रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘१ ते ४.१.२०२६ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधनावृद्धी शिबिर झाले होते. त्या वेळी शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा

१. सौ. सत्यादी देव, चंद्रपूर

१ अ. ‘शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रार्थना करताच ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रत्यक्ष तेथे आले आहेत’, असे मी अनुभवले.

१ आ. सत्संगात ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ याविषयी सांगितल्यावर आनंद मिळून सकारात्मकता अनुभवणे : शिबिराच्या पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी शिबिरात ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’ याविषयी सूत्रे सांगितली. विषय घेतला होता. तेव्हा मला पुष्कळ आनंद मिळून सकारात्मकताही अनुभवता आली. शिबिरातील इतर सत्रांच्या वेळी मला ‘ग्लानी येणे, काही वेळा आकलन न होणे’, असे त्रास झाले; मात्र या सत्रात मला पुष्कळ शिकायला मिळाले आणि माझ्या मनाला शांतही वाटले.

१ इ. भावजागृतीच्या प्रयोगाच्या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले व्यासपिठाच्या दिशेने विराट रूपात चालत येत आहेत’, असे दिसणे : पू. रत्नमाला दळवी (सनातनच्या ११८ व्या समष्टी संत, वय ४९ वर्षे) यांनी २ मिनिटे भावजागृतीचा प्रयोग करायला सांगितला. तेव्हा ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विराट रूपात व्यासपिठाच्या दिशेने चालत येत आहेत’, असे मला दिसले. त्या वेळी ‘संपूर्ण सभागृहात चैतन्य पसरले आहे आणि सभागृहाचे आकारमान पुष्कळ मोठे झाले आहे’, असे मला जाणवले.’

२. सौ. श्रुती कुलकर्णी, नाशिक

अ. ‘शिबिरात पहिल्या दिवशी सत्र चालू असतांना मला पुष्कळ झोप येत होती. मला जडत्व जाणवत होते.

आ. दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी मला झोप आली नाही. ‘माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून झाले आहे’, असे मला जाणवले. मला हलके वाटले.

इ. ‘आपल्या डोक्यावर श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र फिरत आहे’, असा भावजागृतीचा प्रयोग करत असतांना ‘माझ्या डोक्यावर सुदर्शनचक्र फिरत आहे’, असे मला जाणवत होते. तेव्हा काही क्षण मला स्वतःचे अस्तित्व जाणवले नाही.’

३. श्री. बाबूराव लक्ष्मण कडूकर (वय ६० वर्षे), कोल्हापूर

अ. ‘शिबिराच्या पहिल्या दिवशी मला सूक्ष्मातून ‘व्यासपिठावर भगवान श्रीकृष्ण आणि कमलपुष्पाच्या मध्यभागी श्री महालक्ष्मीदेवी उभी आहे’, असे दृश्य दिसले.

आ. ‘या कमलपुष्पाच्या विशाल पाकळ्यांवर सूत्रसंचालन करणारा साधक आणि वक्ते बसले असून त्यांच्या मुखातून श्री महालक्ष्मीदेवीचे चैतन्य शब्द रूपातून बाहेर पडत आहे अन् हे चैतन्य किरणांच्या रूपाने सर्व साधकांमध्ये प्रवेश करत आहे’, असे मला जाणवले.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १.४.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक