भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात

गोव्यात अनेक महिने केले अवैध वास्तव्य

अटक करण्यात आलेला सैनिक (मध्यभागी)

पणजी, १५ जुलै (वार्ता.) – प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रांविना भारत-नेपाळ सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करतांना कॅलिफोर्निया, अमेरिका येथील नागरिक तथा स्वत: अमेरिकी नौसेनेचा माजी सैनिक असल्याचे सांगणारा जार्डन ब्राऊन (वय ३६ वर्षे) याला सशस्त्र सीमा दलाच्या सैनिकांनी महाराजगंज (उत्तरप्रदेश) येथील देशाच्या सीमेवर ‘पिलार ५१६’ येथे कह्यात घेतले. या अमेरिकेच्या नागरिकाने भारतात अवैधपणे प्रवेश करून गेले अनेक महिने गोव्यात अवैधपणे वास्तव्य केले असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामुळे गोव्यात विदेशी नागरिकांविषयी भक्कम गुप्तचर यंत्रणा (रोबस्ट इंटेलिजन्स) आणि देखरेख व्यवस्था (सर्व्हेलन्स) असल्याच्या सरकारच्या दाव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

उत्तरप्रदेश पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली की, जार्डन ब्राऊन हा अमेरिकेचा नागरिक भारताची सीमा ओलांडतांना पारपत्र, ‘व्हिसा’ किंवा इतर तत्सम ओळखपत्रे दाखवू शकला नाही. जार्डन ब्राऊन अन्वेषण करतांना म्हणाला, ‘‘टुरिस्ट व्हिसा’वर थायलंड येथे प्रवास करतांना माझे पारपत्र हरवले आणि समुद्रमार्गे श्रीलंका अन् नंतर २ नोव्हेंबर २०२५ मध्ये मी भारतात प्रवेश केला. मी नंतर गोव्यात गेलो आणि तेथे काही महिने राहिलो. नंतर बेंगळुरू आणि उत्तरप्रदेश येथे गेलो.’’ उत्तरप्रदेश येथील सीमा अनधिकृतपणे ओलांडताना जार्डन ब्राऊन याला कह्यात घेण्यात आले. जार्डन ब्राऊन यांनी उत्तरप्रदेश पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो गोव्यात अनुमाने ८ महिने वास्तव्यास असण्याची शक्यता आहे; मात्र गोव्यातील अन्वेषण यंत्रणांना त्याचा सुगावा लागला नाही.

आतंकवादी आणि गुन्हेगार यांचे आश्रयस्थान बनलेला गोवा !

गोव्यात यापूर्वीही विदेशी नागरिकांच्या अवैध वास्तव्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यापूर्वी गोव्यात पाकिस्तानमध्ये जन्मलेला अमेरिकेचा आतंकवादी डेव्हिड कोलमन हेडली याचे अवैध वास्तव्य होते. तो २६.११.२००८ मधील मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार होता. डेव्हिड कोलमन हेडली याला शिकागो, अमेरिका येथे कह्यात घेण्यात आल्यानंतर त्याच्या गोव्यातील वास्तव्याविषयीची माहिती उघडकीस आली होती. पोलिसांनी वर्ष २०१२ मध्ये हणजूण येथे एका भाड्याच्या घरात वास्तव्यास असलेला आतंकवादी यासिन भटकळ याला कह्यात घेतले होते. आतंकवादी यासिन भटकळ याचे वर्ष २०११ पासून गोव्यात वास्तव्य होते. बिहार पोलीस आणि ‘इंटेलिजन्स ब्यूरो’ यांच्या संयुक्त कारवाईमध्ये आतंकवादी यासिन भटकळ याला कह्यात घेण्यात आले होते. वर्ष २०१० मध्ये मुंबई पोलिसांनी छोटा राजन टोळीतील ‘शार्पशूटर’ उमेदूर-रहमान याला हरमल येथे कह्यात घेतले होते. उमेदूर-रहमान हा हरमल येथील पोलीस चौकीजवळच वास्तव्यास होता.

संपादकीय भूमिका

तो पकडला गेला असला, तरी अनेक महिने तो भारतात वास्तव्यास असलेले न कळणे, हे सुरक्षायंत्रणांचे अपयश आहे. त्यांच्या कागदपत्रांची कुणी पडताळणी का केली नाही ?