी सजवले होते. सद्गुरु स्वातीताईंनी सांगितले, ‘‘पू. आबा शांत झोपले आहेत. त्यांचे ध्यान लागले आहे’, असे मला जाणवत आहे.’’

श्री. योगेश जोशी

३. सद्गुरु राजेंद्र शिंदे 

‘‘संत ईश्वराचे सगुण रूप असतात. त्यामुळे त्यांच्यावर भगवंताची अखंड कृपा असते. आता पू. आबांचे कार्य आणखीन वाढेल. ‘त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा लाभ सर्व साधकांना मिळो’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो.’’

४. पू. उमेश शेणै (सनातनचे १७ वे (व्यष्टी) संत, वय ७६ वर्षे) 

‘‘पू. आबांचे मन निर्मळ असल्यामुळे त्यांच्या संकल्पामुळे कुठलेही कार्य लगेच सिद्धीला जायचे. पू. आबांमध्ये १०० टक्के सकारात्मकता होती. त्यामुळे त्यांचे कार्य पूर्णत्वाला जात होते.’’

पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी (सनातनच्या ९० व्या संत, वय ७७ वर्षे) आणि पू. जयराम जोशीआजोबा यांची भावपूर्ण भेट !

(पू.) सौ. शैलजा परांजपे

१. पू. आजींचे गुडघे दुखत असतांनाही त्या पू. आबांना भेटायला वेदनाशामक गोळी घेऊन तीन माळे चढून येणे

‘ओवाळीते भाऊराया’ हे गीत ऐकतांना पू. आबांना त्यांच्या बहिणीची आठवण येऊन डोळे पाणावतात’, असे पू. आजींना सांगितल्यावर त्या २.१२.२०२५ या दिवशी पू. आबांना भेटायला आल्या. तेव्हा पू. आजींचे पू. आबांप्रती निरपेक्ष आणि निरागस प्रेम जाणवले अन् भोळा भाव जाणवला. पू. आजींची प्रकृती ठीक नाही. तसेच त्यांचे गुडघे दुखतात. त्यामुळे त्यांना पायर्‍या चढता येत नाहीत; पण त्या वेदनाशामक गोळी घेऊन थांबत थांबत तीन माळे चढून आल्या. ‘पू. आबांना भेटल्याविना जायचे नाही’, असे त्यांना वाटत होते.

२. पू. आबांनी पू. आजींना भाऊबीज देणे

पू. आबांनी पू. आजींना भाऊबीज म्हणून मोत्यांचा हार दिला. पू. आजींनी तो घालून दाखवल्यावर पू. आबांना आनंद झाला. तेव्हा पू. आजी म्हणाल्या, ‘‘तुम्ही बहिणीला किती सुंदर भाऊबिजेची भेट दिलीत !’’

३. देवलोकातील बहीण-भाऊ

पू. आबा पू. आजींकडे पुष्कळ प्रेमाने पहात होते. हसत होते आणि पू. आजींनी त्यांचे कौतुक केल्यावर ते साक्षीभावाने पहात होते. ते ‘प्रेम कसे व्यक्त करायचे ? हे कृतीतून दाखवत आहेत’, असे मला वाटले. ते दोघे सख्खे बहीण-भाऊ नसले, तरी त्यांचे प्रेम सख्ख्या भावंडांपेक्षा अधिक, निरपेक्ष आणि निर्व्याज आहे. पू. आजींनी आणलेला खाऊ पू. आबा आणि पू. आजी यांनी एकमेकांना भरवला. तेव्हा ‘ते दोघे देवलोकातील बहीण-भाऊ आहेत’, असे मला जाणवले.

‘गुरुदेवा, आम्हालाही आपण घडवलेल्या संतांप्रमाणे प्रत्येक साधक आणि नात्यावर निर्व्याज, निरपेक्ष प्रेम करून आदर्श नाते अनुभवता येऊ दे.

४. पू. जयराम जोशीआजोबा यांचे (पू. आबांचे) चैतन्य पुष्कळ वाढल्यामुळे ते सात्त्विक दिसत असणे

पू. आबांना भेटल्यावर पू. परांजपेआजी म्हणाल्या, ‘‘पू. आबांचे चैतन्य पुष्कळ वाढले आहे. ते त्यांच्या चेहर्‍यावर दिसत आहे. त्यामुळे ते अधिक सात्त्विक दिसत आहेत. ‘त्यांना खाली वाकून नमस्कार केल्यावर त्यांचे चैतन्य किती वाढले आहे’, ते समजते. आबा, तुम्ही माझा भाऊ, म्हणजे श्रीकृष्ण आहात.’’

५. पू. जोशीआजोबांच्या देहत्यागानंतर पू. (सौ.) शैलजा परांजपेआजींना पडलेले स्वप्न आणि त्याचा श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेला भावार्थ

पू. आबांनी देहत्याग केल्याचे पू. परांजपेआजी यांना कळवले. तेव्हा ‘पू. आबांचे कार्य संपले’, असे वाटून त्यांना दुःख झाले. पू. आबांचा देहत्याग झाला असल्याचे ठाऊक असूनही ‘ते आश्रमात वावरत आहेत. सेवा करत आहेत’, असे त्यांना रात्रभर स्वप्नात दिसत होते. तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘पू. आबा स्मृतीरूपाने सर्व साधकांमध्ये आहेत आणि ते आश्रमात नेहमीसारखे सेवा करत आहेत. उन्नत जीव सूक्ष्मरूपाने पुढील कार्य लगेच चालू करतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले आहे, ‘संतांनी देह ठेवला असला, तरी त्यांचे सर्व कार्य सूक्ष्मरूपाने चालूच असते. संत देहरूपी आपल्यात नसले, तरी ते कार्यरूपे आपल्यामध्ये असतात.’

– सौ. भाग्यश्री योगेश जोशी (पू. जयराम जोशी यांची सून), सनातन आश्रम, मिरज. (२.१२.२०२५)

५. पू. गुरुनाथ दाभोलकरकाका 

पू. आबा माझे गुरुबंधू होते आणि त्यांनी साधकांना पुष्कळ ऊर्जा दिलेली आहे. त्यांचे सर्वकाही चांगले झाले आहे. ते तुमच्या समवेत सततच आहेत. त्यामुळे कसलीही काळजी करायची नाही.

६. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले साहाय्य !  

कु. ऐश्वर्या जोशी

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे हे सतत पू. आबांसाठी नामजपादी उपाय करत होते. पू. आबांना उलटी झाल्यावर ते बेशुद्ध व्हायचे; पण सद्गुरु गाडगीळकाका नामजपादी उपाय करून त्यांना शुद्धीवर आणायचे. ‘त्यांचे सर्व अडथळे दूर होत आहेत’, असे सांगून आम्हाला आश्वस्त करत असत. सद्गुरु गाडगीळकाकांच्या माध्यमातून आमचा गुरुदेवांशी संवाद होत असे आणि ‘गुरुदेवच पू. आबांसाठी नामजपादी उपाय करत आहेत’, याची जाणीव होऊन आमचे मन हलके होत असे. त्यामुळे या परिस्थितीत आम्हाला शांत रहाता येत होते. आम्हाला ‘गुरुदेव सतत आपल्या जवळ आहेत’, याची अनुभूती घेता येऊन कृतज्ञताभावाने पू. आबांची सेवा करता आली.

७. आधुनिक वैद्यांनी केलेले साहाय्य 

आधुनिक वैद्य प्रवीण कोळी, आधुनिक वैद्या मृणालिनी भोसले हे वेळोवेळी पू. आबांसाठी धावून येत होते. त्यांचा आम्हाला फार मोठा आधार मिळाला. ‘पू. आबांना त्रास होणार नाही’, असा ते प्रयत्न करत होते. आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे हेसुद्धा सतत संपर्कात राहून आम्हाला धीर देत होते.

८. ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक पू. आबांसाठी नामजप करत होते. त्यांना केव्हाही नामजपाला बसायला सांगितले, तरी ते बसायचे. 

९. साधकांनी केलेले साहाय्य

९ अ. मंगळुरूला जाणे रहित करून संपूर्ण विधींचे नियोजन भावपूर्ण करणे : आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे आणि त्यांची मुलगी सौ. वैदेही गौडा (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ३० वर्षे) या ९.१२.२०२५ या दिवशी मंगळुरूला जाण्यासाठी निघत असतांना पू. आबांनी देह ठेवला. तेव्हा त्यांनी त्यांचे जाणे रहित करून संपूर्ण विधींचे नियोजन भावपूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. त्या दोघी म्हणाल्या, ‘‘आमचे भाग्य आहे की, आम्हाला संतसेवा करण्याची संधी मिळाली.’’

सर्व साधकांनीही पुढाकार घेऊन सर्व विधींची सिद्धता केली. त्यामुळे सर्वांची मने जुळून सर्व विधी आनंदाच्या स्तरावर झाले. हा आनंददायी सोहळा गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला अनुभवायला मिळाला, याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.

‘गुरुमाऊली, आपल्या अनन्य कृपेमुळे, सर्व संतांच्या आशीर्वादाने आणि साधकांच्या साहाय्याने आपणच ही सेवा आमच्याकडून करून घेत आहात. आपणच आमच्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधना कृतज्ञताभावात राहून करून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो.

‘पू. आबांकडून मिळत असलेला हा ऊर्जास्रोत आमच्यावर अखंड रहावा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या तिन्ही मोक्षगुरूंची अखंड कृपा राहू दे’, अशी त्यांच्या कोमल चरणी शरणागतभावे प्रार्थना आहे.’

– श्री. योगेश जयराम जोशी, सौ. भाग्यश्री योगेश जोशी आणि कु. ऐश्वर्या योगेश जोशी, सनातन आश्रम, मिरज. (१४.१२.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक