गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी, १५ जुलै (वार्ता.) – गोवा राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.मध्ये) सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त १५ जुलै या दिवशी पणजी येथील कला अकादमी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे, कौशल्य विकास सचिव प्रसाद लोलयेकर, कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालक विनायक कांबळी; एस्.एस्. धेंपो विद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मनोज कामत, तसेच सरकारी विभाग, आयटीआय, शैक्षणिक संस्था, उद्योग, उद्योजक, विद्यार्थी आणि इतर मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले, ‘‘औद्योगिक शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा केल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. या निर्णयामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रम, विविध व्यावसायिक अभ्यासक्रम, तसेच सरकारी आणि खासगी क्षेत्रांतील भरती प्रक्रियेत अधिक संधी उपलब्ध होतील. कौशल्य आणि औपचारिक शिक्षण यांच्यातील दरी न्यून करून युवकांना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे. राज्य सरकार उद्योगांच्या आवश्यकतेनुसार कौशल्य विकासाला प्राधान्य देत असून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण, उद्योगांशी समन्वय आणि गुणवत्तापूर्ण व्यावसायिक शिक्षण यांच्या माध्यमातून गोव्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.’’

१० वर्षांपेक्षा अधिक काळ कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना सरकारी नोकरीत कायम केले जाईल

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘कौशल्य विकास खात्यात अनेक कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. त्यांच्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थी कुशल होत आहेत. त्यामुळे या खात्यामध्ये १० वर्षांपेक्षा अधिक काळ कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍यांना सरकारी नोकरीत कायम केले जाणार आहे.’’या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून गोव्यातील व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणाची परिसंस्था अधिक बळकट करण्यासाठी ५ सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.