‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पुस्तकातून मोगलांच्या संदर्भातील धडे वगळले !

  • मगध, चंद्रगुप्त मौर्य, पुष्यमित्र शुंग आदी राजांचा इतिहास समाविष्ट 

  • १२ ज्योतिर्लिंग, चार धाम, शक्तिपीठ आदींचाही धड्यांत समावेश 

  • प्रयागराजमधील महाकुंभपर्वाचाही उल्लेख

नवी देहली – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इयत्ता ७ वीच्या पुस्तकातील मोगल आणि त्यांची राजवट यांच्याशी संबंधित धडे सरकारने वगळले. त्याबदल्यात नव्या पाठ्यपुस्तकात मगध, चंद्रगुप्त मौर्य, पुष्यमित्र शुंग, सातवाहन आदी तेजस्वी राजांच्या राजवंशावरील धड्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासह नवीन पाठ्यपुस्तकात प्रयागराज येथील महाकुंभपर्वावरील धड्याचाही समावेश करण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत हा पालट करण्यात आला आहे. एन्.सी.ई.आर्.टी.च्या अधिकार्‍यांच्या मतानुसार नवे पाठ्यपुस्तक दोन भागांत असून येत्या काही महिन्यांत त्याची छपाई करण्यात येणार आहे.

एन्.सी.ई.आर्.टी.ने वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात मोगल आणि त्यांची राजवट यांवर आधारित धड्यांतील काही भाग वगळला होता. आता मात्र त्यांवरील संपूर्ण धडेच वगळण्यात आले आहेत. आता नवा धडा सामाजिक विज्ञानाच्या पुस्तकात ‘एक्सप्लोरिंग सोसायटी : इंडिया अँड बियाँड’ या नावाने समाविष्ट करण्यात आला आहे. यासह प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत झालेल्या भव्य महाकुंभर्वाचा इतिहासही या पाठ्यपुस्तकात जोडण्यात आला आहे. या नव्या पाठ्यपुस्तकात ‘पवित्र भूगोल’ नावाचा धडा समाविष्ट करण्यात आला असून त्यामध्ये भारतातील पवित्र ठिकाणे आणि तीर्थयात्रा यांविषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये १२ ज्योतिर्लिंग, चारधाम आणि शक्तिपीठ यांविषयीच्या माहितीचा समावेश आहे. यासह सरकारी योजनांचीही माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

आतापर्यंत क्रूर मोगलांच्या धड्यांवर आक्षेप न घेणार्‍यांनी ‘शिक्षणाचे भगवेकरण होत आहे’, अशी ओरड केल्यास आश्चर्य वाटायला नको !