‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’, याचे प्रास्ताविक विवेचन ! 

लेखांक २

संगीताच्या व्याख्या आणि आध्यात्मिक परिभाषा !

४ सप्टेंबर या दिवसापासून प्रति गुरुवारी चालू झालेल्या या लेखमालेतील पुढील काही भागांत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य म्हणजे नेमके काय ?’, हे पहाणार आहोत. आधी संगीत (गायन) या कलेच्या व्याख्या पाहूया.

कला म्हणजे मानवाच्या अंतर्मनातील विचार, भावना आणि अनुभव यांचे संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य, शिल्प, चित्र इत्यादी विविध माध्यमांतून झालेले सर्जनशील, सौंदर्यमय अन् अभिव्यक्त रूप.

मनुष्याचे जीवन हे संगीतमय आहे. संगीत भावत नसेल, असा कुणी विरळाच असेल. लहान बालकाचे रडणे शांत होऊन ते झोपण्यासाठी अंगाईगीत गाण्यापासून मनुष्याच्या जीवनात संगीताचा प्रवास चालू होतो. त्यानंतरच्या मानवाच्या जीवनप्रवासात प्रत्येक मंगलप्रसंगी संगीत हा अविभाज्य घटक झालेला आढळतो.

संगीत ही कला मानवी जीवनातील सर्वांत प्राचीन आणि पवित्र अशा कलांपैकी एक आहे. ती केवळ श्रवणानंद देणारी नसून भावविश्वात नेणारी, मनाला स्थिर करणारी आणि अध्यात्माकडे नेणारी साधना आहे. संगीत ही मनुष्याला आनंद आणि आत्मिक शांती देणारी कला आहे. भगवंताने मनुष्याला ‘भाव’ व्यक्त करण्याचे कलात्मक स्वरूपात दिलेले माध्यम म्हणजे संगीत ! स्वर, लय, ताल, भाव आणि नाद यांच्या कलात्मक मीलनातून संगीत ही कला साकारली जाते. ‘श्रुतीप्रधान संगीत’ हे भारतीय संगीताचे एक वैशिष्ट्य आहे.

भारतीय संगीत हे ‘श्रुती’ (श्रुती म्हणजे नादाचा सूक्ष्मतम आविष्कार होय.) आणि ‘स्वर’ (संगीतपयोगी नादाला ‘स्वर’, असे म्हणतात.) यांच्या आधारावर उभे आहे. ‘स्वर’ हा संगीताचा प्राण आहे.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/952823.html

१. ‘गायन’ या शब्दाचे समानार्थी शब्द

स्वरगायन, रागगायन, गान, गीत.

२. ग्रंथांत दिलेल्या संगीताच्या व्याख्या

श्री. राम होनप

अ. गीतं वाद्यं तथा नृत्यं त्रयं सङ्गीतमुच्यते । – संगीत रत्नाकर, अध्याय १, प्रकरण १, श्लोक २१

अर्थ : गायन, वादन आणि नृत्य यांच्या एकत्रित आविष्काराला ‘संगीत’, असे म्हणतात.

आ. भरतमुनींनी नाट्यशास्त्रात म्हटले आहे,

गान्धर्वमिति तज्ज्ञेयं स्वरतालपदात्मकम् । – नाट्यशास्त्र, अध्याय २८, श्लोक ८

अर्थ : ‘जे स्वर, ताल आणि शब्द यांनी बनलेले आहे, ते गांधर्व (शास्त्रीय संगीत) होय’, असे जाणावे.

३. पद्मपुराणात साक्षात् भगवान श्रीविष्णूने सांगितलेले गायनाचे महत्त्व !

वरील व्याख्या संगीताविषयीच्या ग्रंथांत दिल्या आहेत. साक्षात् भगवान श्रीविष्णूनेही पद्मपुराणात भक्तांनी केलेल्या गायनाचे महत्त्व वर्णिले आहे.

नाहं वसामि वैकुण्ठे योगीनां हृदये न च ।
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ।।

अर्थ : हे नारदा, मी वैकुुंठामध्ये वसत (रहात) नाही आणि योगीजनांच्या हृदयामध्येही वसत (रहात) नाही; परंतु जेथे माझे भक्त गायन करतात (भजन आणि कीर्तन यांच्या माध्यमातून माझे नाम घेतात), तेथे मी रहातो.

भगवंताच्या वरील वचनातून ‘संगीत ही केवळ एक कला नाही, तर जिवाचा परमेश्वराशी होणारा पवित्र संवाद आहे’, हे लक्षात येते. संगीतातील प्रत्येक स्वर, लय आणि नाद यांमध्ये एक आध्यात्मिक अनुभूती लपलेली आहे. भारतीय संस्कृतीत संगीताला ‘नादब्रह्म’ म्हटले जाते.

४. आध्यात्मिक परिभाषेतून गायनकला !

संगीत आणि गायन यांविषयीच्या वरील व्याख्या सर्वांना परिचित आहेतच. ‘गायनकलेकडे साधना म्हणून कसे पहावे ? गायन आपल्याला मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील अनुभव कशा प्रकारे देऊ शकते ?’, हे सांगणार्‍या संगीत (गायन) अन् अध्यात्म यांना जोडणार्‍या काही परिभाषा पुढे दिल्या आहेत. या परिभाषा सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांना सूक्ष्म ज्ञानातून प्राप्त झाल्या आहेत.

अ. ‘शृंगार, प्रेम, सुख, दुःख, भाव आणि भावना व्यक्त करण्यासाठी ईश्वराकडून मनुष्याला प्राप्त झालेले नैसर्गिक माध्यम, म्हणजे गायन.

आ. स्थूल शब्दांतून सूक्ष्म भगवंत अनुभवण्याची प्रक्रिया, म्हणजे गायन.

इ. साधकाने भगवंताला केलेली आत्मनिवेदनरूपी प्रार्थना, म्हणजे गायन.

ई. गायनातील स्वर हा भक्ताला भगवंतापर्यंत पोचवण्याचा एक ‘पूल’ आहे.

उ. हृदयकमलावर विराजमान भगवंताची साधकाने शब्दरूपांनी केलेली पूजा, म्हणजे गायन.

ऊ. साधकाला अल्पावधीत भगवंताची भेट घडवून आणते, ते गायन.

ए. साधकाने भगवंतासाठी केलेला शब्दरूपी पुष्पांचा हार, म्हणजे गायन.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

५. विदेशी साहित्यिक आणि कलाकार यांनी सांगितलेले संगीताचे आध्यात्मिक महत्त्व

सौ. भक्ती कुलकर्णी

संगीतातील अध्यात्म हे केवळ भारतीय कलाकार किंवा संतपुरुष यांनीच जाणले आहे, असे नाही, तर काही विदेशी साहित्यिक आणि कलाकार यांनीही ‘संगीत हे ईश्वरप्राप्तीसाठीचे श्रेष्ठ माध्यम आहे’, असे सांगितले आहे.

अ. संगीत के पीछे-पीछे खुदा चलता है । (संगीताच्या ठिकाणी ईश्वराचे अस्तित्व असते.) – शेख सादी, पर्शियन साहित्य परंपरेतील महान कवी

(साभार : मासिक ‘भक्ती संगीत अंक’, जानेवारी १९७०)

आ. संगीत परमात्मा की प्राप्ति के लिए मानव का सर्वाेच्च साधन है । (मानवासाठी परमात्म्याच्या प्राप्तीसाठी संगीत हे सर्वाेच्च माध्यम आहे.) – यहुदी मेन्युहिन, ब्रिटीश-अमेरिकन संगीतकार

(साभार : मासिक ‘भक्ती संगीत अंक’, जानेवारी १९७०)

६. सारांश

वरील परिभाषांप्रमाणे संगीत-उपासकाने गायनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन ठेवला, तर गायनातून त्याला साक्षात् भगवंतच अनुभवता येईल.’

(लेखमालेच्या पुढील भागात आपण वादनाच्या व्याख्या पहाणार आहोत.)

संग्राहक : सौ. भक्ती कुलकर्णी, संगीत अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.८.२०२५)

साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ४.९.२०२५ पासून प्रत्येक गुरुवारी ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य या कलांतून ईश्वरप्राप्तीसाठी साधनेचे प्रास्ताविक विवेचन !’ ही लेखमाला चालू झाली आहे. या लेखमालेमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘कलांकडे साधनेच्या दृष्टीने कसे पहावे ?’ या अनुषंगाने दिलेल्या दिशेप्रमाणे मार्गदर्शनपर लेख असणार आहेत. आपल्या संपर्कातील कलाप्रेमी, कलाकार आणि कलेतील जिज्ञासू यांच्यापर्यंत हे लेख पोचवण्याचा प्रयत्न करावा.

या लेखांविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

– संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

संपर्कासाठी पत्ता

श्री. अभिजीत सावंत

संपर्क क्रमांक : ८७९३६७८१७८

ईमेल : [email protected]

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘ज्या कलेतून देवाची स्पंदने तुमच्याकडे येतात, देव तुमच्याकडे येतो, तीच ‘खरी कला’ आहे.’
– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/957862.html