उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?

आज ‘जागतिक पर्यावरण दिन’ आहे. त्या निमित्ताने...

मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या नीलगिरीने, वर्ष १९७२ मध्ये आयात केलेल्या गव्हासह (मिबलो) भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी आज सहस्रो एकरांवर डेरा जमवून त्यांच्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची भूमी नापिक केली आहे. दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलेल्या गव्हासह तिकडचे पार्थेनियम तण बीच्या स्वरूपात आपल्याकडे आले आणि स्थानिक पर्यावरणात या तणाने हाहाःकार माजवला. आपण त्याला ‘गाजर गवत’ अन् ‘काँग्रेस गवत’ म्हणतो; पण याचे निर्मूलन काही आपल्याला करता आले नाही; कारण हे स्थानिक तण नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीवच इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नांदत नसल्याने त्याची बेसुमार वाढ झाली. अशा प्रकारे विदेशी झाडांची केलेली लागवड आपल्या जीवनचक्रावर परिणाम करत असल्याचे दिसत आहे.

१. विदेशी झाडांमुळे निसर्गसाखळीला खीळ

या झाडांच्या फुलात परागकण नाहीत. त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत. या झाडांच्या मुळांनी भूमीतील पाणी शोषून घेतल्याने पाण्याचे प्रमाण न्यून झाले आहे. या झाडांच्या पानांनी आणि सावलीने आपल्या भूमी निकृष्ट केलेल्या आहेत. विदेशी झाडांच्या फांद्यांचा आणि बुंध्यांचा उपयोग आपल्याला नाही. रातकिडे, वटवाघूळ, चिमणी, घार, गिधाडे, गरुड, घुबड अशा सर्रास दिसणार्‍या पक्षांचा वावर दुर्मिळ झाला आहे. एकंदरीत अशा विदेशी झाडांवर होणार्‍या परागकण प्रक्रियेला आणि पक्ष्यांद्वारे होणार्‍या बीजप्रसाराच्या कामाला खीळ बसत असून कीटक, किडे, पक्षी जोडणारी निसर्गसाखळी / अन्नसाखळी कमकुवत होत आहे.

२. ‘ग्लिरिसिडीया’ या विदेशी झाडाचे दुष्परिणाम

परदेशी झाडाची पाने, फुले, शेंगा आपल्याकडील गाय, बैल, शेळीसुद्धा खात नाहीत. माकडेही परदेशी झाडावर बसत नाहीत, म्हणजे मुक्या प्राण्यांना जे कळते की, परदेशी झाडे घातक आहेत; पण आपल्याला अजून कळलेले नाही, हेच मोठे दुर्दैव ! याचमुळे निसर्गाच्या अन्नसाखळीत एकमेकांवर अवलंबून असलेले अनेक जीव नामशेष होण्याच्या मार्गाकडे ढकलले जात आहेत. प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांवर उपजीविका करणारे माकड, वाघ, हत्ती, बिबटे, गवे हे प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत. ‘ग्लिरिसिडीया’सारख्या झाडाच्या फुलावरून उंदीर वा घुशी गेल्या, तरी ते अपंग होतात किंवा मरतात. या झाडाखालून चालतांना धाप लागते. या झाडापासून विषारी वायू उत्सर्जित केला जातो. त्यामुळे पावसाचे प्रमाण न्यून होते. जवळपास ९० टक्के सरकारी जंगले आणि ‘नर्सरी’ (रोपवाटिका) ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत. वर्ष १९७० च्या दशकात युरोपियन देशांनी जागतिक बँकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली, तेव्हापासून देशात ग्लिरिसिडीया हे झाड आले अन् त्या काळापासून पावसाचे प्रमाण हळूहळू न्यून होत चालले आहे.

३. विदेशी झाडांचे दुष्परिणाम

‘फायकस’ या झाडाच्या पानाचा धूर व्यक्तीने घेतल्यास शरीर सुजते. परदेशी झाडांचे आयुर्वेदाच्या दृष्टीने कोणतेही उपयोग नाहीत. त्यापासून प्राणवायूही मिळत नाही. जिथे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत, तेथे फिरायला जाणार्‍या नागरिकांमध्ये हृदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे संशोधनावरून सिद्ध झालेले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत आणि त्यांना मुद्दाम नीलमोहोर, काशीद, सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभूल करणारी नावे दिलेली आहेत की, त्यामुळे कोणते झाड परदेशी समजायचे, असा वैचारिक कोलाहल निर्माण होतो. यासाठी ज्या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत, ते झाड परदेशी समजावे, हे समजण्यास सोपे आहे.

४. आता देशी झाडेच का लावायची ?

याविषयी असे म्हटले जाते की, पिंपळ, कडुलिंब आणि वड यांपैकी एक वृक्ष अन् चिंचेची १० झाडे किंवा कवठ, बेल, तसेच आवळा यांपैकी कोणत्याही जातीचे ३ वृक्ष अन् आंब्याची ५ झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही. वड आणि औदुंबर या झाडांना देवाचा दर्जा दिला गेला आहे. देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्ट्यात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली अन् त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते. या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, कीडे, कीटक सामावलेले असतात. पक्षी, कीडे आणि कीटक यांनाही अन्न अन् निवारा मिळतो.

देशी झाडांच्या गळलेल्या पानांतून भूमीवर जमणार्‍या पाचोळ्यातून सिद्ध होणार्‍या खतातून भूमीचा कस वाढत असतो. विघटन झालेल्या पालापाचोळ्याच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत असतांनाच खोलवर जाऊन ती भूमीवरच्या मातीला धरून ठेवतात. विविध कीटक, कीडे आणि सरपटणारे जीव यांना अशी उत्तम भूमी उपयुक्त ठरते अन् एक परिपूर्ण पर्यावरण निर्माण करते. प्राणवायू आणि पाऊस यांचे प्रमाण वाढते. ढगांना पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता आपल्या देशी झाडांमध्ये आहे. त्यांचे प्रमाण न्यून झाल्याने अवेळी पाऊस, अधिकचा उन्हाळा, पावसाळा, थंडी यांचे चक्र आपल्याला वेगाने विनाशाकडे घेऊन जात आहे.

देशी झाडांच्या फांद्या या विविध पक्ष्यांचा निवारा बनतात. साधारणपणे ३५० पेक्षा अधिक जातीची झाडे वटवाघळे निसर्गात रोपण करत असतात. यात आंबा, जांभूळ, चिकू, बोर, औदुंबर, वड, नांदरूक, मोहा, सीताफळ, रामफळ, अशी अनेक फळझाडे असून सर्वांत अगोदर फळ पिकते, हे वटवाघळाला समजते. यात पाडाला पिकलेला आंबा प्रारंभीला वटवाघळे खातात आणि मग शेतकरी आंबे उतरवतो अन् मग आडी लावली जाते. मुक्या प्राण्यांना हे कळते, मग माणसाला कधी कळणार ? पांगारा, सावर, सिताफळ, जांभूळ, कोकम, कडुनिंब, करंज, बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस, आवळा, आंबा, कवठ, बेल, कडुनिंब, मोह, पळस ही झाडे न लावता निव्वळ छायाचित्रांसाठी  चुकीचे वृक्षारोपण करणार्‍या लोकांना थांबवणे आवश्यक झाले आहे, अन्यथा हिरवळ दिसेल; मात्र जैवविविधता दिसणार नाही.

– नामदेव कदम, परभणी (१५.५.२०२६)