‘श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) यांची त्यांच्या मुलांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. श्री. परशुराम प्रभुदेसाई (वडील, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे)
१ अ. मितभाषी : ‘बाबा कधीच अनावश्यक बोलत नाहीत.
१ आ. व्यवस्थितपणा : बाबांना प्रत्येक वस्तू जागच्या जागी आणि व्यवस्थित ठेवलेली आवडते. आम्ही साहित्य व्यवस्थित ठेवले नाही, तर ते आम्हाला त्याची त्वरित जाणीव करून देतात.
१ इ. सुंदर हस्ताक्षर : बाबांचे अक्षर पुष्कळ सुंदर आहे. ते सारणी लिखाण, दैनंदिनी, सेवा अहवाल इत्यादी सुंदर अक्षरांत लिहितात. ‘त्यांनी लिहिलेल्या वह्यांकडे पहातच रहावे’, असे वाटते.
१ ई. उत्तम शिक्षक : बाबा शिक्षक होते. त्यांनी विद्यार्थ्यांना घडवले आहे. बाबांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांना बाबा भेटल्यावर पुष्कळ आनंद होतो. एकदा मडकई येथील एक साधक सेवेनिमित्त माझ्या बाबांना समवेत घेऊन गेले होते. ते साधक आणि बाबा ज्या घरी गेले, त्या सर्व घरांत बाबांचे विद्यार्थी होते. त्यांना बाबांना पाहून पुष्कळ आनंद व्हायचा आणि सगळे जण बाबांच्या पाया पडायचे. ते त्यांच्या पत्नी आणि मुले यांनाही ‘हे माझे सर (शिक्षक) आहेत’, अशी ओळख करून द्यायचे. ‘सर घरी आले, म्हणजे आज दिवाळी आहे’, असे त्यांना वाटले आणि तसे त्यांनी बोलूनही दाखवले.
१ उ. आमचे काही चुकत असल्यास बाबा आम्हाला त्याची जाणीव करून देतात.
१ ऊ. जाणवलेला पालट : बाबांनी भक्तीसत्संगात ‘विचारण्याची वृत्ती आणि ऐकण्याची वृत्ती’, या विषयांवरील सूत्रे ऐकल्यापासून बाबांमध्ये पालट झाला आहे. आता ते एखादा निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला विचारतात आणि आम्ही काही सांगितले, तर आमचे ऐकतात.
२. सौ. पूनम प्रभुदेसाई (आई, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे)

२ अ. अग्निदेवतेप्रती कृतज्ञताभाव : आई सकाळी ‘गॅस शेगडी’ चालू करण्यापूर्वी शेगडीला कुंकू लावते आणि प्रार्थना करते.
२ आ. सुगरण : आई पुष्कळ चांगला स्वयंपाक बनवते. एकदा कु. वैष्णवी कामत (मोठ्या मुलीची मुलगी) हिने आमच्या आईला ‘तू अन्नपदार्थ बनवतांना त्यात काय घालतेस ? तू केलेला अन्नपदार्थ रुचकर होतो’’, असे विचारले. तेव्हा आईने सांगितले, ‘‘मी नाम आणि प्रेम घालते. (मी नामजप करत आणि प्रेमाने अन्नपदार्थ बनवते.) त्यामुळे तो रुचकर होत असावा.’’
२ इ. प्रेमळ : आई घरी आलेल्या पाहुण्यांना पुष्कळ प्रेम देते.
२ ई. आई शिक्षिका होती. ती आम्हा तिघा मुलांना सांभाळून नोकरी करायची. ती सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायची आणि घरातील सर्व आवरून वेळेत शाळेत जात होती.
२ उ. इतरांना आधार देणे : आमच्या घरी एक शिक्षिका येत असत. त्या आईशी त्यांना होत असलेल्या त्रासाविषयी बोलत असत. त्या नेहमी म्हणत, ‘‘तुमच्याकडे कधीही आले, तरीही सगळे जण हसून स्वागत करतात. त्यामुळे माझा ताण नाहीसा होतो.’’
२ ऊ. कर्तव्याची जाणीव : आमच्या आईच्या मोठ्या बहिणीने (आताचे वय ९५ वर्षे) आमच्या आईला लहानाचे मोठे केले आहे. त्याबद्दल आमची आई नेहमी तिच्या बहिणीच्याप्रती कृतज्ञ असते. आईच्या बहिणीकडून कधी वागण्यात काही झाले, तरीही आई आम्हाला सांगते, ‘‘पूर्वी तिने आमच्यासाठी पुष्कळ केले आहे. त्यामुळेच आम्ही इथे आहोत.’’ काही मासांपूर्वी आईने तिच्या मोठ्या बहिणीला आमच्या घरी आणून तिची सेवा केली.

२ ए. सेवेची तळमळ
१. आईने या वयातही सेवेसाठी संगणक हाताळण्याचे आणि ‘स्मार्टफोन’ वापरण्याचे शिकून घेतले आहे. आई संगणकात लेखासंबंधी (अकाऊंटिंग) सेवा करते. ती लेखाची सेवा परिपूर्ण करते.
२. आईने ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी नातेवाईकांकडून अर्पण मिळवले. त्या वेळी आईने एका नातेवाइकांना माझ्यासमोर (श्री. गिरिजय समोर) संपर्क केला. ते नातेवाईक नास्तिक आहेत. आईने त्यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’विषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी १० सहस्र रुपये अर्पण दिले. तेव्हा ‘चैतन्याच्या स्तरावर सर्व कार्य होत असते’, याची मला निश्चिती झाली.
२ ऐ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : आईला कुणीही माझ्याविषयी (श्री. गिरिजयविषयी) विचारल्यास आई त्यांना सांगते, ‘‘मी त्याला प.पू. डॉक्टरांच्या चरणी अर्पण केले आहे. ते त्याची काळजी घेतील.’’
२ ओ. जाणवलेला पालट : पूर्वी आईला सारणी लिखाण करणे शक्य होत नव्हते. पूर्वी तिला तिच्याकडून होत असलेल्या चुका लक्षात येत नव्हत्या. याचा तिला ताण येत होता. आता तिला स्वतःच्या चुका लक्षात येतात. तिची अंतर्मुखता वाढली आहे.
२ औ. अनुभूती
२ औ १. आईच्या शरिरावरील फोड एका संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर ५ दिवसांनी नाहीसे होणे आणि संतांनी ‘‘आईमधील भावामुळे ती लवकर बरी झाली’’, असे सांगणे : एकदा आईच्या शरिरावर फोड आले होते. अनेक आधुनिक वैद्यांनी तिला दिलेल्या औषधांचा काही परिणाम झाला नाही. त्या वेळी आई अनुमाने एक मास रात्री झोपली नव्हती. आईला झालेल्या फोडांमधून पू बाहेर येत होता. आईच्या शरिरावर सर्वत्र फोड झाल्याने आईला पुष्कळ वेदना होत होत्या. एका संतांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘आईवर करणी केली आहे.’’ त्या संतांनी आईला नामजपादी उपाय सांगितले. आईने नामजपादी उपाय केल्यावर ५ दिवसांनी आईच्या शरिरावरील सर्व फोड नाहीसे झाले. याविषयी त्या संतांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘आईमधील भावामुळे ती लवकर बरी झाली.’’

३. आई-वडिलांची जाणवलेली सामायिक गुणवैशिष्ट्ये
३ अ. मुलांवर चांगले संस्कार करणे : आई-बाबांनी ते साधनेत येण्यापूर्वीच आमच्यावर चांगले संस्कार करून आम्हाला घडवले आहे. आम्ही लहानपणी मावशीच्या घरी जात होतो. तेव्हा मावशीचे यजमान बाहेरून घरात आल्यावर म्हणायचे, ‘‘मी बाहेर असतांनाच मला समजले, ‘सविता (आईचे आधीचे नाव) आणि तिचे कुटुंबीय आले आहेत. तुम्ही चपला एका रांगेत ठेवता.’’ आई-बाबा आम्हाला सांगत, ‘‘तोंडाचा आवाज न करता जेवायचे. सर्वांसमोर तोंडाचा आवाज करत जेवणे योग्य नाही.’’ आमच्या तोंडून कधी अपशब्द आल्यास ते आम्हाला कठोर शब्दांत त्याची जाणीव करून देत असत. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी आई-बाबा आम्हा तिघांना बसवून श्लोक, तसेच स्तोत्रे म्हणवून घ्यायचे. त्यामुळे आम्हाला देवाची गोडी लागली.
अशा अनेक गोष्टी त्यांनी आम्हाला केवळ सांगितल्या नाहीत, तर त्यांनी तशी कृती आमच्याकडून करून घेतली आहे. त्यांनी आम्हाला ‘समाजात कसे वागले पाहिजे’, याची शिकवणही दिली आहे.
३ आ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : आई-बाबा प्रतिदिन सकाळी ५ वाजता उठून नामजपादी उपाय करतात. ते सारणी लिखाण, देवपूजा, स्वयंसूचना सत्र इत्यादी कृती नियोजनानुसार करतात. ते रुग्णाईत असल्यासही त्यांच्या या दिनक्रमात खंड पडला नाही.

३ इ. प्रेमभाव
१. एकदा मडकई येथील २ साधकांच्या घरी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले होते. त्यांच्या घरी श्री गणेशचतुर्थीच्या कालावधीत खाद्यपदार्थ बनवले नव्हते. आई-बाबांनी बाहेर खाऊची मागणी (आर्डर) देऊन मला (श्री. गिरिजयला) त्या साधकांच्या घरी खाऊ पोचवायला सांगितला.
२. आमच्या घराच्या परिसरात आंब्याची झाडे आहेत. त्या झाडांना आंबे लागल्यावर आई-बाबा ते आंबे साधक, तसेच शेजारी यांनाही देतात. त्या वेळी आई-बाबांनी ‘स्वतःसाठी किती आंबे राहिले आहेत किंवा ‘मुलांना मिळणार का ?’, असा विचार कधीच केला नाही.
३. आमच्या घरी एक बाई ३० वर्षे कामाला होती. तिला कुणी नसल्याने ती आमच्याच घरी रहात होती. आई-बाबांनी तिला घरातीलच एक सदस्य या नात्याने वागवले. ती बाई रुग्णाईत झाल्यावर आईने तिची सेवा केली. आई-बाबांनी त्या रुग्णाईत बाईसाठी स्वखर्चाने सर्व केले. तेव्हा समाजातील लोक म्हणायचे, ‘‘तुम्ही आहात; म्हणून ती बाई आहे. अन्य कुणी तिला घरात ठेवले नसते.’’
३ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव !
३ ई १. ‘प.पू. डॉक्टर सतत समवेत आहेत’, असा भाव असणे : ‘प.पू. डॉक्टर सतत समवेत आहेत’, असा आई-बाबांचा भाव असतो. त्यांनी कधीही प.पू. डॉक्टरांना भेटण्याची किंवा त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली नाही.
३ ई २. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयासाठी घरात जागा उपलब्ध करून देणे : आमच्या घरी दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय असतांना आई-बाबा आणि मी एका खोलीत रहात होतो. तेव्हा मोठे घर असतांना घरातीलच एका खोलीत रहातांना आई-बाबांना कधीही अडचण वाटली नाही. आई-बाबा सांगत, ‘‘हे सर्व प.पू. डॉक्टरांचे आहे.’’ साधकांना पाहून आई-बाबांना पुष्कळ आनंद होत असे.
३ ई ३. आई-बाबा घरातील नारळ किंवा खोबरेल तेल आश्रमात देतात. आई-बाबा नेहमी सांगतात, ‘‘जे आहे, ते सर्व प.पू. डॉक्टरांचे आहे.’’
– सौ. आरती रामचंद्र कामत (मोठी मुलगी), कुंडई, गोवा, सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी (मधली मुलगी), फोंडा, गोवा आणि श्री. गिरिजय प्रभुदेसाई (लहान मुलगा), म्हार्दोळ, गोवा. (१४.४.२०२६)
गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अपरिहार्य असलेली साधना !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !