साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !

‘कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक संत पू. रमानंद गौडा (पू. अण्णा, सनातनचे ७५ वे संत, वय ५० वर्षे) हे धर्मप्रसार सेवेच्या निमित्ताने विविध जिल्ह्यांत प्रवास करतात. या वेळी पू. रमानंदअण्णा साधकांना ‘साधकांची साधना उत्तम प्रकारे व्हावी, त्यांच्यात आंतरिक परिवर्तन घडावे, त्यांच्यात व्यापकता निर्माण व्हावी आणि गुरुकार्य वाढण्यासह साधकांची आध्यात्मिक उन्नतीही जलद गतीने व्हावी’, या दृष्टीने मार्गदर्शन करतात. ‘धर्मप्रेमींनी पुढील टप्प्याची साधना करावी आणि हिंदुत्वनिष्ठांनी राष्ट्र अन् धर्म यांचे कार्य स्वतःची साधना म्हणून कशा प्रकारे करावे ?’, या दृष्टीने पू. अण्णा मार्गदर्शन करतात. त्यानंतर ते साधकांच्या पुढील सेवांचे नियोजनही अत्यंत तळमळीने करतात. त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये गुरुकार्य मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

‘२६.१.२०२६ ते २२.२.२०२६ या कालावधीत पू. रमानंदअण्णांचा प्रसारदौरा बेंगळुरू जिल्ह्यात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पू. अण्णांकडून साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत. २४.६.२०२६ या दिवशी यातील काही सूत्रे पाहिली. आज पुढील सूत्रे पाहू.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1054325.html

पू. रमानंद गौडा

५. कु. अनुश्री पालंकर, शिवमोग्गा, कर्नाटक.

अ. ‘पू. अण्णांनी मला माझ्यातील ‘कर्तेपणा घेणे’ या अहंच्या पैलूची जाणीव करून दिली. तेव्हा ‘माझ्यामधील या अहंच्या पैलूचे कुठे कुठे प्रकटीकरण होते’, याचा अभ्यास मी करू लागले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘संत आपल्याला आपला एखादा स्वभावदोष दाखवून देतात, आपली चूक सांगतात, तेव्हा त्या स्वभावदोषाची, अहंकाराची जाणीव आपल्या अंतर्मनाला होते आणि तो स्वभावदोष न्यून करण्यासाठी प्रयत्न आपोआप चालू होतात.’

६. श्री. शिवराम, चामराजनगर, मैसुरू, कर्नाटक.

अ. ‘पू. अण्णांनी केलेले मार्गदर्शन ऐकून  ‘मी साधनेत कुठे अल्प पडतो ?’, याची मला जाणीव झाली. मला ‘माझ्यातील अनावश्यक आणि नकारात्मक बोलणे, बुद्धीचा  अती वापर करणे’, हे स्वभावदोष माझ्या लक्षात आले. नंतर सत्संग संपल्यावर मला हलकेपणाची जाणीव झाली.

आ. पू. अण्णांच्या सहवासात असतांना ‘थकवा न येणे, झोप अल्प होऊनही उत्साही वाटणे, शरीर आणि मन यांना हलकेपणा जाणवणे, भावजागृती होणे इत्यादी अनुभूती मी घेऊ शकलो. संतांमधील चैतन्यामुळेच हे सर्व शक्य झाले. मी पू. अण्णांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

७. सौ. कोमला काशी, बेंगळुरू, कर्नाटक.

अ. पू. अण्णांच्या मार्गदर्शनाच्या शेवटच्या दिवशी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने साधकांच्या सेवांचे नियोजन करण्यात आले. त्या वेळी पू. अण्णांनी सांगितले, ‘‘आपण प्रार्थना करून ही सर्व सेवा प्रसादरूपाने स्वीकारूया.’’ तेव्हा मला सूक्ष्मातून श्रीकृष्णाचा हात दिसून त्याच्या हाताच्या खाली गुरुदेव आणि नंतर सर्व साधक दिसत होते. श्रीकृष्णाच्या हातातून चैतन्याचा प्रवाह गुरुदेवांच्या माध्यमातून साधकांना मिळत होता.

मला प्रथमच अशा प्रकारचा अनुभव आला. मला ‘सेवा’ हा प्रसाद आहे’, असे ठाऊक होते; मात्र आज गुरुकृपेने मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला.’

८. सौ. रचना हरिप्रशांत, चिक्कबळ्ळापूर, कर्नाटक.

८ अ. सत्संगाच्या वेळी नामजप एकाग्रतेने आणि सहजतेने होणे : ‘एकदा दुपारी उद्योजकांसाठी पू. अण्णांचा विशेष सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्यांचा सत्संग चालू असतांना अकस्मात् माझा आतून ‘निर्गुण’ हा नामजप चालू झाला. माझा नामजप सहजतेने आणि एकाग्रतेने होऊ लागला. मी दुसर्‍या दिवशी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधत असतांना मला ‘निर्गुण’ नामजप आला. ‘संतांच्या सत्संगात गुरुतत्त्व कार्यरत असते आणि ज्याला जे आवश्यक आहे, ते सूक्ष्म पातळीवर प्रसादरूपाने दिले जाते’, याची मला जाणीव झाली आणि माझ्या मनात कृतज्ञताभाव निर्माण झाला.’

९. श्री. शिवानंद बागलकोटे, बेंगळुरू

९ अ. पू. रमानंद गौडा यांच्या ठिकाणी सूक्ष्मातून श्री मारुतीचे रूप दिसणे : ‘एकदा रात्री पू. अण्णांच्या उपस्थितीत सर्व साधक त्यांना शिकायला मिळालेल्या सूत्रांविषयी सांगत असतांना मला सूक्ष्मातून पू. अण्णा श्री मारुतीच्या रूपात दिसत होते. ‘जणू साक्षात मारुति सर्व साधकांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत आहे आणि मान हालवत आहे’, असे मला जाणवत होते. त्याच वेळी पू. अण्णांनी माझे नाव घेऊन ‘‘तुम्हाला काय शिकायला मिळाले ?’’, असे विचारले. मारुतीच्या त्या रूपावर केंद्रित झालेले माझे मन पूर्वस्थितीत येण्यासाठी काही क्षण लागले. त्यानंतर मी स्वतःला सावरून मला शिकायला मिळालेली सूत्रे सांगितली.’

१०. सौ. अश्विनी, बेंगळुरू

१० अ. हिंदु राष्ट्रासाठी युवा साधकांना घडवणे : ‘पू. अण्णांच्या प्रसारदौर्‍याच्या वेळी ४ युवा साधक शिकण्यासाठी आले होते. पू. अण्णा त्यांना प्रोत्साहन देत होते. पू. अण्णा त्यांना लहान-सहान दायित्व देऊन घडवत होते. पू. अण्णा त्यांच्याशी आई-वडिलांप्रमाणे वात्सल्याने वागत होते, तसेच त्यांना त्यांच्या चुका सांगून अंतर्मुख करत होते. ‘त्या युवा साधकांची साधना उत्तम प्रकारे व्हावी’, याची पू. अण्णांना विशेष काळजी होती. युवा साधक त्यांना आलेल्या अनुभूतींविषयी सांगत असतांना ‘‘संतच आमचे आई-वडील आहेत,’’ असे सांगत होते.

११. सौ. भव्या गौडा, बेंगळुरू

११ अ. साधकांनी पू. रमानंद गौडा यांच्या सत्संगातील चैतन्य अनुभवणे : ‘पू. अण्णांच्या प्रसारदौर्‍याच्या वेळी काही वेळा दिवसातून २ सत्संग, तर काही वेळा ३ सत्संग होत आणि रात्री सर्व साधकांना साधनेच्या दृष्टीने दृष्टीकोन देणारा सत्संगही होत होता. साधकांचा इतका व्यस्त दिनक्रम असूनही बेंगळुरू येथील १ मासाच्या प्रवासात एकाही साधकाला शारीरिक त्रास झाला नाही. काही साधकांना शारीरिक अडचणी असूनही ते पू. अण्णांच्या सत्संगात उत्साहाने आणि तळमळीने प्रयत्न करत होते. संतांचे अस्तित्व असलेल्या चैतन्यमय वातावरणामुळे साधकांची झोप अल्प होऊनही त्यांना कोणतीही शारीरिक अडचण जाणवली नाही.’

१२. अधिवक्ता विजय शेखर, येलहंका, बेंगळुरू

१२ अ. संतांचे मार्गदर्शन, साधकांचा प्रेमभाव आणि सेवाकेंद्रातील चैतन्य यांमुळे साधना करण्यास प्रेरणा मिळणे : ‘मला पू. अण्णांच्या सत्संगात बेंगळुरू सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळाली. तेथील शांत वातावरण आणि साधकांचा प्रेमभाव पाहून मी भारावून गेलो. साधकांच्या आत्मीयतेमुळे माझ्यात भावजागृती झाली आणि मी स्वतःला विसरून गेलो. पू. अण्णांचे दिव्य मार्गदर्शन ऐकण्याची संधी मला ६ वेळा मिळाली. त्यांच्या प्रत्येक मार्गदर्शनाच्या वेळी मला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत होते. त्यांचे मार्गदर्शन ऐकून ‘साधना करायचीच’, असा मी निर्धार केला.’

(समाप्त)

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २५.२.२०२६)          ॐ

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक