‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन !

संगीताच्या (वादनाच्या) व्याख्या आणि आध्यात्मिक परिभाषा !

४ सप्टेंबरपासून प्रती गुरुवारी चालू झालेल्या या लेखमालेत आज आपण संगीताच्या अंतर्गत ‘वादन’ या कलेच्या व्याख्या पाहूया.

‘गायन, वादन आणि नृत्य यांच्या एकत्रित आविष्काराला ‘संगीत’, असे म्हणतात. त्यामुळे ‘वादन’ हा संगीतातील अविभाज्य घटक आहे. संगीतोपयोगी नाद निर्माण करणारे साधन वापरून स्वर आणि लय व्यक्त करण्याची प्रक्रिया म्हणजे वाद्यवादन. ‘वाद्यांच्या साहाय्याने सूर, ताल आणि लय यांचा आविष्कार करत विविध रसांची निर्मिती करणे’, यालाही ‘वाद्यवादन’, असे म्हणतात. अशा रितीने वाद्यांच्या माध्यमातून सिद्ध झालेल्या संगीताला ‘वाद्यसंगीत (Instrumental Music)’, असे म्हणतात.

भारतीय संगीतातील विविध वाद्ये, उदा. बासरीचा मधुर नाद, वीणेच्या झंकारणार्‍या तारेमुळे निर्माण झालेले सूर आपल्याला एक वेगळीच अनुभूती देतात. वाद्यांच्या नादामुळे काही प्रसंगी आपण भावस्थितीत जाऊन अंतर्मुखही होतो. भारतीय वाद्यांच्या नादामुळे वादन करणार्‍या, तसेच ऐकणार्‍या व्यक्तींना पंचमहाभूतांच्या स्तरांवरील विविध सूक्ष्म अनुभूतीही घेता येतात. हेच भारतीय वाद्यांच्या नादाचे वैशिष्ट्य आहे.

लेखांक ३

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/955400.html

१. नाद

नाद म्हणजे ब्रह्म किंवा ईश्वर. भारतीय संगीतामध्ये नाद हा केवळ ऐकू येणारा आवाज नसून ती चेतना अथवा कंपन निर्माण करणारी एक ऊर्जा आहे. नादाचे स्वरूप हे स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही स्तरांवर आहे. भारतीय संगीत हे ‘नादब्रह्म’, या तत्त्वावर आधारित आहे. नादाला ‘संगीताचा आत्मा’, असेही म्हटले आहे. सर्वसाधारणपणे संगीतोपयोगी ध्वनीला ‘नाद’, असे संबोधले जाते. नादाचे दोन प्रकार आहेत – आहत नाद आणि अनाहत नाद.

या लेखातील काही संज्ञांचे अर्थ

१. स्वरांची पट्टी : सप्तकातील असा स्वर ज्याला ‘षड्ज’(सा) मानून पुढील स्वर गायले अथवा वाजवले जातात, त्या ‘सा’ या स्वराला ‘स्वरांची पट्टी’, असे म्हणतात.
२. सप्तक : सा, रे, ग, म, प, ध, नी या सात स्वरांच्या समुहास ‘सप्तक’, असे म्हणतात.
३. मात्रा : तालाच्या प्रत्येक भागास ‘मात्रा’, असे म्हणतात.
४. लय : दोन मात्रांमधील सारखे धावते अंतर.
५. ताल : नियमबद्ध मात्रांचा समूह.

१ अ. आहत नाद : आघात अथवा घर्षण यांमुळे निर्माण होणारा आणि आपल्या कानांना ऐकू येणारा नाद, उदा. गायन, वादन.

१ आ. अनाहत नाद : आघात अथवा घर्षण यांविना निर्माण होणारा आणि कानांना ऐकू न येणारा अतिशय सूक्ष्म नाद. हा सूक्ष्म नाद योगीजन, म्हणजेच उच्च आध्यात्मिक अवस्थेतील संत त्यांच्या अंतरात अनुभवतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायु या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.

२. वाद्य

२ अ. व्याख्या : जे उपकरण वाजवल्यावर त्यातून संगीतोपयोगी नाद निर्माण होतो, त्याला ‘वाद्य’, असे म्हणतात.

२ आ. व्युत्पत्ती: ‘संस्कृतमधील ‘वद’ या धातूला ‘यत्’ हा प्रत्यय जोडल्यास ‘वाद्य’ हा शब्द सिद्ध होतो. त्याचा अर्थ वाजवण्यास योग्य असे यंत्र असते. आपण जर एकाग्रतेने वादन ऐकले, तर आपल्याला त्यातील स्वर आणि त्यातून उत्पन्न झालेले बोल (शब्द) ऐकू येऊ शकतात.’ (साभार : ग्रंथ – ‘पखवाज की उत्पत्ति, विकास एवं वादन शैलियां’, डॉ. अजय कुमार, पृष्ठ क्र. ५९)

२ इ. वाद्यांचे प्रकार : नाट्यशास्त्रात भरतमुनींनी वाद्यांचे मुख्य ४ प्रकार सांगितले आहेत.

ततं चैवावनद्धं च घनं सुषिरमेव च ।
चतुर्विधं तु विज्ञेयमातोद्यं लक्षणान्वितम् ।। – नाट्यशास्त्र, अध्याय २८, श्लोक १

अर्थ : ‘तत् (तारयुक्त वाद्य), अवनद्ध (ढोल इत्यादी वाद्य), घन (घनिष्ठ वाद्य) आणि सुषिर (श्वासाने वाजवले जाणारे वाद्य)’, असे ४ प्रकार मानले जातात.

‘या प्रकारांनुसार वाद्यांचे वर्गीकरण समजावे’, असे या श्लोकात सांगितले आहे.

२ इ १. तत्वाद्य (तंतूवाद्य) : या वाद्यांमध्ये तारांवरील आघात अथवा घर्षण यांमुळे स्वर निर्माण होतात. या वाद्यांमध्ये तारेची लांबी आणि ताण यांवर स्वरांची पट्टी ठरलेली असून ती थोड्याफार प्रमाणात न्यून अथवा अधिक करता येऊ शकते, उदा. सतार, संतूर, वीणा, एकतारी.

२ इ २. अवनद्ध (चर्मवाद्य) : या वाद्यांमध्ये ताणलेल्या चामड्यावर आघात करून आवाज निर्माण होतो. संगीतात या वाद्यांचा उपयोग लय आणि ताल देण्यासाठी केला जातो, उदा. तबला, ढोल, मृदंग, डफ, डमरू.

२ इ ३. घनवाद्य : या वाद्यांमध्ये घन पदार्थावर आघात करून नाद निर्माण होतो. यात लाकूड, धातू किंवा दगड यांचा उपयोग केला जातो. लय दाखवण्यासाठीही यांचा उपयोग होतो, उदा. टाळ, झांज, चिपळ्या, जलतरंग.

२ इ ४. सुषिरवाद्य : या वाद्यांमध्ये हवेच्या साहाय्याने स्वर निर्माण केले जातात. यांत बरीच वाद्ये तोंडाने हवा फुंकून वाजवली जातात. अशा प्रकारे हवेच्या साहाय्याने वाजवल्या जाणार्‍या वाद्यांना ‘सुषिरवाद्ये’, असे म्हणतात, उदा. बासरी, सनई, शंख, तुतारी इत्यादी.

प्रसिद्ध वादक-कलाकारांचे संगीत-साधनेविषयी अनमोल विचार

अ. ‘पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार आदी सर्वांपासून दूर जाऊन पूर्णपणे परमेश्वर प्राप्तीसाठी संगीत केले, तरच त्यातून आत्मिक समाधान, आनंद आणि परमेश्वरप्राप्ती होऊ शकेल; अन्यथा काहीही होऊ शकणार नाही.’

– पू. पंडित केशव गिंडे, बासरीवादक, पुणे.

आ. ‘संगीताला भाव जोडल्यावर संगीतातील स्वरांमुळे चारही बाजूला भगवंत दिसू लागतो.’

– पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया, बासरीवादक, मुंबई.

३. वादनाच्या माध्यमातून ईश्वराशी अनुसंधान कसे साधले जाते ?

श्री. मनोज सहस्रबुद्धे

वाद्यसंगीताचा नाद हा केवळ कानांना आनंद देणारा नसून तो आपल्या अंतरंगाशी थेट संवाद साधणारा असतो. भारतीय वाद्यांचा नाद हा आरंभी साधकांचे मन एकाग्र करण्यासाठी बाह्य आधार असतो; परंतु हा नाद पुढे ईश्वरी अनुसंधान लवकर साधण्यासाठी उपयुक्त ठरतो. भारतातील प्राचीन नादयोग परंपरेत बासरी, वीणा, मृदंग यांसारख्या सात्त्विक वाद्यांच्या नादाच्या माध्यमातून अनुसंधान साधून ध्यान-धारणा इत्यादी उपासना करणारे अनेक योगी होऊन गेले अन् आजही आहेत.

३ अ. ग्रंथात सांगितलेले नादोपासनेचे महत्त्व : शार्ङ्गदेवरचित ‘संगीतरत्नाकर’ या ग्रंथात लिहिले आहे,

नादोपासनया देवा ब्रह्मविष्णुमहेश्वरा: ।
भवन्त्युपासिता नूनं यस्मादेते तदात्मकाः ।। – संगीतरत्नाकर, अध्याय १, प्रकारण ३, श्लोक २

अर्थ : ज्याच्या उपासनेद्वारे ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तिन्ही देवतांचे पूजन होते (त्यांची आराधना होते), त्या नादब्रह्माची मी उपासना करतो; कारण हे तिन्ही देव ‘तदात्मक’, म्हणजेच ‘नादात्मक’ आहेत.

वरील श्लोकातून आपल्याला ‘नादोपासनेतून ईश्वराची आराधना कशी होते ?’, हे लक्षात येते.

३ आ. आध्यात्मिक परिभाषेतून वादनकला ! : नादानुसंधान हे साधकाच्या साधनेसाठी उपयुक्त आहे. ‘आध्यात्मिक साधनेच्या अनुषंगाने वादनकलेकडे पहाण्याचा साधकाचा दृष्टीकोन कसा असावा ?’, हे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांना ज्ञानातून प्राप्त झालेल्या पुढील परिभाषांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल.

१. ‘वाद्यातून निर्माण होणारा नाद हा मंत्र आहे, जो ईश्वरी अनुसंधान साधून देतो.

२. वाद्याचा नाद हा केवळ ध्वनी नसून ते एक स्पंदन आहे, जे शरीर, मन आणि आत्मा यांना स्पर्श करते.

३. वाद्यांचा नाद हे केवळ संगीत नसून तो एक आध्यात्मिक दुवा आहे, जो साधकाला बाह्य जगातून अंतर्मनाशी आणि तेथून परमात्म्याशी जोडतो.

४. कुठल्याही विषयाचे ज्ञान प्रथम मन आणि बुद्धी यांना होते. त्यानंतर ते अंतर्मनापर्यंत पोचते. वाद्यांतून उत्पन्न होणारा नाद हा थेट अंतर्मनापर्यंत पोचतो. त्यामुळे अध्यात्मात नादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

४. सारांश

वरील आध्यात्मिक परिभाषांचा अभ्यास केल्यास लक्षात येते की, वादनकलेकडे साधना म्हणून पाहिल्यास कलाकाराला वाद्यांच्या नादाच्या माध्यमातून ईश्वरी अनुसंधान निश्चितच साधता येईल.’

(पुढील भागात आपण नृत्याच्या परिभाषा पहाणार आहोत.)

संग्राहक : श्री मनोज सहस्रबुद्धे, वाद्य अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय गोवा (१५.९.२५)

साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ४.९.२०२५ पासून प्रत्येक गुरुवारी ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधनेचे प्रास्ताविक विवेचन !’ ही लेखमाला चालू झाली आहे. या लेखमालेमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘कलांकडे साधनेच्या दृष्टीने कसे पहावे ?’ या अनुषंगाने दिलेल्या दिशेप्रमाणे मार्गदर्शनपर लेख असणार आहेत. आपल्या संपर्कातील कलाप्रेमी, कलाकार आणि कलेतील जिज्ञासू यांच्यापर्यंत हे लेख पोचवण्याचा प्रयत्न करावा.

या लेखांविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

– संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

संपर्कासाठी पत्ता :

श्री. अभिजीत सावंत संपर्क क्रमांक : ८७९३६७८१७८
ईमेल : [email protected]

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/960415.html

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक