७ मे २०२५ या दिवशी भारतीय वेळ रात्री १.०५ ते १.३० या २५ मिनिटांत भारतीय सशस्त्र सेनांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानी पंजाबमध्ये आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये क्षेपणास्त्र आक्रमण करून ९ ठिकाणांवरील आतंकवाद्यांचे तळ नष्ट केले. या ९ तळांपैकी ७ तळांची माहिती आपण १३ मे या दिवशीच्या दैनिकात वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/911210.html

१. भारताने आक्रमणासाठी निवडलेल्या ९ आतंकवादी तळांविषयीची माहिती
ऐ. शवाई नाला कँप, मुझफ्फराबाद, पाकव्याप्त जम्मू : नियंत्रण रेषेपासून ३० कि.मी.वरील (मुझफ्फराबाद-नीलम रस्त्यावरील चेलाबंदी पुलाजवळील) हा आतंकवादी तळ लष्कर-ए-तोयबाचा वर्ष २००० पासूनचा एक महत्त्वाचा तळ आहे. हा तळ आतंकवाद्यांची भरती, नोंदणी आणि प्रशिक्षण यांसाठी वापरला जातो. या तळाला ‘हुजेफा-बिन-येमेन’ किंवा ‘बेत-उल-मुजाहिदीन कँप’ असेही म्हणतात. या तळावर फायरिंग रेंज, प्रशिक्षण मैदान, लष्कर-ए-तोयबा यांचे मदरसे, रहाण्यासाठी ४० खोल्या, तसेच लष्कर-ए-तोयबाचे कमांडर्स आणि प्रशिक्षक यांसाठी रहाण्याच्या सोयी आहेत. या आतंकवादी तळावर मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण दिले जाते.

ओ. सईदना बिलाल मरकझ, मुझफ्फराबाद, पाकव्याप्त जम्मू : मुझफ्फराबादच्या लाल किल्ल्याच्या समोरील सईदना बिलाल मशिदीच्या परिसरात जैश-ए-महंमदचे प्रशिक्षण केंद्र उभारले होते. जैश-ए-महंमदची धर्मादाय संस्था ‘अल-रहमत ट्रस्ट हिजामा मेडिकल थेरपी सेंटर’ चालवते. तरी वास्तविक तेथे २०० आतंकवादी रहाण्याची आणि प्रशिक्षणाची सोय येथे केलेली आहे. एका वेळी साधारण १०० प्रशिक्षणार्थी तेथे राहू शकतात. जैश-ए-महंमदच्या प्रशिक्षणाच्या व्यतिरिक्त पाकिस्तानी विशेष सैन्याचे प्रशिक्षणही तेथे दिले जाते. जैश-ए-महंमदचा पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ऑपरेशनल प्रमुख मुफ्ती असगर खान काश्मिरी हा त्या आतंकवादी तळाचा प्रमुख आहे. तो हरकत-उल-मुजाहिदीन चा सदस्य होता आणि वर्ष २००० पासून जैश-ए-महंमदचा सदस्य आहे. अब्दुल्ला जिहादी (उपाख्य अब्दुल्ला काश्मिरी) आणि आशिक नेन्गरू हेही या आतंकवादी तळावरून काम करतात. अनेक आतंकवादी या तळावरून नियमितपणे पाकव्याप्त जम्मूमधून घुसवले जातात.
अचूकपणे केलेल्या क्षेपणास्त्रांच्या आक्रमणांमुळे वरील ९ आतंकवादी तळ नष्ट झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसणार्या आतंकवाद्यांना तात्पुरता का होईना आळा बसलेला आहे. आतंकवादी आक्रमणे रोखण्याइतकेच आतंकवाद्यांना निधी रोखणे महत्त्वाचे आहे. ते करण्यासाठी आवश्यक असलेल्या राजनैतिक आणि इतर आंतरराष्ट्रीय हालचाली पंतप्रधान अन् परराष्ट्रमंत्री यांनी यापूर्वीच चालू केलेल्या आहेत. त्यांना कसे यश येते, हे आपल्याला विदेशांमधून येणार्या बातम्यांमधून वेळोवेळी कळत आहे.
२. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतरची पाकिस्तानची प्रतिक्रिया
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतरची आपल्याला समजलेली पाकिस्तानची प्रतिक्रिया, म्हणजे सीमापार गोळीबार (विशेषतः तोफखाना) अशी आहे. ती अपेक्षित आहेच; परंतु पाकिस्तान तेवढ्यावरच थांबणार नाही. भारताने केलेल्या अनपेक्षित आक्रमणाच्या उत्तरार्थ पाकिस्तान काहीतरी मोठे करू इच्छित असणार.

पाकिस्तानकडे असलेले मोठे पर्याय :
अ. भारताच्या सैनिकी तळांवर क्षेपणास्त्रे किंवा बाँब यांद्वारे आक्रमण करणे : भारताने पाकिस्तानच्या नागरी किंवा सैनिकी तळांवर आक्रमणे केलेली नसल्यामुळे तशी आक्रमणे करणे, हे आंतरराष्ट्रीयदृष्ट्या पाकिस्तानला परवडणारे नाही. हा लेख लिहीत असतांनाच भारतीय ‘प्रेस इन्फर्मेशन ब्युरो’चे एक लिखाण माझ्या वाचनात आली (भारतीय वेळ ८ मे २०२५, दुपारी २.३४ वाजता) पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अवंतीपूर, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरतला, जालंधर, लुधियाना, आधमपूर, भटिंडा, चंडीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज येथील सैनिकी तळांवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र यांद्वारे आक्रमणे केली आहेत. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणा कणखर आहे. प्रत्यक्ष हानी किती झाली, हे अहवाल आल्यावर समजेल.
भारतीय सशस्त्र सैन्य दलांनी तशाच प्रकारची आक्रमणे पाकिस्तानात केली आहेत. लाहोरची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट करण्यात आली आहे. पाकिस्तानने युद्ध वाढवले आहे. दारूगोळा संपेपर्यंत पाकिस्तान भारतातील सैनिकी तळांवर आक्रमणे करत राहील. बरेचसा दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे पाकिस्तान स्वतः निर्माण करत नसल्यामुळे पाकिस्तानला इतर देशांवर अवलंबून रहावे लागते. याखेरीज भारतीय हवाई संरक्षण यंत्रणा ‘एस्-४००’ कणखर असल्यामुळे पाकिस्तान भारतीय सैनिकी तळांची फारशी हानी करू शकणार नाही. याउलट दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे यांच्या निर्मितीमध्ये भारत बराचसा आत्मनिर्भर असल्यामुळे इतर देशांवर अवलंबून नाही. पाकिस्तानी हवाई संरक्षण यंत्रणा खिळखिळी झालेली असल्यामुळे भारत पाकिस्तानी सैनिकी तळांची मोठ्या प्रमाणात हानी करू शकेल.
आ. जम्मू-काश्मीरमधील धरणांवर बाँब आक्रमणे करणे : सिंधु जल कराराला भारताने स्थगिती दिल्यामुळे त्या नद्यांचे पाणी रोखणार्या धरणांना लक्ष्य करून पाकिस्तान बाँब आक्रमणे करण्याचा विचार करू शकतो.
आ १. धरणे फोडण्यासाठी विशिष्ट प्रकारचे बाँब मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात. पाकिस्तानकडे त्या विशिष्ट प्रकारचे बाँब आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध आहेत कि नाहीत ? याची माहिती आपल्याकडे नाही; परंतु तसे बाँब त्याच्याकडे उपलब्ध नसावेत.
आ २. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणा ‘रोबस्ट’ (मजबूत) असल्यामुळे पाकिस्तानी विमाने किंवा क्षेपणास्त्रे भारतीय धरणांची काही हानी करण्यापूर्वीच त्यांचा निःपात करील.
इ. भारताच्या शहरांवर क्षेपणास्त्रे किंवा आण्विक आक्रमणे करणे : अशी आक्रमणे करणे, हे आंतरराष्ट्रीयदृष्ट्या पाकला परवडणारे नसले, तरी तेथे नागरी नेतृत्वाऐवजी सैनिकी नेतृत्व शहरांवर क्षेपणास्त्रे किंवा आण्विक आक्रमण करण्याचे निर्णय घेते. सैनिकी नेतृत्वाने तसा निर्णय घेतला, तर पाकिस्तान भारतीय शहरांवर क्षेपणास्त्रे किंवा आण्विक आक्रमण करू शकेल. त्यामध्ये प्रथम लक्ष्य देहली आणि मुंबई ही शहरे असू शकतील.

३. भारताचा प्रतिसाद
अ. भारताचे सध्या प्रथम अण्वस्त्र न वापरण्याचे धोरण आहे. हे धोरण जरी वापरले, तरी भारत प्रतिआक्रमण करू शकतो. अण्वस्त्राच्या प्रतिआक्रमणामध्ये भारताचे लक्ष्य लाहोर आणि कराची शहरे असतील.
आ. पाकिस्तानचा संभाव्य अण्वस्त्रांचा धोका लक्षात घेता प्रथम अण्वस्त्र न वापरण्याचे धोरण भारत पालटू शकतो, विशेषतः ‘डिटरंट’ (प्रतिबंधात्मक) म्हणून ! विश्लेषणातून असे दिसते की, बहुतेक धोरण पालटण्याचा निर्णय भारतीय राजकीय नेतृत्व पुढील १-२ दिवसांत घेईल. तसे झाल्यास पाकिस्तानी सैनिकी नेतृत्वाला अण्वस्त्रांच्या वापराचा निर्णय घेणे कठीण जाईल.
इ. पाकिस्तानचा संभाव्य अण्वस्त्रांचा धोका आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र शक्तींनाही आलेला आहे. ते स्वस्थ बसणार नाहीत. तसा अण्वस्त्र धोका प्रत्यक्षात येण्यापूर्वीच त्या आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र शक्ती युद्धबंदीचा प्रयत्न करतील. (प्रत्यक्षातही युद्धविराम घोषित झाला आहे. – संकलक)
४. प्रत्यक्ष युद्ध परिस्थिती (९ मे २०२५ या दिवशी भारतीय वेळ सकाळी ७.३० वाजता)
अ. कणखर भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेमुळे पाकिस्तानने भारतीय सैनिकी तळांवर केलेल्या आक्रमणांमध्ये विशेष हानी झालेली नाही.
आ. पाकिस्तानचे एक अमेरिकन ‘एफ्-१६’ लढाऊ विमान सरगोधा विमानतळावर आणि एक ‘ए.व्ही.सी.ए.एस्.’ विमान अशी २ विमाने भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेच्या (एस्-४००) क्षेपणास्त्रांनी पाडली.
इ. भारतीय नौसेनेने कराची बंदरावर आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले.
५. निष्कर्ष
जर आंतरराष्ट्रीय दबाव आला किंवा पाकिस्तानात सत्ता परिवर्तन झाले, तर हे युद्ध थांबू शकेल.
(समाप्त)
– विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त), पुणे. (९.५.२०२५)
संपादकीय भूमिकाभविष्यात होणार्या आण्विक आक्रमणांचा सामना करण्यासाठी देहली आणि मुंबई ही शहरे सिद्ध आहेत का ? |

देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !