
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ दिवसांचा बिहार राज्याचा दौरा केला. या वेळी त्यांनी पाटलीपुत्र येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात भाजपच्या लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करतांना ‘भाजपमध्ये वतनदारीप्रमाणे घराणेशाहीनुसार उमेदवारी दिली जाणार नाही’, असे स्पष्ट सांगितले. राजकारणातील घराणेशाहीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली भूमिका अत्यंत मौलिक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय राजकारणाचा मागोवा घेतल्यास घराणेशाहीने जितकी सामाजिक आणि राष्ट्रीय हानी केली आहे, ती पहाता आतापर्यंत घराणेशाहीला लोकांनीच लाथ मारायला हवी होती; मात्र याकडे आतापर्यंत तेवढ्या गंभीरपणे पाहिले गेले नाही. देशातील बहुतांश राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही आहे. त्यामुळे आतापर्यंत याविषयी उघडपणे बोलण्याचे धारिष्ट्य कुणी केले नव्हते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर घराणेशाहीचा धोका ओळखून त्यावर प्रहार करण्याचे त्यांनी दाखवलेले धारिष्ट्य निश्चितच कौतुकास्पद आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस आदी देशभरातील छोटे-मोठे बहुतांश राजकीय पक्ष अल्प-अधिक प्रमाणात घराणेशाही जोपासत आहेत. सद्य:स्थितीत घराणेशाही केवळ राजकीय पक्षांच्याच नव्हे, तर राष्ट्राच्या गळ्यातील लोढणे झाली आहे. तिचे वेळीच उच्चाटन करणे, यातच लोकशाहीचे आणि राष्ट्राचे हित आहे.
कौटुंबिक पदे घेऊन समाजहिताच्या गप्पा !
एरव्ही जे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष समाजहिताच्या गप्पा मारतात, तेच नेते निवडणुका आल्यावर पक्षातील समाजाच्या हितासाठी झटणारे कर्तबगार कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांना उमेदवारी देण्याऐवजी स्वत:च्या कुटुंबातच सत्ता रहावी, यासाठी प्रयत्न करतात आणि वर याला ‘लोकशाही’ असे गोंडस नाव देतात. ही स्वार्थी परंपरा स्वत:च्या पाल्यांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तर पत्नी, नातवंडे, पतवंडे, भाऊ आणि हे झाल्यावर पुतण्या, सून यांच्यासाठी आमदारकी, खासदारकी पदरात पाडण्यासाठी प्रयत्न होतात. हे झाले नाही, तर महामंडळे, स्वायत्त संस्था यांची अध्यक्षपदे मिळवण्यासाठी आटापिटा केला जातो. देशातील मागील काही वर्षांतील राजकारण पाहिले, तर याची भयावहता दिसून येईल. वर्ष १९९७ मध्ये ९४० कोटी रुपयांच्या चारा घोटाळ्याप्रकरणी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. या प्रकरणात कारागृहात जाण्याची वेळ आल्यावर त्यांनी मुख्यमंत्रीपद पक्षातील पात्र नेत्याकडे देण्याऐवजी स्वत:च्या अल्पशिक्षित पत्नीची त्यासाठी निवड केली. महाराष्ट्रात ४ वेळा मुख्यमंत्री झालेल्या आणि देशाचे संरक्षणमंत्री म्हणून दायित्व पाहिलेले शरद पवार यांनी स्वत: अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मुलगी सुप्रिया सुळे यांना खासदार केले. पुतण्या अजित पवार यांना आमदार आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री केले. नातू रोहित पवार यांना आमदार केले. एवढे थोडे म्हणून की काय विविध सहकारी, शिक्षण, उद्योग, सामाजिक अशा शेकडो संस्थांवर पवार कुटुंबीय चिकटून आहेत. त्यांच्या पक्षाचे नेते आणि सध्या अजित पवार गटात असलेले खासदार सुनील तटकरे यांना पक्षाने राज्यात मंत्री केले. त्यानंतर खासदारकी दिली. त्यांचे भाऊ अनिल तटकरे यांना आमदार केले. मुलगा अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेचे आमदार केले. मुलगी आदिती तटकरे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि त्यानंतर पहिल्याच आमदारकीच्या कार्यकाळात मंत्री केले. अशा प्रकारची घराणेशाही भाजपमध्ये मुंडे, खडसे या घराण्यांमध्ये, शिवसेनेत ठाकरे घराण्यामध्येही पहायला मिळते. काँग्रेस हा पक्ष तर घराणेशाहीने ग्रासला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या पुढच्या २ पिढ्या सत्तेत आहेत. घराणेशाहीमुळेच काँग्रेस पक्षावर नामशेष होण्याची वेळ तर आलीच; त्यापेक्षाही काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे देशाची जी अपरिमित हानी झाली, त्याची तर गणतीच होऊ शकत नाही.
काँग्रेसची दुर्दशा घराणेशाहीमुळेच !

एकेकाळी संपूर्ण देशाची धुरा सांभाळणार्या काँग्रेस पक्षाचा मोहनदास गांधी आणि पंडित नेहरू यांनी अगदी खुळखुळा केला. गांधी घराण्यातील नेत्यांनी आदेश द्यावा आणि चमचेगिरी करणार्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी ‘हो’ म्हणावे, अशी या पक्षाची गत झाली. लोकमान्य टिळक यांच्यासारख्या कर्तबगार, कर्तव्यपरायण, प्रखर राष्ट आणि धर्म निष्ठ नेत्याकडे काँग्रेसचे नेतृत्व होते. तो काळ काँग्रेससाठी सुवर्णकाळ होता. सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, लालबहाद्दूर शास्त्री असे एकाहून एक अमूल्य रत्ने काँग्रेसकडे होती. यांचे नेतृत्व केवळ पक्षहिताचे नव्हे, तर राष्ट्राला दिशादर्शक होते; परंतु गांधी आणि नेहरू यांच्याकडे नेतृत्व आल्यावर काँग्रेस पक्ष म्हणजे खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे वापरला गेला. स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाच्या बळावर काँग्रेसचा जनाधार अनेक वर्षे तग धरून राहिला; मात्र घराणेशाहीने काँग्रेसला कर्तृत्वहीन, नेतृत्वहीन, स्वाभिमानशून्य बनवले. एकेकाळी ज्या पक्षाचे नेते राष्ट्रहितासाठी सर्वाेच्च न्यायाला सिद्ध होत होते, त्या पक्षाच्या नेत्यांना राष्ट्रहित कशाशी खातात, याचीही जाण उरली नाही. हा सर्व घात काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे झाला, ही वस्तूस्थिती आहे. एकेकाळी देशाचे नेतृत्त्व करणार्या या पक्षाकडे सद्य:स्थितीत नेतृत्व करणारा एकही कर्तृत्ववान नेता नसावा, यापेक्षा काँग्रेसचे दुर्दैव कोणते ? सोनिया गांधी यांच्यानंतर पात्रता नसतांनाही केवळ गांधी घराण्याचे असल्यामुळेच राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले. राहुल गांधी यांचे अपयशी नेतृत्व वारंवार स्पष्ट झाल्यानंतरही काँग्रेसचे अध्यक्षपद पक्षातील कुणा कर्तृत्ववान व्यक्तीकडे देण्याऐवजी पुन्हा सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसची धुरा सोपवण्यात आली. काँग्रेससाठी ही स्थिती अतिशय लाजिरवाणी आहे. सध्या जरी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्यात आले असले, तरी त्यांची ओळख गांधी घराण्याचे ‘रबरस्टॅम्प’ म्हणून आहे, यापेक्षा काँग्रेसचे दुर्दैव ते काय ?
काँग्रेस असो किंवा घराणेशाही जोपासणारे अन्य राजकीय पक्ष असोत, ते जेव्हा कर्तृत्ववान व्यक्तीच्या हातात पक्षाची धुरा देतील, तेव्हाच ते समाजाचा आणि राष्ट्राच्या हितासाठी काम करत आहेत, असे म्हणता येईल. कोणत्या राजकीय नेत्याची पुढची पिढी कर्तृत्ववान असेल, समाजहितासाठी झटणारी असेल, तर त्यांना ‘घराणेशाही’चा स्टॅप लावून मूळीच डावलू नये; मात्र कर्तृत्ववान नसतांना, राजकीय क्षेत्राचा गंधही नसतांना केवळ स्वत:चा पाल्य किंवा नातेवाईक म्हणून त्यांना समाजावर लादणे, हा स्वार्थीपणा होय. राजकीय पक्षांमध्ये वाढता भ्रष्टाचार हे वर्षानुवर्षे चाललेल्या घराणेशाहीचेच एक फळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घराणेशाहीचा बीमोड करण्याचा सल्ला हा केवळ भाजपसाठीच नव्हे, तर लोकशाही सुदृढ होण्यासाठीही आवश्यक आहे. त्याकडे व्यापक आणि समाजहिताच्या दृष्टीने पहायला हवे.
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !