
१. छातीत दुखल्यावर आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे ‘अँजिओग्राफी’ करण्याचे ठरवणे
‘एके दिवशी सायंकाळी मला ताप आल्यासारखे वाटत होते. दुसर्या दिवशी सकाळी मला पुष्कळ घाम आला आणि छातीत दुखू लागले अन् पुष्कळ अस्वस्थही वाटले. याविषयी पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४९ वर्षे) यांना समजल्यावर त्यांनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना माझ्यासाठी नामजपादी उपाय विचारले.
पू. रमानंदअण्णांनी साधक आधुनिक वैद्यांना माझा ई.सी.जी. (टीप १) काढण्यास सांगितला आणि तो काढल्यानंतर लगेचच मला रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. रुग्णालयात माझी वैद्यकीय चाचणी केल्यानंतर आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा अल्प होत असल्यामुळे ‘अँजिओग्राफी’ (टीप २) केलेली चांगली !’’ माझे सासरे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी सांगितल्याप्रमाणे अँजिओग्राफी गोवा येथील रुग्णालयात करण्याचे ठरले.
टीप १ – ई.सी.जी. (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) : ‘हृदयाचे ठोके, लय आणि कार्य योग्य आहे कि नाही ?’, हे तपासण्यासाठी केली जाणारी वैद्यकीय चाचणी.
टीप २ – अँजिओग्राफी : रक्तवाहिन्यांची तपासणी करून त्यांतील अडथळे शोधण्यासाठी केली जाणारी वैद्यकीय चाचणी.
२. ‘सर्वकाही ईश्वरेच्छेने होत आहे’, असा भाव ठेवल्याचे सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांना सांगितल्यावर त्यांनी ‘गुरु काळजी घेणार आहेत’, असे सांगणे

गोवा येथे जाण्याचा निर्णय झाल्यानंतर सद्गुरु पिंगळेकाका यांच्याशी माझे आणि माझी पत्नी सौ. वैदेहीचे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय २९ वर्षे) बोलणे झाले. तेव्हा त्यांनी विचारले, ‘‘तुम्ही दोघांनी काय भाव ठेवला आहे ?’’ तेव्हा आम्ही सांगितले, ‘‘सर्वकाही ईश्वराच्या इच्छेने झाले आहे, होत आहे आणि होणार आहे’, असा भाव ठेवला आहे.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘हो. सर्वकाही गुरूंच्या इच्छेने होत आहे. ते काळजी घेणार आहेत. देवाची लीला आपण अनुभवायची.’’
३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी गोव्याला येण्यासाठीचा आगगाडीचा प्रवास रहित करून दुसर्या दिवशी चारचाकी वाहनाने निघण्यास सांगणे

३.८.२०२५ या दिवशी मी मंगळुरू येथून गोवा येथे जाण्याचे आगगाडीचे तिकीट काढले. नंतर २.८.२०२५ या दिवशी सद्गुरु पिंगळेकाका यांनी सांगितल्याप्रमाणे मी सद्गुरु गाडगीळकाकांना आम्ही निघत असल्याचे सांगितले. तेव्हा सद्गुरु गाडगीळकाका म्हणाले, ‘‘३ ऑगस्टला प्रवास करू नका. आगगाडीने प्रवास न करता दुसर्या दिवशी चारचाकी गाडीने प्रवास करा.’’ सद्गुरु गाडगीळकाकांशी बोलण्यापूर्वी पू. रमानंदअण्णा यांनीही आम्हाला विचारले होते, ‘‘आगगाडीने प्रवास करणे योग्य आहे का ? आपण चारचाकी गाडीचे नियोजन करायला हवे का ?’’ तेव्हा ‘माझ्या त्या वेळच्या स्थितीला आगगाडीने प्रवास करणे अपेक्षित नव्हते’, हे माझ्या लक्षात आले आणि या प्रसंगातून मला ‘संत साधकांचा किती विचार करतात !’, याची जाणीव झाली.
४. उपचारांच्या कालावधीत आलेल्या अनुभूती !
४ अ. अँजिओग्राफी करण्यासाठी अधिक कालावधीसाठी थांबावे न लागता १५ दिवसांनंतरची वेळनिश्चिती मिळणे : ५.८.२०२५ या दिवशी वैद्यकीय पडताळणी करण्यासाठी आम्ही रुग्णालयात गेलो. तेव्हा आधुनिक वैद्यांनी मला पडताळले आणि १६.८.२०२५ या दिवशी ‘अँजिओग्राफी’ करण्याचे ठरले. एरव्ही अँजिओग्राफी करण्यासाठी रुग्णाला एक ते दीड मास किंवा त्यापेक्षाही अधिक कालावधी थांबावे लागते; परंतु देवाच्या कृपेने मला अँजिओग्राफी करण्यासाठी १५ दिवसांनंतरची वेळनिश्चिती (Appointment) मिळाली.
४ आ. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर थकवा न्यून होऊन उत्साह वाढणे : त्या दिवशी रुग्णालयातून आल्यानंतर सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांना नामजपादी उपायांविषयी विचारल्यावर त्यांनी ४ घंटे ‘ॐ’ आणि १ घंटा ‘शून्य’ हे जप, म्हणजे एकूण प्रतिदिन ५ घंटे नामजप १५.८.२०२५ पर्यंत करण्यास सांगितला. तो नामजप करण्यास आरंभ केल्यानंतर माझा थकवा न्यून होऊ लागला. माझी प्राणशक्ती वाढू लागली आणि उत्साहामध्येही वाढ झाली.
४ इ. मी डोळे मिटून जप करत असतांना ‘माझ्या हृदयात गुरु ध्यानस्थ होऊन जप करत आहेत’, असे दृश्य मला दिसत होते. माझे उपचार पूर्ण होईपर्यंत मला ही अनुभूती येत होती.
४ ई. अँजिओग्राफीपूर्वी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी दिलेली प्रसादरूपी बिस्किटे खाल्ल्याने सतत चैतन्य जाणवणे : ‘अँजिओग्राफी करण्यापूर्वी केवळ २ बिस्किटे आणि कोरा चहा घेऊ शकता’, असे मला सांगितले होते. त्यानुसार १६.८.२०२५ या दिवशी सकाळी निघण्यापूर्वी मी बिस्किटे खाल्ली. हे बिस्किट म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला दिलेला प्रसाद होता. त्यामुळे मला सतत चैतन्य जाणवत होते.
४ उ. रुग्णालयात गेल्यावर ‘सभोवताली भगवंताचे अखंड अस्तित्व आहे’, याची अनुभूती येणे : १६.८.२०२५ या दिवशी अँजिओग्राफीसाठी रुग्णालयात गेल्यानंतर माझ्या समवेत अन्य ३ रुग्ण होते. त्यांची नावे ‘जयराम, व्यंकटेश आणि ज्ञानेश्वर’, अशी होती, तसेच ज्या आधुनिक वैद्यांनी माझी अँजिओग्राफी केली, त्या आधुनिक वैद्यांचे नावही ‘व्यंकटेश’ होते. यातून मला ‘माझ्या सभोवताली भगवंताचे अखंड अस्तित्व आहे’, अशी अनुभूती येत होती.
४ ऊ. तपासणीचा अहवाल सर्वसाधारण (नॉर्मल) आल्याने ‘गुरूंना काहीही अशक्य नाही’, याची प्रचीती येणे : मी तपासणीसाठी खोलीत गेलो आणि तपासणी चालू असतांना माझ्या आतून केवळ ‘गुरुदेव, गुरुदेव’, हा जप चालू होता. तपासणी झाल्यावर लगेचच आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘तपासणीचा अहवाल सर्वसाधारण (नॉर्मल) आहे.’’ त्या क्षणी गुरुकृपेचे स्मरण होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू आले. तेव्हा मला ‘गुरु काहीही करू शकतात. त्यांना काहीही अशक्य नाही’, याची प्रचीती आली.
४ ए. तपासणीचे देयक अल्प असल्याचे पाहून गुरुदेवांनी काळजी घेतल्याचे जाणवणे : अँजिओग्राफीच्या आदल्या दिवशी सायंकाळी रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी अँजिओग्राफीच्या प्रक्रियेविषयी सूचना सांगितल्या, तसेच ‘देयक अधिक भरावे लागू शकतात’, असेही सांगितले. प्रत्यक्षात तपासणीनंतर सर्व देयक अल्प होते. यातून माझ्या लक्षात आले की, गुरुदेव साधकांची आणि गुरुधनाची काळजी घेतात.
५. आजारपणाच्या कालावधीत अनुभवलेली संतांची कृपा !

५ अ. पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे संत, वय ४९ वर्षे) : मी मंगळुरू सेवाकेंद्रात असतांना पू. रमानंदअण्णा प्रतिदिन मला भेटण्यासाठी माझ्या खोलीत येत असत. मी रामनाथीला आल्यावर ते प्रतिदिन दूरभाष करून माझी विचारपूस करत होते. त्यांच्या माध्यमातून श्री गुरूंनी माझी पुष्कळ काळजी घेतली. त्यांची प्रीती मला अनुभवता आली.
५ आ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती : आजारपणाच्या कालावधीत माझ्या मनामध्ये ‘माझ्याकडून समष्टी साधना होत नाही. पुष्कळ सेवा शेष आहेत; पण आता मी काही करू शकत नाही’, असे विचार येत होते. त्या वेळी सद्गुरु पिंगळेकाका यांनी मला पुष्कळ महत्त्वपूर्ण दृष्टीकोन सांगितला. ते म्हणाले, ‘‘समष्टी साधना म्हणजे केवळ जिल्ह्यांत जाऊन किंवा समाजात जाऊन प्रसार करणे’, असे नव्हे, तर आपण विचारांच्या माध्यमातूनही समष्टी सेवा किंवा समष्टी साधना करू शकतो. आता बाहेर जाऊन सेवा करणे शक्य नाही, तर ‘बसून समष्टीसाठी आवश्यक लेख लिहिणे किंवा अन्य काही लिखाण करणे’, असे करू शकतो. यातूनही आपली समष्टी साधना होते.’’ त्यांनी काही संतांची उदाहरणे देऊन सांगितले, ‘‘या संतांच्या शारीरिक स्थितीमुळे ते बाहेर जाऊन सेवा करू शकत नाहीत; पण आश्रमात राहून ते मोठी समष्टी सेवा करत आहेत. कृतीतून ‘समष्टी साधना’ होण्यापेक्षा विचारांत समष्टी साधना असणे महत्त्वाचे आहे.’’ सद्गुरु पिंगळेकाकांनी दिलेल्या या दृष्टीकोनामुळे माझ्या मनातील अयोग्य विचार दूर झाले.
५ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

५ इ १. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेले साधनेचे प्रयत्न केल्यावर नामजप परिणामकारक होणे : मी गोवा येथे आल्यावर माझी पत्नी सौ. वैदेही हिच्याकडे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माझ्यासाठी ३ निरोप पाठवले होते, ‘नामजपादी उपाय पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, भावजागृतीचे अधिकाधिक प्रयत्न करणे आणि मनात येणारे अनावश्यक विचार दूर होण्यासाठी स्वयंसूचना देणे.’
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी दिलेल्या निरोपांनुसार मी नामजप पूर्ण करण्यासाठी श्रद्धापूर्वक आणि गांभीर्याने प्रयत्न केले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील गुरुदेवांची छायाचित्रे पहाणे, गुरुदेवांना अनुभवणे’, अशा विविध माध्यमांतून मी भावजागृतीचे प्रयत्न केले. त्यामुळे नामजप अधिक परिणामकारक होऊन मला त्याचा लाभ झाला.
५ इ २. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी पाठवलेल्या प्रसादामुळे हृदयातील अडथळे नष्ट होत असल्याचे जाणवणे : या कालावधीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी माझ्यासाठी ३ वेळा वेगवेगळे प्रसाद, तसेच तीर्थ पाठवले. त्यांनी पाठवलेला प्रसाद मिळाल्यानंतर मी प्रतिदिन तो ग्रहण केला. त्यामुळे ‘माझ्या हृदयातील अडथळे हळूहळू नष्ट होत आहेत’, असे मला जाणवले.
५ ई. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी भ्रमणभाषवरून विचारपूस करून साधनेविषयी मार्गदर्शन करणे : माझी अँजिओग्राफी झाल्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा मला भ्रमणभाष आला होता. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘केवळ गुरुदेव आहेत; म्हणून हे सर्व सहज शक्य होऊ शकले. ‘नामजप केल्याने किती परिणाम होतो !’, हे सर्वांच्या लक्षात यायला हवे.’’ त्या वेळी त्यांनी मला साधनेच्या दृष्टीने आवश्यक ते मार्गदर्शन केले. ‘साक्षात् गुरूंनी दूरभाष करून विचारपूस केली आणि मार्गदर्शन केले’, याबद्दल त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.
६. ‘आध्यात्मिक स्तरावरील उपाय ही एक संजीवनीच आहे’, याची अनुभूती येणे
‘आध्यात्मिक स्तरावरील उपाय ही एक संजीवनीच आहे’, ही अनुभूती ईश्वराने मला दिली. ‘येणार्या आपत्काळात वैद्यकीय सुविधा किती प्रमाणात उपलब्ध होऊ शकतील ?’, हे ठाऊक नाही; पण ‘संतांनी सांगितलेला नामजप आपल्या आजारावर कशा प्रकारे परिणाम करू शकतो ?’, हे मला या प्रसंगातून शिकायला मिळाले.
‘हे गुरुदेवा, प्राणनाथ, हृदयेश्वर, ‘तुम्ही प्रज्वलित केलेली आत्मज्योत सदैव अखंडतेने प्रज्वलित राहो आणि समाजातील अंधकार दूर करण्यासाठी ती सतत तेवत राहो. हिंदु राष्ट्राचा सूर्य उगवेपर्यंत आणि तुमची इच्छा असेपर्यंत तिचा प्रकाश विस्तारत राहो आणि या जन्माचे सार्थक होवो’, हीच तुमच्या परम पवित्र चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’
– श्री. गुरुप्रसाद गौडा (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४४ वर्षे) मंगळुरू, कर्नाटक. (२८.८.२०२५)
पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/979243.html
(क्रमशः)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !