परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !

सध्याच्या ‘पेपर फुटीच्या’च्या संकटावर बोलण्यापूर्वी ५ वेगळ्या आठवणी मनात येतात, ज्यामुळे संस्थात्मक उत्तरदायित्वावर मोठे प्रश्न निर्माण होतात. ४ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्वमर्जीतील विद्यार्थ्यालाच वर्गात प्रथम क्रमांक मिळवून देण्याची काही प्राध्यापकांची वृत्ती, प्राध्यापकाने विद्यार्थ्यांना बाह्य परीक्षकांची ओळख करून देत प्रश्नपत्रिकेची माहिती मिळवून देण्याचे आमीष दाखवणे आणि पेपरफुटींच्या प्रकरणांमध्ये शिक्षक हे शिक्षण माफियांचे दलाल असल्याचे उघड’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

भाग २ 

लेखिका : डॉ. क्षिप्रा माथूर, अभ्यागत प्राध्यापिका आणि पत्रकार, जयपूर, राजस्थान.

भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1047194.html

८. परीक्षांना थट्टा आणि भ्रष्ट संस्कृतीचे पोषण करणारे विद्यार्थी पुढे उच्च पदावर बसणे, हे यंत्रणेचे अपयश !

जेव्हा शिक्षक स्वतःच व्यवस्थेचे कुलूप तोडणारे आणि दलाल बनतात, तेव्हा नैतिकता, नीतीमत्ता अन् सचोटी यांना काहीच किंमत उरत नाही. उच्च पदांवर बसलेल्या लोकांनी व्यवस्थेवर खोटेपणाचा एक जाड बुरखा घट्ट ओढून घेतला आहे आणि तो कुणीही फाडू शकलेले नाही. याच्या परिणामांचा विचार करा. जेव्हा परीक्षांना थट्टा मानणार्‍या विद्यार्थ्यांचा गट व्यवस्थेत गैरमार्गाने प्रवेश मिळवतात, तेव्हा त्यांच्या भविष्यातील निर्णयांना काय किंमत उरते ? आपल्या व्यवस्थेचे वास्तव हे आहे की, जो पकडला जातो, त्यालाच चोर ठरवले जाते. जे यशस्वीपणे व्यवस्थेत घुसले आहेत, ते केवळ त्यांनी जन्म दिलेल्या त्याच भ्रष्ट संस्कृतीचे पोषण करतील. नेमक्या याच तुटलेल्या शिडीवरून अनेक जण शिक्षक, पत्रकार, कुलगुरु, नोकरशहा आणि अगदी उच्च पदस्थ न्यायाधीश बनले आहेत.

९. उत्तरपत्रिका पडताळणार्‍या शिक्षिकेला परिचित विद्यार्थ्याने दूरभाष करून चांगले गुण देण्याची विनंती करणे

माझा पाचवा विचार विद्यापिठाच्या आणि मुक्त विद्यापिठाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका पडताळण्याच्या माझ्या अनुभवातून आला आहे. या उत्तरपत्रिका नेमून देण्याला माझा अनेकदा आक्षेप होता आणि परीक्षक म्हणून ‘पॅनेल’वर (मंडळावर) येण्यासाठी मी कधीही अर्ज केला नाही. खरेतर मी अनेकदा त्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत करायचे आणि प्रशासनाला सांगायचे की, ज्यांना पडताळणी करायला खरोखर आवडते, त्यांना त्या द्याव्यात. एकदा उत्तरपत्रिकांचा एक मोठा गठ्ठा माझ्या घरी पोचला. त्याच वेळी मला एक दूरभाष आला आणि तो करणारे माझे पत्रकारितेतील पूर्वीचे सहकारी होते अन् ते सध्या विद्यार्थी म्हणून शिकत होते. ते म्हणाले, ‘माझी उत्तरपत्रिका तुमच्या गठ्ठ्यात असलीच पाहिजे. माझ्यावर एक उपकार करा.’ मी थक्क झाले. त्यांना हे कळले तरी कसे ? मी या माहितीच्या गळतीची तक्रार करण्यासाठी तात्काळ कुलगुरूंना दूरभाष केला. त्यांनी या संकटावर तोडगा काढण्याऐवजी हा विषय टाळला. ते मला म्हणाले, ‘ज्या लोकांनी तुम्हाला दूरभाष केला, त्यांची नावे मला द्या.’ मी रागाने म्हणाले, ‘तुमच्याच कार्यालयातून परीक्षकांची सूची कुणी फोडली ? याचे अन्वेषण तुम्ही का करत नाही ?’ त्यांनी दावा केला की, माझ्याकडून औपचारिक अशी लेखी तक्रार मिळाल्याखेरीज ते चौकशी चालू करू शकत नाहीत. मी त्यांच्याकडे ‘माझ्याकडील उत्तरपत्रिका परत मागवाव्यात आणि परीक्षक मंडळातून माझे नाव काढावे’, अशी मागणी केली, तसेच त्यांना एक औपचारिक पत्रही पाठवले. अपेक्षेप्रमाणे काहीही पालटले नाही. जसजसा वेळ गेला, तसतसे मी त्याच लोकांना त्यांच्या परीक्षा उत्तीर्ण होतांना, ‘डॉक्टरेट’ (विद्यावाचस्पति) पदवी मिळवतांना आणि सामाजिक स्तरावर त्यांना आणखी पुढच्या पुढच्या पदांवर जातांना पाहिले.

खरे गुरु असलेले शिक्षकच खरा आदर मिळवतात !

डॉ. क्षिप्रा माथूर

जगात असे लाखो शिक्षक आहेत, जे खरे ‘गुरु’ आहेत. ते खरा आदर मिळवतात आणि खरे मार्गदर्शक म्हणून काम करतात, जे विद्यार्थ्यांना असे धडे देतात अन् विद्यार्थी ते धडे आपल्या कुटुंबापर्यंत पोचवतात. ते शांतपणे ‘जी स्वतःचा आत्मसन्मान गमावण्यास किंवा स्वतःचा आत्मा विकण्यास नकार देईल’, अशी पिढी घडवत आहेत. एका खर्‍या शिक्षकाचा धडा साधा असतो तो, म्हणजे ‘तुम्ही एखाद्या भ्रष्ट प्राध्यापकाच्या लहरींवर किंवा त्याच्या कृपेवर यशस्वी होणार नाही. तुम्ही या जगात तुमचे स्थान केवळ तुमच्या अंगभूत प्रतिभेने आणि अथक परिश्रमाने निर्माण कराल. जर तुम्ही हट्टीपणा निवडला आणि तुम्ही कठीण प्रश्न विचारण्याचे, सत्याची मागणी करण्याचे अन् उत्तरदायित्वाचा आग्रह धरण्याचे ठरवले, तर तुम्ही त्याच्या परिणामांसाठीही सिद्ध असले पाहिजे. देशातील सर्वोच्च पदांवर असलेले लोक तुमच्याकडे तुच्छतेने पाहू शकतात, या वस्तूस्थितीसाठी तुम्ही सिद्ध असले पाहिजे. प्रस्थापित व्यवस्था तुम्हाला एक उपद्रवी व्यवस्थेला मोडून काढणारा एक विघटनकारी कार्यकर्ता म्हणून शिक्का मारू शकतात.’

– डॉ. क्षिप्रा माथूर

१०. भ्रष्टाचाराच्या अंधारात सत्याच्या बाजूने चालणारे काही प्रामाणिक शिक्षक

असे असतांनाही भ्रष्टाचाराच्या या अंधार्‍या खोलीतही माझी एका खर्‍या शिक्षकाशी गाठ पडली. चंदीगडहून आलेले ते सज्जन गृहस्थ, जे काही काळासाठी आमचे प्राचार्य म्हणून आले होते, त्यांनी प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याला चांगले वागवले, मला त्यांच्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी करून घेतले आणि त्यांच्या प्रकाशनांमध्ये आम्हाला पूर्ण श्रेय मिळेल, याची खात्री केली. ते अत्यंत क्लिष्ट संकल्पनाही सहजपणे संभाषणातून समजावून सांगत असत. प्रश्नपत्रिका फोडणार्‍या शैक्षणिक गटाच्या चुकीच्या प्रकारांमुळे तेही पुष्कळ निराश झाले होते. ही तीच व्यक्ती होती, जिच्याशी मी माझ्या पदव्युत्तर शिक्षणाच्या वेळी परीक्षा सतत पुढे ढकलल्या जात असल्यामुळे भांडले होते. ते स्थानिक गटांच्या दबावापुढे झुकत होते. मी एक मोहीम चालू केली होती, पत्रे लिहीत आणि खालच्या अधिकार्‍यांपासून ते अधिष्ठाता आणि कुलगुरु यांच्यापर्यंत माझा मार्ग काढत होते. त्या वेळी ते पुष्कळ संतापले असले, तरी अखेरीस त्यांनी माझ्या भूमिकेचा आदर केला. सर्व विरोधांना न जुमानता केवळ माझी विनंती मान्य करण्यासाठी त्यांनी ठरलेल्या वेळेनुसार परीक्षा घेतल्या. मी माझ्या पदव्युत्तर परीक्षेत विद्यापिठात प्रथम आले आणि नंतर त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी माझ्या पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण झाले. अखेरीस त्यांनी माझ्यावर ठेवलेल्या अफाट विश्वासाला सार्थ ठरवले.

११. भारतातील सार्वजनिक परीक्षांची अखंडता संकटाच्या उंबरठ्यावर

शिक्षण क्षेत्रातील या भ्रष्ट द्वारपालांशी माझ्या स्वतःच्या संघर्षानंतर अनेक दशकांनी माझ्या तरुणपणीचा स्थानिक शैक्षणिक दुटप्पीपणा असलेला अपप्रकार आता एका विनाशकारी देशव्यापी संकटात पसरला आहे. भारतातील सार्वजनिक परीक्षांची अखंडता आता एका गंभीर संरचनात्मक संकटाच्या उंबरठ्यावर आहे. आकडेवारीच्या विश्लेषणातून असे दिसून येते की, केवळ वर्ष २०१९ ते वर्ष २०२४ च्या मध्यापर्यंत देशभरात किमान ६५ अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांची नोंद झाली आहे. या प्रणालीगत अपयशामुळे १ कोटी ४० लाखांहून अधिक उमेदवारांचे आयुष्य विस्कळीत झाले आहे आणि भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर रहित झाल्या असून ३ लाखांहून अधिक रिक्त सरकारी पदे गोठवण्यात आली आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या स्थानिक प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांनी प्रादेशिक स्तरावरील राज्यस्तरीय भरतीला विशेषतः उत्तरप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये ग्रासले असले, तरी ही असुरक्षितता आता राष्ट्रीय परीक्षा संस्थांमध्येही आक्रमकपणे पसरली आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षा आणि केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (सीटीईटी) यांच्या संस्थात्मक चौकटीत प्रचंड व्यत्यय आला आहे, ज्यामुळे ‘इनक्रिप्टेड’ (सुरक्षिततेसाठी डिजिटल माहिती एखाद्या गुप्त संकेतकांमध्ये पालटून ठेवणे) डिजिटल माध्यमांद्वारे प्रश्नपत्रिका फुटीचा शस्त्र म्हणून वापर करण्यास सक्षम असलेल्या अत्याधुनिक अन् बहुराज्यस्तरीय व्यावसायिक टोळ्या उघडकीस आल्या आहेत.

१२. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी सरकारकडून कायदा लागू !

या वाढत्या धोक्याला रोखण्यासाठी भारत सरकारने ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) कायदा’ लागू केला. हा कायदा प्रश्नपत्रिका फुटणे आणि संघटित संस्थात्मक फसवणूक यांना अजामीनपात्र फौजदारी गुन्हे म्हणून वर्गीकृत करून अवैध बाजारपेठ चालवणार्‍या शक्तीशाली टोळ्यांकडे लक्ष केंद्रीत करतो. या कायद्यानुसार प्रश्नपत्रिका उघड करणे, उत्तरपत्रिकांमध्ये पालट करणे किंवा संगणकीकृत परीक्षा प्रणाली हॅक करणे यांसारख्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींना ३ ते १० वर्षांपर्यंतच्या कठोर कारावासाची आणि १ कोटी रुपयांपर्यंतच्या अनिवार्य दंडाची शिक्षा होऊ शकते. याखेरीज प्रशासकीय निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी हा कायदा अभूतपूर्व उत्तरदायित्व लागू करतो. जर एखादा परीक्षा सेवा प्रदाता, खासगी विक्रेता किंवा मुद्रणालय कायद्याच्या उल्लंघनामध्ये सहभागी असल्याचे आढळले, तर त्यांना १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड, कोणत्याही सार्वजनिक परीक्षा घेण्यावर ४ वर्षांची बंदी आणि संपूर्ण परीक्षा पुन्हा घेण्याचा येणारा व्यय देण्यास कायदेशीररित्या उत्तरदायी धरले जाते. तरीही जनतेचा संताप अभूतपूर्व पातळीवर असतांना आणि या प्रणालीगत अपयशांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयावर उत्तर देण्याचा प्रचंड दबाव असतांना स्वायत्त राज्य मंडळांमध्ये एक समान कार्यवाही हा एक मोठा अडथळा आहे.

१३. पेपरफुटी कायमस्वरूपी थांबवण्यासाठी सरकारने कायद्याची कडक कार्यवाही करणे आवश्यक !

शेवटी सांगायचे झाल्यास जोपर्यंत या गळती कायमस्वरूपी थांबवण्यासाठी खरे संरचनात्मक प्रयत्न केले जात नाहीत, तोपर्यंत आपण या भ्रष्ट जगाचा गलबला दूर ठेवू शकत नाही. खर्‍या शिक्षकांचा वारसा टिकवून ठेवणे, हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. येथे मांडलेली ही भीषण आणि वास्तविकता अखेरीस भूतकाळातील एक अवशेष बनेपर्यंत आपण लढत राहिले पाहिजे.

(समाप्त)