Shankhnad Mahotsav Delhi : भारताच्या राजधानीत सनातन राष्ट्राचा शंखनाद !

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव देहली २०२५

  • उपस्थित धर्मप्रेमींनी केला हिंदु राष्ट्र स्थापनेचा जयघोष

  • विविध घोषणांनी सभागृह दुमदुमले

डावीकडून श्री. सुरेश चव्हाणके, श्री. उदय माहुरकर, श्री. अभय वर्तक, दीपप्रज्वलन करतांना महामंडलेश्वर स्वामी पू. शांतीगिरी महाराज, श्री. कपिल मिश्रा, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

देहली, १२ डिसेंबर (वार्ता.) – द्वापरयुगात ज्या कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अधर्मी कौरवांचा नाश करून धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी पांचजन्य शंखाचा नाद केला, त्याच रणभूमीवर सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी आज पुन्हा शंखनाद करण्यात आला. सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी भारतवर्षातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले संत-महंत, धर्मप्रेमी भारतभूमीला ‘सनातन राष्ट्र’ ही मूळ ओळख पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी भारताच्या राजधानीत एकवटले. संतांची चैतन्यदायी उपस्थितीत आणि ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम’ या क्षात्रतेज निर्माण करणार्‍या जयघोषात देहली अर्थात् ‘इंद्रप्रस्थ’ नगरीतील भारत मंडपम् येथे १३ डिसेंबर या दिवशी या मंगलमय सोहळ्याला प्रारंभ झाला. सनातन संस्था आयोजित आणि ‘सेव कल्चर सेव भारत फाऊंडेशन’ प्रस्तुत ‘धर्मेण जयति राष्ट्रम्’ हे घोषवाक्य असलेल्या या महोत्सवामध्ये उपस्थित धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा जयघोष केला.

देहलीचे संस्कृती आणि पर्यटन मंत्री कपिल मिश्रा, नाशिक (महाराष्ट्र) येथील जय बाबाजी परिवाराचे श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज, ‘सेव कल्चर सेव भारत’चे संस्थापक आणि माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर, सुदर्शन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके, सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. सच्चिदानंद आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक या मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाले.

असा झाला उद्घाटन सोहळा !

उपस्थित धर्मप्रेमी

सकाळी १० वाजता कार्यक्रमाला प्रारंभ झाला. प्रारंभी ‘गोवा येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आणि ‘आनंदी जीवनासाठी सनातन संस्था’ हे व्हिडिओ दाखवण्यात आले. त्यानंतर ५ मिनिटे सनातन राष्ट्र स्थापनेच्या संकल्पपूर्तीसाठी प्रभु श्रीरामाला प्रार्थना करून सामूहिकपणे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ नामजप करण्यात आला. त्यानंतर सनातन वेदपाठशाळेचे पुरोहित श्री. श्रेयस पिसोळकर यांनी शंखनाद केला. त्यानंतर श्री श्री गणेशाच्या श्लोकाचे पठण करण्यात आले. धर्मसंस्थापनाची देवता भगवान श्रीकृष्ण, इंद्रप्रस्थ नगरीची स्थानदेवता आणि ग्रामदेवता श्री भैरवनाथ, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना वंदन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. देहली येथील वेदव्यास गुरुकुलम् वसंतकुंजचे आचार्य श्री. नीलेश त्रिपाठी, त्यांचे शिष्य श्री. राम शर्मा आणि श्री. वैभव पांडे यांनी व्यासपिठावर वेदपठण केले. सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे यांनी पुष्पहार घालून आणि शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन ब्रह्ममूर्तींचा सन्मान केला. त्यानंतर श्री गणेशवंदना आणि मान्यवरांच्या शुभहस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. श्री सोमनाथ ज्योर्तिलिंगाच्या दिव्यांश दर्शनाकरता व्यासपिठावर आणण्यात आणले. यानंतर ‘वन्दे मातरम्’ गीताचे व्हिडिओद्वारे सादरीकरण करण्यात आले.

श्री सोमनाथ ज्योर्तिलिंगाच्या दिव्यांशाचे भावपूर्ण दर्शन !

क्रूरकर्मा महंमद गझनी याने वर्ष १०२६ मध्ये १२ ज्योर्तिलिगांपैकी गुजरात येथील श्री सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला. त्याने मंदिरातील श्री सोमनाथ शिवलिंग खंडित केले. त्या वेळी श्री सोमनाथ शिवलिंग काही भागांमध्ये विभागले गेले. श्री सोमनाथ ज्योर्तिलिंगाचे मूळ दिव्यांश तामिळनाडू राज्यातील तंजावूर येथील वेदप्रचाररत्न वेदकुलपती श्री. जी.के. सीतारामन् यांच्या कुटुंबाने १ सहस्र वर्षांहून अधिक काळ सुरक्षित ठेवले. श्री सोमनाथ ज्योर्तिलिंगाचे हे दिव्यांश प्रथमच सार्वजनिकरित्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवामध्ये दर्शनाकरता आणण्यात आले. या वेळी सर्वांनी श्री सोमनाथ ज्योर्तिलिंगाच्या दिव्यांशाचे दर्शन घेतले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी व्यासपिठावर श्री सोमनाथ ज्योर्तिलिंगाच्या दिव्यांशाचे पूजन केले. या वेळी उपस्थितांनी हात उंचावून ‘हर हर महादेव ।’, ‘नम: पार्वतीपते हर हर महादेव’ अशा घोषणा दिल्या.

‘संकल्प रामराज्याचा’ या ग्रंथाचे लोकार्पण !

या वेळी मान्यवरांच्या शुभहस्ते गोवा येथे मे २०२५ मध्ये झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवावर आधारित ‘संकल्प रामराज्याचा’ या ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. सनातन संस्थेच्या वतीने आतापर्यंत १३ भाषांतील ३६९ ग्रंथांची निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंत १ कोटींहून अधिक ग्रंथ वितरित झाले आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण !

१. ‘वन्दे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारत शासनाच्या संस्कृती मंत्रालयाद्वारे बनवण्यात आलेल्या एका व्हिडिओचे प्रसारण या वेळी करण्यात आले.

२. संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ चे सामूहिक गायन करतांना अनेकांच्या डोळ्यांमध्ये भावाश्रू आले.