(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ केवळ हिंदूंसाठी लिहिलेले गीत !’ – A Raja

द्रमुकचे खासदार ए. राजा यांचा संसदेत चर्चेच्या वेळी दावा

द्रमुकचे खासदर ए. राजा

नवी देहली – ‘आनंदमठ’ कादंबरीमध्ये बंकीमचंद्र चटोपाध्याय यांनी ‘वन्दे मातरम्’ केवळ हिंदूंसाठी लिहिलेले गीत होते, अशी टीका द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी केली. संसदेत ‘वन्दे मातरम्’वर चर्चा करण्यात आली. त्या वेळी राजा यांनी ही टीका केली.

ए. राजा यांनी मांडलेली सूत्रे –

१. ‘वन्दे मातरम्’मधील कडवी इंग्रजांच्या नव्हे, तर मुसलमानांच्या विरोधात !

‘वन्दे मातरम्’वर २० व्या शतकाच्या प्रारंभापासूनच टीका होत आली आहे. ‘वन्दे मातरम्’मधील काही कडवी केवळ इंग्रजांच्याच नव्हे, तर मुसलमानांच्याही विरोधात आहेत. आर्.सी. मजूमदार यांनी म्हटले होते, ‘बंकिमचंद्रांनी देशभक्तीला धर्मात आणि धर्माला देशभक्तीत पालटले.’

२. काँग्रेस या आक्षेपांना उत्तर देत होती. काँग्रेसच्या काही सदस्यांच्या आग्रहावरून रवींद्रनाथ टागोर यांनीही त्यांचे मत मांडले. ‘संपूर्ण कविता तिच्या मूळ संदर्भासह वाचल्यास ती मुसलमानांच्या भावना दुखावू शकते’, असे टागोर यांनी एका पत्रात म्हटले आहे.

३. वर्ष १९०२ मध्ये बंगालमध्ये स्थापन झालेल्या अनुसशान समितीचा सशस्त्र संघर्षाद्वारे स्वातंत्र्य मिळवण्याचा उद्देश होता. ‘वन्दे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यासाठी सर्वांत जोरकस मोहीम या समितीकडूनच राबवण्यात आली. ब्रिटिशांनी जप्त केलेल्या दस्तऐवजांमध्ये असे दिसून आले की, या संघटनेत मुसलमानांना संघर्षकार्यात सहभागी होण्याची अनुमती नव्हती. संघटनेमध्ये प्रवेशावेळी घेतले जाणारे व्रत हिंदूंसाठी पवित्र होते, मुसलमानांसाठी नाही. यावरून ‘वन्दे मातरम्’ला धार्मिक अर्थ काय होता, हे स्पष्ट होते.

४. वर्ष १९०५-१९०८ या काळात बंगालमध्ये मशिदींमध्ये नमाजपठण होत असतांना हिंदू मिरवणुकांमध्ये ‘वन्दे मातरम्’च्या घोषणा देत होते. वर्ष १९०७ मध्ये ‘कोणत्याही मुसलमानाने ‘वन्दे मातरम्’ म्हणू नये आणि स्वदेशी चळवळीत सहभागी होऊ नये’, असे लिहिलेल्या पत्रकांचे वाटप करण्यात आले. वर्ष १९०२-१९१५ या काळात अशा घटनांमध्ये वाढ झाली. ब्रिटनची संसद ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्येही या गाण्यामुळे वाढलेल्या धार्मिक तणावावर चर्चा करण्यात आली. वर्ष १९०५ मध्ये म. गांधी यांच्याकडून बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे कौतुक करण्यात आले; मात्र वर्ष १९४० मध्ये त्यांनी भूमिकेत पालट केला. ‘वन्दे मातरम्’ धार्मिक घोषणा नसून राजकीय घोषणा आहे. मुसलमानांचा अपमान किंवा त्यांना दुखवण्यासाठी त्याचा वापर करू नका’, अशी  गांधी यांची सूचना होती.

५. ‘वन्दे मातरम्’चे स्वप्न काय होते, हे मला ठाऊक नाही; पण पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न मात्र हिंदु राष्ट्र हेच आहे.

संपादकीय भूमिका

प्रारंभीच्या काळात मुसलमानही ‘वन्दे मातरम्’चा उद्घोष करत होते. नंतर त्यांचा बुद्धीभेद करण्यात आल्यावर ते ‘वन्दे मातरम्’ला विरोध करून लागले. त्यानंतर काँग्रेसने मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी ‘वन्दे मातरम्’ला अप्रत्यक्ष विरोध केला आणि त्यातील श्री दुर्गादेवीचा उल्लेख असणार्‍या ओळी काढून टाकल्या !