साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतून भक्तीसत्संगात स्रवलेले अमृतकण !

‘साधना म्हणजे स्वतःच्या अंतरंगाचा प्रामाणिकपणे शोध घेणे होय. ‘स्वतःला स्वीकारणे’ हा त्या शोधाचा पाया आहे. जेव्हा आपण स्वतःला ‘आहे तसे’ स्वीकारतो, तेव्हाच ईश्वर आपल्याला ‘हवे तसे’ घडवू लागतो. म्हणजेच ईश्वराला अपेक्षित असे आपल्या मनाला घडवण्यासाठी प्रथम पायरी म्हणजे स्वतःच्या मनाला पूर्णपणे स्वीकारणे. स्वतःचे मन स्वीकारता न येण्यामागे स्वतःविषयी असणारी नकारात्मकता आणि न्यूनगंड यांविषयीचे अडथळे अन् त्यांवरील आध्यात्मिक दृष्टीकोन पुढे दिले आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. अडथळे 

अ. अनेकदा साधकांच्या मनात ‘एवढी वर्षे साधना करूनही माझ्या मनात अजूनही दोष कार्यरत कसे आहेत ? माझ्यामध्ये पालट का होत नाही ?’, अशा प्रकारे स्वतःबद्दल नकारात्मक विचार असतात. यामुळे सेवा अपेक्षित अशी जमली नाही किंवा साधनेचे प्रयत्न होत नसतील, तर त्यांना स्वतःची स्थिती स्वीकारता येत नाही.

आ. काही साधकांच्या मनात आधीच स्वतःविषयी नकारात्मकता असते, त्यात एखाद्या प्रसंगात स्वतःला प्रयत्न जमले नाहीत, तर त्यांची नकारात्मकता आणखी वाढते. त्यामुळे त्यांना साधनेचे प्रयत्न करतांना आनंद मिळत नाही.

१ अ. आध्यात्मिक दृष्टीकोन : एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही, तर प्रत्येक वेळी ‘आपली क्षमता नाही’, असे नसते. काही वेळा ‘ईश्वराची इच्छा’ किंवा ‘आपल्यातील दोष’ समजून घेण्यासाठी भगवंताने आपल्यासमोर आणलेला तो एक प्रसंग असतो. त्यामुळे एखाद्या प्रसंगात जरी आपल्याला जमले नाही, तरी ‘देवाला यातून मला काय शिकवायचे आहे ?’, हे कृतज्ञताभावाने पाहिले, तर मन तो प्रसंग किंवा ती स्थिती स्वीकारू शकते. या समवेत ‘मी आणखी कुठले प्रयत्न करायला हवेत ?’ याविषयी वेळोवेळी चिंतन करावे आणि आपल्या व्यष्टी आढावासेवकांशीही बोलून प्रयत्नांची दिशा घ्यावी.

२. दोषांमुळे निर्माण होणारा न्यूनगंड 

अनेकदा स्वतःकडून होणार्‍या चुका आणि पुनःपुन्हा उफाळून येणारे स्वभावदोष यांमुळे मनात स्वतःविषयी न्यूनगंड निर्माण होतो. ‘माझ्याकडून चुकाच होतात’, हा विचार मनात बळावू लागतो आणि साधक स्वतःला न्यून (कमी) लेखू लागतो.

२ अ. दृष्टीकोन : ‘न्यूनगंड म्हणजे सतत स्वतःला न्यून लेखण्याच्या विचारात रहाणे.’ न्यूनगंडाचे विचार साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीला खीळ घालणारे, म्हणजेच त्यात बाधा आणणारे असतात. ‘स्वतःला श्रेष्ठ समजणे’, हे अहंभावाचे पहिले टोक आहे, तर ‘स्वतःला न्यून लेखणे’ हे अहंभावाचेच दुसरे टोक आहे. त्यामुळे न्यूनगंड बाळगण्यापेक्षा ‘आपल्या चित्तावर जन्मोजन्मीचे संस्कार आहेत’, हे स्मरणात ठेवावे. या जन्मात आपल्याला दोषहारक गुरुदेव लाभले असून आतापर्यंतच्या अनंत जन्मांचे संस्कार घालवण्यासाठीच त्यांनी आपल्याला साधना सांगितली आहे. ती साधना केल्याने ‘आपले जन्मोजन्मीचे संस्कार निश्चितच दूर होतील आणि आपली मनःशुद्धी होईलच’, हे त्रिवार सत्य आहे. ‘ईश्वराला जसा अहंभाव नको असतो, तसेच त्याला आपला न्यूनगंडही नको असतो. त्याला हवी असते, आपली ‘शरणागती’ ! त्यामुळे स्वभावदोषांचा न्यूनगंड न बाळगता गुरूंनी शिकवलेली साधना शरणागतभावाने आणि मनापासून करावी.

३. प्रक्रियेमुळे नकारात्मकता वाढणे 

अनेकदा आपण मनाचे निरीक्षण करायला सुरुवात केली की, अधिकच दोष लक्षात येतात. तेव्हा स्वतःविषयीची नकारात्मकता आणखी वाढते.

३ अ. दृष्टीकोन : स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या प्रयत्नांना आरंभ केला की, आपली अंतर्मुखता वाढते. त्यामुळे दोष किंवा चुका लक्षात येण्याचे प्रमाण वाढते. त्याचा अर्थ ‘दोष वाढतात’, असा नव्हे. प्रयत्नांना प्रारंभ केल्यावर एक प्रकारे त्या प्रयत्नांच्या तेजाने आपले अंतर्मन प्रकाशमान होते आणि पूर्वीपासून असलेले स्वभावदोष आपल्याला दिसू लागतात. त्यामुळे अशा स्थितीत नकारात्मक न होता उलट आपण कृतज्ञताभाव अनुभवायला हवा.

४. स्वतःकडून अपेक्षा असणे 

अनेकदा साधकांनी ‘मी आदर्श असावे’, अशी स्वतःची एक चौकट बनवलेली असते. त्यामुळे त्याप्रमाणे स्वतःकडून कृती झाली नाही, हे स्वीकारण्यास त्यांचा संघर्ष होतो.

४ अ. दृष्टीकोन : ‘ईश्वराने आपल्याला जसे बनवले आहे, त्याचा स्वीकार करणे’, हीच खरी साधना आहे. स्वतःकडून अपेक्षा करून स्वतःला न्यून लेखण्यापेक्षा स्वतःच्या प्रकृतीचा स्वीकार केल्याने मनातील संघर्ष थांबतो. ‘मी आदर्श असावे’, हा विचार योग्य आहे; पण जेव्हा या विचाराने आपण स्वतःकडून अपेक्षा करतो, तेव्हा प्रयत्न थांबतात आणि मनही दुःखी होते. याचाच अर्थ तो विचार केवळ विचारांच्या स्तरावरच रहातो. त्यामुळे स्वतःकडून अपेक्षा करण्यापेक्षा ‘आदर्श असणे या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मी काय करू ?’, असा वस्तूनिष्ठ विचार करावा. अशा प्रकारे श्रद्धा आणि चिकाटी यांनी प्रयत्न करत राहिल्यास आध्यात्मिक उन्नती निश्चित होते.

थोडक्यात स्वतःसंदर्भात असलेल्या नकारात्मकतेमुळे ‘मी म्हणजे दोष’, अशीच एक धारणा बनून जाते. स्वतःला न्यून लेखत असल्यामुळे स्वतःला स्वीकारण्यास आणि पर्यायाने स्वतःमध्ये सुधारणा करण्यात मोठा अडथळा निर्माण होतो.

साधकांनो, ‘आपले स्वभावदोष दूर करण्याची क्षमता केवळ गुरूंमध्ये आहे’, हे लक्षात घेऊन स्वतःला न्यून न लेखता शरणागती वाढवा. स्वतःमधील दोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून सकारात्मकतेने आणि कृतज्ञताभावाने प्रयत्नरत रहा !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) (२.७.२०२६)