MLA Yatnal Urges Center : कर्नाटक राज्यात ‘हलाल प्रमाणापत्रा’वर बंदी घाला !

भाजपमधून निलंबित झालेले आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र

आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ

बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटक राज्यात ‘हलाल प्रमाणपत्रा’वर बंदी घालावी, अशी मागणी भाजपचे निलंबित आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की,

१. कर्नाटकात हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून काही संघटना पैशाचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे हलाल प्रमाणपत्रावर आणि ते देणार्‍या संस्थांवर बंदी घालावी.

२. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी उत्तरप्रदेश सरकारने अशा सर्व संस्थांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर हलाल प्रमाणीकरण संस्थांकडून हलाल निधीचा गैरवापर आणि त्यांच्या कामकाजावर बंदी घालण्याच्या तातडीच्या आवश्यकतेकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो.

३. नोव्हेंबर २०२३ मध्ये हलाल प्रमाणीकरण संस्थांवर बंदी घालण्याची मागणी करत मी भारत सरकारचे ग्राहक व्यवहारमंत्री पीयुष गोयल यांना पत्र लिहिले होते.

४. धार्मिक संस्थांच्या नावाखाली अनेक इस्लामी संस्था मांस उत्पादन, खाद्य उत्पादने, सौंदर्यप्रसाधने आणि इतर ग्राहक वस्तूंसह विविध क्षेत्रांमध्ये ‘हलाल’ प्रमाणीकरणांना सक्रीयपणे प्रोत्साहन देत आहेत. अशा संस्थांच्या प्रमुख उदाहरणांमध्ये हलाल इंडिया, जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट, ग्लोबल इस्लामिक शरिया, हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र यांचा समावेश आहे.

५. या प्रमाणीकरणांच्या माध्यमातून गोळा होणारा मोठा निधी राष्ट्रविरोधी कारवाया, आतंकवादाला समर्थन, आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना कायदेशीर साहाय्य आणि आतंकवाद अन् जिहादला समर्थन देणार्‍या साहित्याच्या प्रचारासाठी वापरला जात असल्याचे पुरावे आहेत.

संपादकीय भूमिका

मुळात अशी मागणी का करावी लागते ? एव्हाना सरकारने देशभरात हलाल प्रमाणपत्रांवर बंदी घातली पाहिजे होती !