खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन

खासदार संजय दिना पाटील

ठाणे, २५ जून (वार्ता.) – भांडुप येथील निवासस्थानी प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांशी खासदार संजय पाटील यांनी गैरवर्तन केल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचाच निषेध करत ‘ठाणे शहर दैनिक पत्रकार संघा’च्या वतीने २५ जूनला ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले.

या वेळी पत्रकारांनी घोषणा देत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार्‍या अशा वक्तव्यांचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली. ‘ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ’ आणि ‘ठाणे जिल्हा पत्रकार संघा’ने या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे.