छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे मंदिर-न्यास मराठवाडा विभागीय अधिवेशन !

छत्रपती संभाजीनगर – धर्मासाठी सर्वांना संघटित झाल्यास अधर्म संपतो, हे आर्य चाणक्यांनी धनानंदाला संपवून दाखवून दिले. धर्म टिकला तरच आपण टिकणार आहोत. देव, देश, मंदिर आणि धर्म यांवर होणार्या आघातांविषयी हिंदूंनी जागृत व्हावे. सर्व मंदिर विश्वस्त संघटित झाल्यास मंदिरांवरील आघात थांबतील. वेळीच जागे व्हा, अन्यथा ही जागा सोडून जावे लागेल, असे प्रतिपादन श्री १००८ महामंडलेश्वर योगेशानंद गिरीजी महाराज यांनी केले. ते अधिवेशनाच्या प्रथम सत्रात बोलत होते.
श्री काशी विश्वनाथ बाबा संस्थान, दत्त मंदिर, बीड बायपास, श्री पावन गणेश मंदिर, दिवाण, देवडी, सोमठाणा येथील श्री रेणुकामाता मंदिर, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र मंदिर न्यास मराठवाडा विभागीय अधिवेशन पार पडले. श्री काशी विश्वनाथ बाबा संस्थान, दत्त मंदिर, बीड बायपास येथे २० जुलै या दिवशी पार पडलेल्या अधिवेशनाचा शुभारंभ सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री १००८ महामंडलेश्वर योगेशानंद गिरीजी महाराज, पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज, माजी साहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, हिंदु जनजागृतीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री. प्रल्हाद शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. त्यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन श्री. रामेश्वर भुकन यांनी केले. उपस्थितांचे स्वागत सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री. प्रल्हाद शिंदे यांनी केले, तर अधिवेशनाची प्रस्तावना हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर यांनी मांडली. सूत्रसंचालन कु. श्रुती शिरसाठ यांनी, तर सौ. रोहिणी जोशी यांनी आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.
या अधिवेशनाला परभणी, नांदेड, जालना, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील विविध मंदिरांचे १८० हून अधिक विश्वस्त, प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी निवृत्त साहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख यांनी न्यास नोंदणी, तसेच मंदिरांच्या अडचणीसंदर्भात, तर सनातनचे अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी यांनी तुळजाभवानी देवस्थानातील भ्रष्टाचाराविषयी दिलेल्या कायदेशीर लढ्याविषयी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात मंदिर विश्वस्तांना मंदिरांच्या भूमीविषयी येणार्या अडचणी याविषयी परिसंवाद आयोजित करण्यात आला. समारोपीय सत्रात मंदिर महासंघाच्या कार्याची पुढील दिशा कशी असावी ? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. समारोपीय सत्रात महंत नारायण नंदगिरी महाराज, श्री. श्यामकुमार जैस्वाल, श्री. प्रमोद नरवाडे, कु. प्रतीक्षा कोरगावकर, कु. प्रियंका लोणे यांनी उपस्थितांना संबोधित केले. शेवटी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मंदिरे धर्मशिक्षणाची केंद्रे बनायला हवीत ! – सद्गुरु नंदकुमार जाधव
मंदिरांमधून धर्मशिक्षण दिले, तर त्यांची श्रद्धा वाढून सशक्त राष्ट्रभक्ती असणारी पिढी निर्माण होईल आणि ती राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देईल. मंदिरांतून संस्कारवर्ग घेणे, धर्मशास्त्र समजावून सांगणे, हे कार्य नियमित व्हायला हवे. हिंदु समाजाची जन्महिंदु ते कर्महिंदु पर्यंत वाटचाल होण्यासाठी मंदिर अधिवेशन हे प्रभावी माध्यम आहे; म्हणून मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे बनायला हवीत.
मंदिरांमध्ये चालू असलेल्या पाश्चात्त्य कुप्रथा थांबवा ! – सुनील घनवट,राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ
अनेक मंदिरांतील मूर्तींना नाताळच्या काळात सांताक्लॉजचा वेष परिधान केला जातो. केक कापून देवाचा वाढदिवस साजरा करणे, मंदिरात दान दिलेल्या वस्तूंचा अयोग्य वापर, काही ठिकाणी देवस्थानांच्या गायी कसायांना विकणे यांसारख्या कुप्रथा घडत आहेत, तसेच वैयक्तिक मानापमानामुळे अनेक मंदिरांकडे दुर्लक्ष करणे, यांमुळे मंदिर संस्कृती आणि मंदिरे बदनाम होत आहेत, यावर उपाय म्हणजे मंदिर विश्वस्तांनी मंदिर संस्कृती, परंपरा प्रथा यांचे पालन हिंदु संस्कृतीनुसार करावे.

| महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून आजपर्यंत ३० हून अधिक ठिकाणी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद / अधिवेशन घेण्यात आले. १ सहस्र २०० हून अधिक मंदिरांत वस्रसंहिता लागू झाली. ९१ ठिकाणच्या मंदिरांतून सामूहिक आरती चालू झाली, तसेच मंदिर परिसर मद्य आणि मांस मुक्त करण्याविषयी अनेक ठिकाणी निवेदने देण्यात आली. (वस्रसंहिता म्हणजे मंदिरात परिधान करायच्या कपड्यांचे नियम) |
| मंदिर विश्वस्तांनी संघटित होऊन मंदिरे सरकारी जोखडातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत ! |
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !