Congress Saffron Terror : भगव्या आतंकवादाचे काँग्रेसी कथानक उद्ध्वस्त !

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील सातही आरोपींची १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता !

मुंबई, ३१ जुलै (वार्ता.) – मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एन्.आय्.ए. न्यायालयाने मालेगाव बाँबस्फोटातील सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निकालामुळे या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना नाहक गोवून ‘भगवा आतंकवादा’चा बागुलबुवा निर्माण करणार्‍या काँग्रेसच्या षड्यंत्राचा भांडाफोड झाला आहे. हिंदुत्वनिष्ठांना गुन्हेगार ठरवण्यासाठी अन्वेषण यंत्रणांनी खोटे पुरावे सादर केले. साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), शंकराचार्य स्वामी अमृतानंद देवतीर्थ, अजय राहीरकर, समीर कुळकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी हे ७ जण निर्दोषमुक्त झाले. विलंबाने का होईना; परंतु निर्दोषत्व सिद्ध झाल्यामुळे सर्व आरोपींनी समाधान व्यक्त केले.

सर्व ७ हिंदुत्‍वनिष्ठ आरोपी निर्दोष मुक्त !

न्यायालयाच्या निकालातील महत्त्वाची सूत्रे !

१. सुधाकर चतुर्वेदी यांच्या घरामध्ये ‘आर्.डी.एक्स’ ठेवून त्यांना गोवण्याचे षड्यंत्र रचण्यात आले.

२. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी काश्मीरमधून आर्.डी.एक्स. आणले, याविषयी कोणताही पुरावा अन्वेषण यंत्रणांना सादर करता आला नाही.

३. बाँबस्फोटाच्या ठिकाणी वापरण्यात आलेली दुचाकी साध्वी प्रज्ञासिंह यांची असल्याचा कोणताही पुरावा अन्वेषण यंत्रणांना सादर करता आलेला नाही. केवळ गाडीचा क्रमांक तो असून चालत नाही, तर दुचाकीचा चासी (इंजिनचा भाग) क्रमांक आढळून आलेला नाही.

४. बाँबस्फोट घडवण्यासाठी रेकी (कट-कारस्थानासाठी केलेली पहाणी) करण्यात आली किंवा आरोपींनी बैठका घेतल्याचाही पुरावा नाही.

५. सर्व आरोपींवर लावण्यात आलेला ‘अनलॉफूल अ‍ॅक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन अ‍ॅक्ट’ (बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा) अर्थात् ‘युएपीए’ कायदा चुकीचा आहे.

६. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी ‘अभिनव भारत’ संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरली, याचा कोणताही पुरावा नाही.

७. अन्वेषण यंत्रणेने पंचनामा व्यवस्थित केला नाही. केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा दिली जाऊ शकत नाही.



‘मिडिया ट्रायल’द्वारे काँग्रेसने केला भगव्या आतंकवादाचा ‘फेक नॅरेटिव्ह’ !

मालेगाव बाँबस्फोटानंतर पुढील काही वर्षे राहुल गांधी, पी. चिदंबरम्, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार यांसह काँग्रेस आघाडीतील अनेक नेत्यांनी ‘भगवा आतंकवाद’ असा जाणीवपूर्वक उल्लेख केला. न्यायालयाने निर्णय देण्यापूर्वीच, तसेच अन्वेषण यंत्रणांनीही कोणताही सबळ पुरावा नसतांना माध्यमांनी मालेगाव खटल्यातील आरोपींच्या विरोधात खोट्या कथा रचल्या.

असा लागला निकाल !

मुंबई सत्र न्यायालयाच्या ‘एन्.आय्.ए.’च्या विशेष न्यायालयामध्ये सकाळी ११ वाजता सुनावणीला प्रारंभ झाला. या वेळी सर्व सातही आरोपी न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाची खोली आणि बाहेरील गॅलरी अधिवक्ते, पत्रकार आणि पोलीस यांनी भरली होती. साध्वी प्रज्ञासिंह यांना वेगळे आणि अन्य ६ पुरुष आरोपी यांना वेगळे बसवले होते. न्यायाधीश ए.के. कोलाटी यांनी ३० मिनिटे निकालाचे वाचन केले. ‘निकाल नेमका काय लागणार ?’, याच्या उत्सुकतेने न्यायालयात गंभीर शांतता होती.

न्यायाधिशांनी आरोपींना निर्दोष घोषित केल्यानंतर न्यायालयात उत्साहाचे वातावरण पसरले. आरोपींचे अधिवक्ता जयप्रकाश मिश्रा, तसेच साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), श्री. समीर कुळकर्णी यांनी निकालानंतर त्यांची भावना न्यायाधिशांपुढे व्यक्त केली.

काँग्रेसने क्षमा मागावी ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिंदुत्वनिष्ठांना अडकवणार्‍या काँग्रेसने क्षमा मागायला हवी. भगवा आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न फसला. भगव्या आतंकवादाचे कथानक अयशस्वी झाले.

तत्कालीन सरकारकडून पोलीस यंत्रणांवर दबाव आणण्यात आला. ‘इस्लामी आतंकवाद उघड केला जात असतांना त्याला उत्तर म्हणून भगवा आतंकवाद आणायचा’, असा काँग्रेस सरकारचा डाव होता. मतपेढीसाठी हिंदु आतंकवादाचे राजकारण करण्यात आले

आजच्या निकालामुळे भगवा आतंकवाद म्हणणार्‍यांना सणसणीत चपराक ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे

मी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करतो. उशिरा का होईना; पण न्याय मिळाला. आतंकवादाला कोणताही रंग नसतो; पण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या काळात आणि मालेगाव बाँबस्फोट प्रकरणानंतर त्याला रंग देण्यात आला. याचे राजकारण केले गेले.

आजच्या निकालामुळे भगवा आतंकवाद म्हणणार्‍यांना सणसणीत चपराक मिळाली आहे. आजच्या निकालातून सिद्ध झाले की, हिंदू कधीही देशविघातक कारवाया करत नाहीत. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्‍वास आहे.

काय आहे मालेगाव बाँबस्फोट प्रकरण ?

२९ सप्टेंबर २००८ या दिवशी मालेगाव येथील एका मशिदीजवळ बाँबस्फोट झाला. या प्रकरणात आतंकवादविरोधी पथकाने १२ जणांना अटक केली होती. वर्ष २०११ मध्ये हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे वर्ग झाले. यंत्रणेने या प्रकरणी आणखी २ जणांना पकडले. अशा प्रकारे मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात एकूण १४ आरोपींना अटक झाली. साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), सुधाकर चतुर्वेदी, समीर कुळकर्णी , अजय राहिरकर, राकेश धावडे, शिवनारायण कलासंग्रा, जगदीश म्हात्रे, शंकराचार्य स्वामी अमृतानंद देवतीर्थ, श्याम साहू, प्रवीण तकलकी, लोकेश शर्मा यांना अटक झाली. रामजी कलासंग्रा आणि संदीप डांगे यांना फरार घोषित करण्यात आले. अटकेतील १४ आरोपींपैकी राकेश धावडे, शिवनारायण कलासंग्रा, जगदीश म्हात्रे, शंकराचार्य स्वामी अमृतानंद देवतीर्थ, श्याम साहू, प्रवीण तकलकी, लोकेश शर्मा यांच्या विरोधात प्रथमदर्शी पुरावा नसल्यामुळे आरोपींची वर्ष २०१७ मध्ये सुटका करण्यात आली. त्यानंतर अन्य आरोपींचीही सशर्त जामिनावर सुटका झाली. हा खटला ५ विशेष न्यायालयांमध्ये १७ वर्षे चालला.


काँग्रेसच्या षड्यंत्रामुळे निष्पाप हिंदुत्वनिष्ठांची धुळीस मिळालेली प्रतिष्ठा त्यांना पुन्हा कोण मिळवून देणार ?

वाचा → विशेष संपादकीय : …अंततः कलंक पुसला ! 

संपादकीय भूमिका 

  • भगवा आतंकवाद निर्माण करण्याच्या अट्टाहासापायी हिंदुत्वनिष्ठांचा अनन्वित छळ करणारे काँग्रेसचे तत्कालीन नेते आणि पोलीस यांच्यावरही कारवाई करणे आवश्यक आहे !
  • १७ वर्षांनंतर मिळालेला न्याय, हा अन्याय नव्हे का ?