‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

(लेखांक ६)

कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !

४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत  पुढील काही भागांत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांचा आध्यात्मिक इतिहास पहाणार आहोत. या लेखात आपण भारतीय कलांच्या निर्मितीविषयी समजून घेऊ.   

भारतीय कलांचा इतिहास आणि त्यांचे आध्यात्मिक स्वरूप !

कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविकातील १६ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘वेदांच्या माध्यमातून कलांच्या निर्मितीचा इतिहास आणि भारतातील प्राचीन कलाप्रवाह’, यांविषयी जाणून घेतले. या भागात आपण ‘काळानुसार पालटत गेलेल्या भारतीय कलांच्या प्रेरणा आणि युगांनुसार कलेतील रंजनाचे पालटत गेलेले स्वरूप’, यांविषयी जाणून घेणार आहोत.

(भाग २)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/965146.html

३. काळानुसार पालटत गेलेल्या कलांच्या प्रस्तुतीच्या प्रेरणा

‘कलांचा इतिहास पाहिला, तर कलांच्या प्रस्तुतीमागील प्रेरणा या कालपरत्वे पालटत गेलेल्या दिसतात. या प्रेरणा आणि त्यांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे.

३ अ. विध्यात्मकता : ‘विध्यात्मकता’ म्हणजे विधीसह केलेली ईश्वराची आराधना. यामध्ये ‘ईश्वराच्या आराधनेसाठी काही विधी करणे’, हा भाग प्रधान होता आणि ते करत असतांना सहजतेने कलांची निर्मिती झाली. त्यामुळे कलांची अभिव्यक्ती ही गौण (दुय्यम) आणि अनुषांगिक (आराधनेच्या परिणामस्वरूप आपोआप घडणारी) होती. विधींच्या वेळी कलांच्या माध्यमातून ‘ईश्वराची स्तुती करणे’ त्यात अंतर्भूत होते. प्राचीन भारतात कलेची निर्मिती आणि प्रस्तुती यांमागे विध्यात्मकता हीच मूळ प्रेरणा होती, उदा. यज्ञाच्या वेळी सामगायन करणे, तसेच नृत्य आणि नाट्य प्रस्तुत करणे.

३ आ. आध्यात्मिक समाराधन : साधनेसाठी केलेले उद्बोधन किंवा मार्गदर्शन, म्हणजे ‘आध्यात्मिक समाराधन’. काळाच्या प्रवाहात ‘ईश्वराच्या आराधनेसाठी कला’ हा मूळ उद्देश मागे पडून कलेची अभिव्यक्ती जेव्हा विचलित आणि गढूळ झाली, तेव्हा कलांचा उपयोग आध्यात्मिक समाराधन, म्हणजेच साधनेचे उद्बोधन करण्यासाठी करण्यात आला, उदा. त्रेतायुगात झालेली नाट्यशास्त्राची निर्मिती, कलियुगात अनेक संतांनी अभंग, भारूड (टीप १), दोहे (टीप २) इत्यादींच्या आधारे समाजाचे केलेले आध्यात्मिक उद्बोधन.

टीप १ – भारूड : हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक कलाप्रकार आहे. यात संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा संगम असतो.

टीप २ – दोहा : हिंदी भाषेतील दोन ओळींचा काव्यप्रकार.

३ इ. लोकप्रबोधन : कलेचा उपयोग लोकप्रबोधनासाठी करण्यात येत होता. भारतीय संस्कृतीतील नीतीमूल्ये, आध्यात्मिक तत्त्वे, आचार-विचार, हे सर्व लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कलेचे माध्यम निवडण्यात आले आहे. ‘लोकप्रबोधन करण्याच्या हेतूने कलाप्रस्तुती व्हायला हवी’, असा उल्लेख नाट्यशास्त्रातील प्रथम अध्यायात येतो. संस्कृत नाटकांतही आरंभी सूत्रधार आणि नटी लोकप्रबोधनपर संभाषण करत असत अन् त्याला जोडूनच पुढे नाट्यप्रयोग होत असे. संतांनीही भजन आणि कीर्तन यांतून अधिकाधिक लोकप्रबोधन केले अन् समाजाला ईश्वरप्राप्तीसाठी साधना शिकवली.

३ ई. निखळ रंजन : कलाकार जेव्हा सृजन (टीप ३) करतो, तेव्हा तो पारलौकिक अंतरातून तत्त्वाशी जोडला जातो. त्या वेळी तो जी सत्-चित्-आनंदमय अवस्था प्राप्त करतो, त्यास ‘निखळ रंजन’, असे म्हणतात. ‘कलाकार आणि प्रेक्षक यांनीही निखळ रंजनाची अनुभूती घ्यावी’, ही प्राचीन भारतात कलेच्या प्रस्तुतीमागील एक महत्त्वाची प्रेरणा होती.

टीप ३ – सृजन करणे : कलाकाराने त्याचे कौशल्य, कल्पकता आणि कलाप्रस्तुतीची शैली यांतून कलेची निर्मिती करणे

४. ‘कलांमधून रंजन होणे’, याचा युगानुरूप पालटलेला अर्थ

सौ. शुभांगी शेळके

बहुतांश वेळा संगीत, नृत्य आणि नाट्य या कलांचा उल्लेख ‘मनोरंजन करणे’, असा करण्यात येतो. त्यामुळे अनेकांना वाटते की, कला हे केवळ मनोरंजनाचे माध्यम आहे. ‘रंजना’चा (मनोरंजनाचा) काळानुसार, म्हणजेच युगानुसार पालटत गेलेला अर्थ पुढीलप्रमाणे आहे.

४ अ. सत्ययुग : सत्ययुगात सगळ्यांमध्ये सोऽहंभाव (टीप ४) होता, म्हणजेच ते आंतरिक आध्यात्मिक आनंदावस्था अनुभवत होते. त्या वेळी ‘कलेतून आत्मरंजन (आध्यात्मिक आनंदावस्था) साधणे’, हा प्रमुख भाग होता. ‘कलेतून ईश्वरप्राप्ती करणे’, हा कलांचा मूळ उद्देश होता, उदा. गंधर्वांचे गायन, अप्सरांचे नृत्य.

टीप ४ – सोऽहंभाव : सः + अहम्, म्हणजे ‘तो ईश्वर मीच आहे’, हा भाव.

४ आ. त्रेतायुग आणि द्वापरयुग : जसजसे कालचक्र पुढे सरकले, तसतसे त्रेतायुग आणि द्वापरयुग यांमध्ये समाजाची सात्त्विकता न्यून होऊन रज-तमाचे प्रमाण वाढले. त्यामुळे कलेतून आत्मरंजनासह बाह्यरंजन, म्हणजे मनोरंजन (मानसिक स्तरावरचे रंजन) होऊ लागले. या काळात आत्मरंजन न्यून झाल्याने निखळ रंजनाने बाह्यरंजनाचे स्वरूप घेतले, म्हणजेच निखळ रंजन ही प्रेरणा मनोरंजनाच्या दिशेने वाटचाल करू लागली.

४ इ. कलियुग : कालचक्रातील शेवटच्या युगात, म्हणजे कलियुगात समाजात सत्त्वगुण मुळातच अत्यल्प आहे. त्यामुळे मनुष्याला ‘कला या आत्मरंजन करण्यासाठी (अंतरातील आध्यात्मिक आनंद अनुभवण्यासाठी) आणि ईश्वरप्राप्तीसाठी आहेत’, याचा विसर पडू लागला आहे. मनुष्य रज-तमाच्या वाढत्या प्रभावाखाली आल्यामुळे तो कलेला केवळ मनोरंजनाच्या दृष्टीनेच पाहू लागला. आज आपण पहात आहोत की, गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या प्रयोगात्मक कलाच काय; पण पूर्ण कलाक्षेत्रात मनोरंजनालाच अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

४ ई. सध्याचे कलियुगांतर्गत कलियुग : सध्याच्या कलियुगांतर्गत कलियुगात तर मनुष्याला कलेतून आत्मरंजनाचा पूर्णपणे विसर पडला आहे आणि त्याला कलेतून केवळ मनोरंजनाचीच ओढ लागली आहे. सध्याच्या काळामध्ये ‘कला’ ही मनोरंजनाकडून हळूहळू खालच्या, म्हणजेच विकृतीच्या स्तरावर चालली आहे. त्यामुळे कलेच्या नावाखाली ओंगळपणा, अश्लीलता, असभ्यपणा इत्यादी वाढले आहे.

वरीलप्रमाणे काळ आणि कला यांचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की, पूर्वी मनुष्याला स्वतःमधील सात्त्विकतेमुळे कलेतील आनंद हा आध्यात्मिक स्तरावरील आनंदवृद्धीसाठी घेता येत होता. त्यामुळे त्याला कलेतून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने जाता येत होते; परंतु पुढे काळानुरूप सात्त्विकता न्यून होत गेल्यामुळे सध्याच्या कलियुगात कलेतील ज्या बाह्य आनंदाला आपण ‘आनंद’ म्हणतो, तो चिरंतन आनंद नसून ते मानसिक स्तरावरचे क्षणिक सुख आहे. सध्या कलाकार आणि प्रेक्षक हे दोघेही या क्षणिक सुखाला भुलल्यामुळे ‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’, हा मूळ उद्देशच हरवलेला दिसत आहे.

५. सारांश

कलेच्या इतिहासातून आपल्याला शिकायला मिळते की, ‘ॐ’कारातून निर्माण झालेल्या भारतीय कला या श्रेष्ठतम आहेत, तसेच त्या चिरंतन (शाश्वत) आणि आध्यात्मिक स्तरावरील आनंद देणार्‍या आहेत. हा आनंद अनुभवण्यासाठी कलेला साधनेची जोड देणे आवश्यक आणि अपरिहार्य आहे. कलेतून शाश्वत आनंदाकडे नेणारा प्रवास, म्हणजेच कलेतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणे होय.

(समाप्त)

(पुढील लेखामध्ये आपण गायनकलेच्या आध्यात्मिक इतिहासाविषयी जाणून घेणार आहोत.)’

– सौ. शुभांगी शेळके (एम्.ए. नाट्यशास्त्र), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२६.९.२०२५)

साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ४.९.२०२५ पासून प्रत्येक गुरुवारी ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधनेचे प्रास्ताविक विवेचन !’ ही लेखमाला चालू झाली आहे. या लेखमालेमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘कलांकडे साधनेच्या दृष्टीने कसे पहावे ?’ या अनुषंगाने दिलेल्या दिशेप्रमाणे मार्गदर्शनपर लेख असणार आहेत. आपल्या संपर्कातील कलाप्रेमी, कलाकार आणि कलेतील जिज्ञासू यांच्यापर्यंत हे लेख पोचवण्याचा प्रयत्न करावा.

या लेखांविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

– संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

संपर्कासाठी पत्ता

श्री. अभिजीत सावंत

संपर्क क्रमांक : ८७९३६७८१७८

ईमेल : [email protected]