Pakistan Women Terrorists : आतंकवादी मसूद अझहर पाकच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला आतंकवादी केंद्र उघडणार !

  • १५ दिवसांचा आतंकवादाविषयीचा अभ्यासक्रम

  • ‘यात सहभागी महिलांना जन्नत (स्वर्ग) मिळेल’, असे आश्वासन !

आतंकवादी मसूद अझहर (उजवीकडे)

इस्लामाबाद – वर्ष २००१मध्ये भारतीय संसदेवरील आतंकवादी आक्रमणासह अनेक आतंकवादी कारवायांचा प्रमुख सूत्रधार जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरने पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला आतंकवादी केंद्राची शाखा उघडण्याची घोषणा केली. हे केंद्र आतंकवादी बनण्यासाठी १५ दिवसांचा अभ्यासक्रम घेईल. या महिला आतंकवाद्यांचा वापर आत्मघातकी आक्रमणांमध्ये केला जाण्याची शक्यता आहे.

१. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार प्रत्येक शाखेचे प्रमुख ‘जिल्हा मुंतेझिमा’ असतील, जी स्थानिक महिलांची भरती करील. यासाठी कठोर नियमही करण्यात आले आहेत, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, या महिला भ्रमणभाषद्वारे अनोळखी पुरुषांशी बोलू शकणार नाहीत.

२. अझहरने वचन दिले की, ज्या महिला या शाखेत सहभागी होतील, त्यांना त्यांच्या कबरीतून थेट स्वर्ग मिळेल. त्याने असेही म्हटले की, पुरुष सैनिक महिलांसमवेत जगभरात इस्लामचा प्रसार करण्यासाठी काम करतील.

३. अझहरने २१ मिनिटांची एक ध्वनीफित प्रसारित केली आहे, ज्यात ‘जागतिक जिहाद’मध्ये महिलांची भरती, प्रशिक्षण आणि त्यांचा वापर करण्याच्या संपूर्ण योजनेचे तपशीलवार वर्णन केले आहे.

४. महिला आतंकवाद्यांचे नेतृत्व मसूद अझहरची बहीण सादिया अझहर करते, जिचा पती युसूफ अझहर ७ मे या दिवशी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मारला गेला.

५. अझहर म्हटले आहे की, ज्याप्रमाणे पुरुषांसाठी ‘दौरा-ए-तरबियत’ हा अभ्यासक्रम आहे, त्याचप्रमाणे महिलांसाठी पहिला ‘दौरा-ए-तस्किया’ हा अभ्यासक्रम असेल, जो बहावलपूर केंद्रात चालवला जाईल. अभ्यासक्रमाचा दुसरा टप्पा ‘दौरा-आयत-उल-निसाह’ असेल, ज्यामध्ये महिलांना इस्लामी पुस्तकांमधून जिहादची पद्धत शिकवली जाईल.

६. गेल्या २० वर्षांपासून हा अभ्यासक्रम पुरुषांना जिहादसाठी सिद्ध करत आहे, तसेच भारताविरुद्ध लढण्यासाठी त्यांना स्वर्गाचे आश्वासन देत आहे. आता महिलांनाही तेच शिकवले जाईल.

७. महिला आतंकवादी केंद्र करण्यामागील कारण सांगतांना अझहर म्हणाला, ‘‘जैशच्या शत्रूंनी हिंदु महिलांना सैन्यात भरती केले आणि महिला पत्रकारांना आमच्याविरुद्ध उभे केले. आता मी माझ्या महिलांना त्यांच्याशी लढण्यासाठी सिद्ध करत आहे.’’

आतंकवादी संघटनांमध्ये गरीब महिलांची भरती

जैश-ए-महंमद बहावलपूर, कराची, मुझफ्फराबाद, कोटली, हरिपूर आणि मानसेहरा येथील मदरशांमध्ये शिक्षण घेणार्‍या आतंकवाद्यांच्या पत्नी अन् गरीब महिला यांना भरती करत आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आतंकवाद्यांच्या नियमात पालट

जैश-ए-महंमदने पूर्वी महिलांना जिहादच्या युद्धात प्रवेश दिला नव्हता; परंतु पहलगाम आक्रमण आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यांच्यानंतर नियम पालटण्यात आले. मसूद अझहर आणि त्याचा भाऊ तल्हा अल-सैफ यांनी महिलांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.

‘इसिस’ आणि ‘बोको हराम’ यांसारख्या संघटना आत्मघातकी आक्रमणांमध्ये महिलांचा वापर करतात.

आतंकवादी अड्डे खैबर पख्तूनख्वा येथे स्थलांतरित केले !

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जैश-ए-महंमद, हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनांनी त्यांचे तळ पाकिस्तानच्या अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांतात स्थलांतरित केले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये नष्ट झालेल्या आतंकवादी तळ पुन्हा बांधण्यासाठी या आतंकवादी संघटना सामान्य लोकांकडून देणग्या मागत आहेत. ऑगस्ट २०२५ पासून जैशने पाकमध्ये ३१३ नवीन मरकज (केंद्र) बांधण्यासाठी ३ अब्ज ९१ कोटी रुपये मिळवण्यासाठी ऑनलाईन देणगी मोहीम चालू केली आहे.

संपादकीय भूमिका

  • पाकमध्ये आतंकवादाची केंद्रे चालू करण्याची उघड घोषणा होत असतांना संयुक्त राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना काय करत आहेत ?
  • आतंकवादाला सामान्य गोष्ट असल्याप्रमाणे शिकवणार्‍या आतंकवाद्यांची भविष्यातील आखणी जाणून जगभरातील हिंदूंनी आतंकवादापासून स्वतःच्या रक्षणाच्या सिद्धतेला गती देणे अपरिहार्य !
  • आतंकवादी संघटनांनी महिला जिहाद्यांच्या रूपात दिलेले आव्हान परतवण्यासाठी भारतात रणरागिणी सिद्ध होणे आवश्यक !