Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्‌मध्ये आगमन !

महाराष्ट्रभरात पाऊस पोचण्यासाठी २० जून उजाडणार, पुणे-मुंबईत १० ते १५ जून या कालावधीत पावसाची शक्यता !

मोसमी पावसाचे (‘मान्सून’चे) आज केरळम् राज्यात आगमन !

नवी देहली – मोसमी पावसाचे (‘मान्सून’चे) ४ जून या दिवशी केरळम् राज्यात आगमन झाले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ५ जूनच्या संध्याकाळपर्यंत केरळम्‌चा बराचसा भाग हा मोसमी पावसाने व्यापला जाईल. तसेच पुढील ३ ते ४ दिवसांत कर्नाटकाच्या किनारपट्टीवरून तो पुढे सरकेल. गोव्याच्या अक्षांशापर्यंत पोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे १० जूनपर्यंत तळकोकणातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

१० जूननंतर मात्र मोसमी पावसाची गती अल्प रहाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पोचण्यासाठी २० जून उजाडेल. मुंबई-पुण्यात साधारणपणे १० ते १५ जून या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा ९० टक्क्यांहून अल्प पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जून महिन्यात अल्प पाऊस पडेल. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत मात्र पाऊस अधिक पडेल. काही भागांत पुराचा धोका आहे, तर काही ठिकाणी अत्यल्प पाऊस पडू शकतो.