‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष यांचे औचित्य साधून फर्मागुडी (गोवा) येथील ‘इन्फिनिटी’ मैदानात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. मैदानाची २२ एकर जागा महोत्सवासाठी व्यापण्यात आली होती. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा तेथील वातावरणावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला. लोलकाने वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. हे संशोधन पुढे दिले आहे.

१. चाचणीतील घटक
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा तेथील वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ८ ते २० मे या कालावधीत महोत्सव परिसरातील विविध घटकांची प्रतिदिन छायाचित्रे काढण्यात आली.
१ अ. माती, पाणी आणि हवा यांचे नमुने : महोत्सवाच्या वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी महोत्सव परिसरातील माती, पाणी आणि हवा यांचे नमुने गोळा करून त्यांची छायाचित्रे काढण्यात आली. (हवेचा नमुना गोळा करण्यासाठी कापसाचा बोळा हवेत फिरवून त्याचे छायाचित्र काढण्यात आले.)

१ आ. व्यासपिठाच्या चारही बाजूंकडील भूमी : १७ ते १९ मे या कालावधीत प्रतिदिन सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाला ३० सहस्रांहून अधिक लोकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. व्यासपिठाच्या समोर, तसेच डाव्या आणि उजव्या बाजूलाही भव्य बैठक व्यवस्था करण्यात आली होती. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा व्यासपिठाच्या चारही बाजूंच्या वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी व्यासपिठाच्या चारही बाजूंकडील भूमीची छायाचित्रे काढण्यात आली.
१ इ. महोत्सव परिसरातील विविध अंतरांवरील ठिकाणे : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ २२ एकर एवढ्या विशाल जागेवर भरवण्यात आला होता. ‘या महोत्सवाचा त्याच्या परिसरातील विविध अंतरांवरील वातावरणावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी महोत्सवाचे मुख्य प्रवेशद्वार, ध्वजारोहणाचे स्थळ आणि महोत्सव स्थळीच्या कुंपणाबाहेरील जागा येथील भूमींची छायाचित्रे काढण्यात आली.
१ ई. महोत्सव परिसरातील वृक्ष : महोत्सव स्थळाजवळ वडाचे एक झाड होते, तसेच महोत्सव स्थळापासून काही अंतरावर निलगिरीचा वृक्ष होता. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा त्याच्या परिसरातील वृक्षांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी त्या दोन्ही वृक्षांची छायाचित्रे काढण्यात आली.

१ उ. महोत्सव परिसरात तात्पुरत्या उभारलेल्या संतांच्या खोल्या : महोत्सव परिसरात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी एक तात्पुरती खोली उभारण्यात आली होती, तसेच त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघींसाठी मिळून एक तात्पुरती खोली उभारण्यात आली होती. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा संतांच्या या २ खोल्यांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी या दोन्ही खोल्यांतील धुळीचे नमुने गोळा करून त्यांची छायाचित्रे काढण्यात आली. (कापसाच्या बोळ्याने खोलीतील भूमीवरील धूळ पुसून त्याचे छायाचित्र काढण्यात आले.)
या सर्व छायाचित्रांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील नोदींचे विवेचन पुढे दिले आहे.
२. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन
२ अ. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा तेथील वातावरणावर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे : ८ आणि ९ मे २०२५ या दिवशी हवेचा नमुना, निलगिरीचा वृक्ष आणि व्यासपिठाच्या चारही बाजूंकडील भूमी यांच्यामध्ये अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली; पण १०.५.२०२५ या दिवसापासून ती नाहीशी झाली. त्यासह सर्व घटकांतील सकारात्मक ऊर्जेत २० मे २०२५ पर्यंत उत्तरोत्तर वाढ होत गेली. सर्व घटकांतील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.
टीप : काही अपरिहार्य कारणाने काही दिवशी काही घटकांची छायाचित्रे काढता न आल्याने त्यांच्या चाचण्या केलेल्या नाहीत. त्यामुळे त्या त्या ठिकाणी ‘-’ असे लिहिले आहे.
वरील नोंदींवरून पुढील सूत्रे लक्षात येतात.
२ अ १. ८ ते १९ मे २०२५ या कालावधीत चाचणीतील घटकांच्या सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर वाढ होत जाणे : महोत्सवाच्या ९ दिवसांपूर्वी (८.५.२०२५ या दिवशी) माती, पाणी, हवा, व्यासपिठाच्या चारही बाजूंकडील भूमी, तसेच महोत्सव परिसरातील विविध ठिकाणे आणि दोन्ही वृक्ष यांच्यातील सकारात्मक ऊर्जा अनुमाने ३.५ ते २० मीटर होती. पुढील ८ दिवसांत या घटकांतील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर वाढ होत गेली. महोत्सवाच्या आदल्या दिवशी (१६.५.२०२५ या दिवशी) या घटकांतील सकारात्मक ऊर्जा अनुमाने २०० ते ५७० मीटर होती, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
२ अ २. महोत्सव काळात (१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत) सर्व घटकांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ अधिक प्रमाणात वाढ होऊन ती सहस्रो मीटर झाली, हे पुष्कळच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
२ अ ३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील धुळीत सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा होती.
२ अ ४. महोत्सव संपल्यानंतर दुसर्या दिवशीही (२०.५.२०२५ या दिवशी) सर्व घटकांतील सकारात्मक ऊर्जा टिकून होती.

२ अ ५. माती, पाणी आणि हवा यांच्या नमुन्यांत उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे : पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वे आहेत. माती पृथ्वीतत्त्वाशी, पाणी आपतत्त्वाशी आणि हवा वायुतत्त्वाशी संबंधित आहेत. पृथ्वी, आप आणि वायु ही तत्त्वे उत्तरोत्तर अधिक उच्च स्तराची असल्याने महोत्सव परिसरातील माती, पाणी अन् हवा यांच्या नमुन्यांमध्ये उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.
२ अ ६. व्यासपिठाच्या चारही बाजूंकडील भूमीत सकारात्मक ऊर्जा असणे; पण तिचे प्रमाण निरनिराळे असणे : व्यासपिठासमोर पूर्व दिशा, मागे पश्चिम दिशा, डावीकडे उत्तर दिशा आणि उजवीकडे दक्षिण दिशा होती. पूर्व आणि उत्तर या उगम दिशा, तर पश्चिम अन् दक्षिण या अस्त दिशा आहेत. अस्त दिशेपेक्षा उगम दिशेत मूलतः सात्त्विकता अधिक असते. यामुळे व्यासपिठाच्या चारही बाजूंकडील भूमीत सकारात्मक ऊर्जा होती; पण तिचे प्रमाण निरनिराळे होते. व्यासपिठाच्या पूर्व दिशेकडील भूमीत सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आढळून आली. त्या खालोखाल उत्तर, पश्चिम आणि दक्षिण दिशेतील भूमीत सकारात्मक ऊर्जा आढळून आली. (यावरून व्यासपीठ पूर्वेच्या दिशेने तोंड करून असावे, याचे महत्त्व स्पष्ट होते.)
२ अ ७. निलगिरी वृक्षाच्या तुलनेत वटवृक्षात अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे : निलगिरीच्या वृक्षात औषधी गुणधर्म आहेत. ‘वटवृक्षात त्रिदेवांचा वास असतो’, असे धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे वटवृक्षाचे पूजन केले जाते. हे दोन्ही वृक्ष सात्त्विक आहेत; पण वटवृक्षात देवतांचे चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे वटवृक्षात अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.
२ आ. निष्कर्ष : महोत्सवाचा कालावधी जसजसा जवळ येत गेला, तसतसे सर्व घटकांतील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेले. त्यामुळे महोत्सवाच्या आदल्या दिवसापर्यंत त्या घटकांत २०० ते ५७० मीटर सकारात्मक ऊर्जा आढळून आली. महोत्सव आरंभ झाल्यापासून तो संपेपर्यंत सर्व घटकांतील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर आणखी वाढ होऊन ती सहस्रो मीटर झाली. यातून ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा तेथील वातावरणावर आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला’, असे लक्षात येते.
३. चाचण्यांतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

३ अ. जसजसा महोत्सवाचा कालावधी जवळ येऊ लागणे, तसतसे तेथील वातावरणात अधिकाधिक चैतन्य निर्माण होऊ लागणे : महोत्सवाच्या सिद्धतेसाठी देशभरातून शेकडो साधक आले होते आणि ते विविध सेवांमध्ये सहभागी झाले होते. ते देहभान हरपून सेवारत होते. सनातनचे संत आणि सद्गुरु महोत्सव ठिकाणी जाऊन विविध सेवांची पहाणी करून साधकांना वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. जसजसा महोत्वाचा दिवस जवळ येत होता, तसतसे तेथील वातावरण अधिकाधिक चैतन्यमय होऊ लागले. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनीही महोत्सवाच्या ठिकाणी पहाणी करून आवश्यक ते पालट वेळोवेळी करण्यास सांगितले. एकूणच संतांची चैतन्यमय उपस्थिती अन् त्यांचे अमूल्य मार्गदर्शन, साधकांचा सेवाभाव आणि महोत्सवाला देवतांचे मिळणारे आशीर्वाद यांमुळे महोत्सव परिसरातील वातावरण अधिकाधिक चैतन्यमय बनत होते.
३ आ. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चा तेथील वातावरणावर पुष्कळ सकारात्मक परिणाम होण्याचे कारण : महर्षींच्या आज्ञेने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत सनातन संस्थेने आयोजित केलेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ म्हणजे भव्य-दिव्य अलौकिक सोहळा होता. या महोत्सवाला देश-विदेशातील साधक, संत, सद्गुरु, धर्मप्रेमी, निरपेक्षपणे कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ, तसेच अनेक निमंत्रित मान्यवरही उपस्थित होते. या महोत्सवाच्या माध्यमातून जणू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अलौकित्व समस्त विश्वासमोर प्रगट होऊन त्यांची दिगंत किर्ती झाली. या महोत्सवाला देवता, ऋषीमुनी, उच्च लोकांतील दिव्यात्मे आदी सूक्ष्मरूपाने उपस्थित होते. महोत्सव कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांकडून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत होते. यांमुळे महोत्सव परिसर अलौकिक चैतन्याने भारित झाला होता. याचा सुपरिणाम तेथील वातावरणावरही दिसून आला.
३ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील धुळीत सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा असण्याचे कारण
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव अध्यात्मातील सर्वाेच्च पदावर विराजमान आहेत. त्यांच्यामध्ये मूलतःच पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. महोत्सव कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमधील चैतन्य पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले. त्यांच्यातील चैतन्याचा परिणाम त्यांच्या खोलीवर झाल्याने तीही चैतन्याने भारित झाली. त्यामुळे यांच्या खोलीतील धुळीत सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आढळून आली.
थोडक्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आध्यात्मिक महत्त्व या संशोधनातून अधोरेखित झाले. या महोत्सवाच्या निमित्ताने आम्हा साधकांना सेवेची अमूल्य संधी देणार्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.७.२०२५)
| • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |


‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!