कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !

‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांची माहिती घेत आहोत. या कलांच्या सादरीकरणाचा उद्देश काळाच्या प्रभावामुळे पालटत असला, तरी ‘कलेकडे केवळ कला म्हणून न पहाता कलेतून आध्यात्मिक उन्नती कशी साधावी’, हे येथे पाहूया.  (लेखांक २२)        

गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत ‘सत्सेवा’ आणि कला !   

‘या लेखाच्या मागील भागात आपण ‘साधक-कलाकाराला त्याच्या साधनेत सत्सेवेमुळे होणारे लाभ आणि कला क्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी सांगितलेले सत्सेवेचे महत्त्व’ पाहिले. आजच्या लेखात आपण ‘साधक-कलाकार कोणकोणत्या प्रकारे सत्सेवा करू शकतात ?’, हे समजून घेणार आहोत. 

‘कला हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर तिच्या माध्यमातून आपण ईश्वरप्राप्ती करू शकतो’, हा विचार समाजामध्ये पोचवणे आज आवश्यक झाले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासह समाजातील काही संतही हेच सूत्र समाजाला सांगत आहेत. ‘गुरुकृपा आणि संतकृपा यांच्या प्राप्तीसाठी संतांच्या कार्यामध्ये आपण आपल्या क्षमतेनुसार सहभागी होणे’, हीच खरी सत्सेवा आहे. सेवा ही तन, मन, धन आणि बुद्धी अर्पून करायची असते. सेवेचे स्वरूप आपल्या क्षमतेनुसार असू शकते, उदा. एखाद्याच्या बुद्धीची क्षमता फारशी नसेल, तर तो शारीरिक सेवांच्या माध्यमातून किंवा धन अर्पण करूनही सत्कार्यात सहभागी होऊ शकतो.     (भाग ३)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1059274.html

१. गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या क्षेत्रांतील कलाकारांच्या भेटी घेणे 

समाजात कलेकडे साधना म्हणून बघणारे बरेच कलाकार आहेत. त्यांनी स्वत:च्या जीवनाची अनेक दशके संगीत-सेवेसाठी समर्पित केली आहेत. ‘त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या कला-साधनेचा लाभ समष्टीसाठी उपलब्ध करून देणे’, ही सत्सेवाच आहे. कलाकारांच्या कला-साधनेतील पैलू जाणून घेण्यासाठी आणि ते भावी पिढीसाठी संग्रहित करण्यासाठी अशा कलाकारांना संपर्क करून आपण त्यांच्या भेटी घेऊ शकतो. या भेटींच्या निमित्ताने ‘कलेच्या माध्यमातून साधना’, हा विषय, तसेच कलेतील संशोधन कलाकारांपर्यंत पोचवणे आपल्याला शक्य होईल. या भेटींमुळे विचारांची देवाण-घेवाण होऊन कलाकार आपल्याशी जोडले जातील. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून अशा अनेक कलाकारांच्या संपर्कामुळे आज अनेक कलाकार या दैवी कार्याशी निरपेक्षपणे जोडले गेले आहेत.

२. कलाकारांच्या मुलाखती घेणे 

समाजातील अनेक कलाकारांनी त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कलेची उपासना केली आहे. काही कलाकारांनी त्यांच्या संगीत-साधनेला आध्यात्मिक साधनेची जोडही दिलेली आहे. अशा कलाकारांच्या मुलाखती घेऊन आपण त्या मुलाखतींचा भावी पिढीसाठी संग्रह करू शकतो. आपण या मुलाखती ध्वनीमुद्रण (‘ऑडिओ’), चलचित्र (‘व्हिडिओ’) किंवा लिखाण या स्वरूपातही घेऊ शकतो.

केवळ ईश्वरासाठी गायन करून स्वतःचा आवाज ईश्वरचरणी अर्पण करणारे प.पू. भक्तराज महाराज यांचे एक शिष्य !

‘इंदूर (मध्यप्रदेश) येथील प.पू. भक्तराज महाराज (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गुरु) यांचे एक शिष्य उत्तम गायचे. त्यांचा आवाज चांगला असून ते भजने अतिशय सुंदर म्हणत असत. अनेक लोकांनी त्यांना म्हटले होते, ‘‘तुझा आवाज चांगला आहे, तर त्याचे ध्वनीमुद्रण करूया’’; पण त्यांनी सांगितले, ‘‘माझा आवाज केवळ ईश्वरासाठीच आहे. मी केवळ ईश्वरासाठीच गाणार.’’ त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यांनी बाहेर गायन केले असते, तर त्यांचे नाव होऊन त्यांना प्रसिद्धीही मिळाली असती, तरीही बाहेरच्या प्रलोभनांना न भुलता त्यांनी गायनातून आध्यात्मिक उन्नती साध्य केली. ईश्वराला गायनकला अर्पण करणे आणि त्या माध्यमातून सेवा करणे’, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.’

– सौ. अनघा जोशी (३.७.२०२६)

कलेच्या माध्यमातून साधनेसाठी विविध सेवा (शारीरिक, बौद्धिक कौशल्यानुसार) शिकण्याच्या दृष्टीने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला अवश्य भेट द्या !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून कलेच्या माध्यमातून साधना करण्यासाठी दिशा देणे’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दैवी कार्य आहे. भगवंत त्याचे कार्य करण्यास समर्थ आहे; परंतु ज्याप्रमाणे पावसापासून वृंदावनवासियांचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता, तेव्हा गोप-गोपींनीही त्या पर्वताला काठ्या लावल्या होत्या (ईश्वरी कार्यात सहभाग घेतला होता), त्याचप्रमाणे या ईश्वरी कार्यात आपल्याला सेवेच्या माध्यमातून आपल्या परीने सहभागी होऊन स्वतःचा उद्धार करण्याची संधी भगवंताने दिली आहे. साधक-कलाकारांनो, या सत्सेवेच्या संधीचा लाभ करून घेऊन आपला उद्धार करून घेऊया !’

– सौ. अनघा जोशी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (३.७.२०२६)

३. संगीत शिकवणी, महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्था यांमध्ये ‘कलेतून ईश्वरप्राप्ती’ या विषयावर व्याख्याने ठरवणे आणि घेणे 

‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’, हा कलेचा उद्देश नवोदित कलाकारांमध्ये रुजवणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. त्यासाठी ‘कलेतून ईश्वरप्राप्ती’ किंवा ‘कलेतून साधना’, हा विषय कला शिकणार्‍या विद्यार्थ्यांसमोर मांडल्यास कलेचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांच्या लक्षात येऊन ते साधक-कलाकार घडतील. ज्यांच्याकडे बोलण्याची कला आहे, ते याप्रकारे विषय मांडण्याची सेवा करू शकतात. त्यामुळे नवोदित कलाकारांमध्ये कलेकडे साधना म्हणून पहाण्याची दृष्टी निर्माण होईल आणि त्यांना कलेतील खरा आनंद अनुभवता येईल.

४. ‘सोशल मिडिया’द्वारे प्रसार करणे 

सौ. अनघा जोशी

आजच्या युगात ‘सोशल मिडिया’ हे लोकांपर्यंत एखादा विषय जलद पोचवण्याचे एक प्रभावी माध्यम झाले आहे. या माध्यमातून चांगला प्रसार होऊ शकतो, उदा. कला-साधनेविषयीच्या पोस्ट, व्हिडिओ रील्स बनवणे आणि इन्स्टाग्राम, फेसबुक, यू-ट्यूब यांसारख्या प्रसारमाध्यमांवरून त्यांचा प्रसार करणे इत्यादी.

५. ‘व्हिडिओ एडीटिंग’ करणे 

‘एखाद्या कार्यक्रमाचे किंवा विषयाचे चलचित्र (‘व्हिडिओ एडीट’) करून ते चांगल्या प्रकारे सिद्ध करणे’, हीसुद्धा कौशल्यपूर्ण सेवा आहे. ज्यांच्यात चलचित्रांचे संकलन (‘व्हिडिओ एडीटिंग’) करण्याचे कौशल्य आहे, ते या माध्यमाद्वारे सेवा करू शकतात.

६. चलचित्राला पार्श्व आवाज (‘व्हॉईस ओव्हर’) देणे

देवाने प्रत्येकाला काही ना काही कौशल्य दिले आहे. काहींना चलचित्रांना लागणारा पार्श्व आवाज देण्याची (‘व्हॉईस ओव्हर’ची) कला अवगत असते. या कौशल्याच्या माध्यमातून कलाकार त्याची कला देवाचरणी समर्पित करू शकतो.

७. कला-साधनेविषयी लेख लिहिणे लेखन हेही प्रसाराचे एक उत्तम माध्यम आहे. लेखनकौशल्य असलेले कला-साधनाविषयीचे लेख लिहू शकतात. 

८. नियतकालिकांमध्ये कला-साधनाविषयीचे लेख प्रसिद्ध करण्यास साहाय्य करणे 

नियतकालिके हे समाजजागृतीचे एक प्रभावी माध्यम आहे. कला-साधनेविषयीचे लेख नियतकालिकांत प्रसिद्ध झाल्यास ते अनेकांपर्यंत पोचू शकतात. त्यातूनही व्यापक प्रसार होऊ शकतो. विविध नियतकालिकांना संपर्क करून अशा प्रकारचे लेख प्रसिद्ध करण्याविषयी विचारणा करू शकतो.

९. कला-साधनेविषयीच्या ग्रंथनिर्मितीला साहाय्य करणे 

कलेच्या प्रात्यक्षिक (प्रॅक्टीकल) आणि तात्त्विक (थेअरी) भागावर आज अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत; परंतु ‘कलेतून साधना’ हा विषय सांगणारी ग्रंथसंपदा आज आपल्याकडे फारशी उपलब्ध नाही. अशा प्रकारच्या ग्रंथांच्या निर्मितीसाठी ‘कला-साधनाविषयीचे लिखाण संकलित करणे’, हेही कला-साधनेच्या प्रसाराच्या दृष्टीने एक योगदानच आहे.

याअंतर्गत ‘विविध कलांविषयीचे ग्रंथ आणि वृत्तपत्रे यांंमध्ये प्रसिद्ध झालेले कलेतून साधनेविषयीचे लिखाण निवडणे आणि त्याचे संगणकावर टंकलेखन करणे’, अशा स्वरूपाच्याही सेवा करून आपण ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊ शकतो.

१०. कलांच्या आध्यात्मिक संशोधनात साहाय्य करणे 

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय विविध विषयांवरील संशोधनाचे कार्य करत आहे. आपल्याला अवगत असलेल्या कलेचा उपयोग संशोधनासाठीही करता येऊ शकतो. आपण सेवा म्हणून या विश्वविद्यालयाच्या संशोधन-कार्यातही सहभागी होऊ शकतो.

११. अवगत असलेल्या कला इतरांना शिकवणे 

आपण आपल्याला अवगत असलेल्या गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांचा प्रात्यक्षिक अन् तात्त्विक भाग इतरांना शिकवण्यासाठी साहाय्य करू शकतो.                       (समाप्त)

संग्राहक : सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, बी.ए. संगीत), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (३.७.२०२६)