अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !

केतन अग्रवाल हत्या प्रकरण

केतन अग्रवाल

मुंबई, २५ जून (वार्ता.) – पुणे येथील उद्योजक केतन अग्रवाल (वय २६ वर्षे) याच्या हत्येप्रकरणी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे निर्देश २५ जून या दिवशी विधानसभेचे तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी सरकारला दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी माहितीच्या सूत्राअंतर्गत या हत्येचे सखोल अन्वेषण करण्याची मागणी केली होती.

हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी या वेळी सुनील शेळके यांनी केली. सिया गोयल हिने तिचे अन्य युवकासमवेत असलेले प्रेमसंबंध केतन अग्रवाल याच्या कुटुंबियांपासून लपवून ठेवले. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनाही आरोपी करावे, अशी मागणीही या वेळी सुनील शेळके यांनी केली. यावर तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी या प्रकरणाकडे सरकारने बारकाईने लक्ष देण्याचेही निर्देश दिले.