‘१७.५.२०२६ या दिवशी प्रभादेवी, मुंबई येथे सनातन संस्थेने ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’चे भव्य आयोजन केले होते. या महायज्ञाच्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. सौ. रागिणी पाटील, शिक्षिका, पनवेल, जिल्हा रायगड.
अ. ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञामुळे मला बरीच आध्यात्मिक माहिती मिळाली. ‘या देवीला केलेले आवाहन राष्ट्राच्या सुरक्षेसाठी होत आहे’, ही संकल्पनाच मला अतिशय चांगली वाटली.
आ. हा महायज्ञ होत असतांना ‘सगळे ऋषी आणि सप्तर्षि या महायज्ञाला सूक्ष्मातून उपस्थित आहेत’, असे मला वाटले. महायज्ञाचे विधी चालू असतांना हे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर सतत येत होते. ‘सत्ययुगात असेच यज्ञ होत असत’, असे मला वाटत होते.
इ. यज्ञस्थळी मला यज्ञातील ऊर्जा जाणवत होती.
ई. महायज्ञाच्या ठिकाणी भाविकांची केलेली व्यवस्था पुष्कळ चांगली होती. ‘मला या महायज्ञाचा एक भाग होता आले’, त्याबद्दल तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद !’
२. श्री. अखिल अरविंद कर्वे, पनवेल
अ. ‘श्री राजमातंगीदेवीचा महायज्ञ पहाण्यासाठी मी सहकुटुंब उपस्थित होतो. ‘सर्वसाधारणपणे कार्यक्रम किंवा शुभकार्यही ठरलेल्या वेळेत पार पडतेच’, असे नाही. त्याला १५ – २० मिनिटे ते अर्धा घंटा तरी उशीर होतोच; मात्र श्री राजमातंगीदेवी महायज्ञ नियोजित वेळेत चालू झाला.
आ. या महायज्ञाचे आयोजन फार उत्तम होते. तेथील आसन व्यवस्था, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्था उत्तम होती.
इ. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे या महायज्ञामुळे तेथील वातावरण प्रसन्न झाले होते. पुरोहित यज्ञात आहुती देत असतांना श्रीसुक्तातील ऋचा माझ्या कानावर पडत होत्या. त्यामुळे माझा थकवा आणि मनाला थोडीफार आलेली निराशा दूर झाली.
‘त्या मंगल दिवशी सुदैवाने माझा वाढदिवस होता. अशा दिवशी मला आशीर्वाद प्राप्त झाले’, याहून मला आणखी काय हवे ?’
३. डॉ. महालक्ष्मी वानखेडकर, शास्त्रज्ञ आणि कलाकार, मुंबई
अ. श्री राजमातंगीदेवी महायज्ञात आम्हाला सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. ‘या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन आणि वातावरणनिर्मिती’ हे अत्यंत उल्लेखनीय होते. ‘संस्कृती आणि संस्कार’ यांचे सुदृढीकरण या कार्यक्रमात ओतप्रोत दिसत होते. हा यज्ञ म्हणजे सनातन धर्माचे साक्षात सुदृढ रूप आहे, असे मला जाणवले.
आ. यज्ञस्थळी ठेवलेले सोरटी सोमनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश, श्री राजमातंगीदेवी महायज्ञ, तेथील मंत्रोच्चार या सर्वांमुळे स्वर्गीय अनुभूती होत होती.
इ. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेवटच्या मंत्रोच्चाराच्या वेळी मी ध्यानावस्था अनुभवत होते. तेव्हा मला श्री राजमातंगीमातेचे अस्तित्व जाणवत होते. मला पैंजणांचा मधुर आवाज ऐकू येत होता. श्री राजमातंगीदेवी सर्वांना आशीर्वाद देतांना तिचे वात्सल्यरूप दिसत होते. मला एका वेगळ्या शक्तीची अनुभूती होत होती.
ई. वर्तमानात ‘तिसरे महायुद्ध आणि जागतिक तापमानवाढ’ यांचे संकट आहे. या वातावरणात प्रत्येकाला शारीरिक आणि मानसिक बळ यांची अत्यंत आवश्यकता आहे. ती शक्ती या महायज्ञातून आम्हाला मिळाली. या आशीर्वादासाठी आम्ही गुरुजींचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) आणि तेथील सर्व बंधू-भगिनी यांचे अत्यंत ऋणी आहोत.’
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !