महिमा श्रीरामनामाचा, मनुष्यजन्माच्या उद्धाराचा !

१. श्रीरामायण हा काव्यात सांगितलेला इतिहास असून त्याला प्रमाणभूत मानावे !

‘महर्षि वाल्मिकींनी लिहिलेले श्री रामायण काल्पनिक आहे’, असे आजकालचे तथाकथित विद्वान म्हणतात. काहींना वाटते की, श्रीरामाने स्वतःला भगवान म्हटले नाही. ज्यांनी श्रीरामायण लिहिले, त्या महर्षि वाल्मिकींनी सुद्धा श्रीरामाला देवत्व दिलेले नाही किंवा त्यांनी श्रीरामाला ईश्वराचा अवतार मानले नाही.

‘श्रीरामायण’ हा काव्यात लिहिलेला इतिहास आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणाला इतिहास म्हटले आहे आणि काव्यसुद्धा म्हटले आहे. युद्धकांडाच्या शेवटच्या १२८ व्या सर्गात रामायण श्रवणाची फलश्रुती सांगताना महर्षी वाल्मिकी लिहितात,

अर्थ – वाल्मिकींनी ज्याची रचना केली, ते हे आदिकाव्य आहे. ते ऐका !

वाल्मिकी ऋषि स्वतः रामायणाला ‘काव्य’ म्हणतात. याच सर्गातील ११७ व्यास श्लोकात ते लिहितात,

श्री. दुर्गेश परुळकर

पूजयंश्च पठश्चैनमितिहासं पुरातनम् ।
सर्वपापै: प्रमुच्चते दीर्घमायुरवाप्नुयात ।।

अर्थ : जो या प्राचीन इतिहासाचे पूजन आणि वाचन करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होते.

यावरून निश्चित होते की, रामायण हे काव्य जरी असले, तरीसुद्धा तो इतिहास आहे. आपल्याच देशातीलच नव्हे, तर जगातील अनेक विद्वानांनी ‘श्रीरामायण’ हा इतिहास आहे, हे मान्य केले आहे. महर्षि वाल्मिकींनी लिहिलेले श्रीरामायण हाच श्रीरामांच्या चरित्रावरील प्राचीनतम, अधिकृत आणि विश्वसनीय असा काव्यात सांगितलेला इतिहास आहे, त्याला प्रमाणभूत, आधारभूत मानलेच पाहिजे.

२. श्रीरामायणाची महानता !

श्रीरामायण म्हणजे धर्माने अधर्मावर सुष्ट शक्तीने दुष्ट शक्तीवर आणि सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळवलेल्या विजयाचा इतिहास आहे. ‘सत्यमेव जयते’ हा वेदांनी उद्घोषलेला शाश्वत आणि आश्वासक असा सिद्धांत आहे. आपल्या देशाचे ते घोषवाक्यसुद्धा आहे. मानवाची सत्यावरील श्रद्धा जर डळमळू लागली, तर तिला स्थिर करणारी विजय गाथा म्हणजेच श्रीरामायण आहे. श्रीरामाने सदाचरणाचा वस्तूपाठ अखिल मानवजातीला घालून दिला. श्रीरामायण मानवी जीवनाचा मार्ग उजळून टाकणारा सूर्यासारखा प्रखर आणि तेजस्वी दीप आहे. या ग्रंथात सागराची गंभीरता आहे, गंगेचे पावित्र्य आहे आणि हिमालयाची उत्तुंगता आहे. हा एक अद्भुत ग्रंथ आहे.

३. राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी संत एकनाथ महाराजांनी ‘भावार्थ रामायण’ लिहिणे आणि संत तुलसीदासांनी ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ लिहिणे

 

जेव्हा जेव्हा समाजाच्या अध:पतनाची वेळ आली, तेव्हा तेव्हा आपल्या द्रष्ट्या पुरुषांनी राष्ट्र, समाज यांच्या उत्थानासाठी श्रीरामायणाची कास धरली. यवनी सत्तेच्या मगरमिठीत सापडून महाराष्ट्राचे अध:पतन होऊ लागले, तेव्हा पैठणच्या संत एकनाथ महाराजांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेतला. राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी त्यांनी ‘भावार्थ रामायण’ लिहिले. उत्तर हिंदुस्थानात यवनांनी स्वतःचे राज्य स्थापून संपूर्ण मानवी जीवन अध:पतनाच्या गर्तेत लोटले. त्या वेळी समाजात चैतन्य निर्माण करण्याच्या हेतूने संत तुलसीदासांनी ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ लिहिला. याच ग्रंथाला उत्तर हिंदुस्थानात वेदांप्रमाणे मान दिला जातो.

४. श्रीरामाच्या राज्याभिषेकाचा दिवस हिंदु राष्ट्राचा जन्मदिवस म्हणून गौरवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर !

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुस्थानच्या पारतंत्र्याच्या काळात श्रीरामाच्या राज्याभिषेकाचा दिवस हा हिंदु राष्ट्राचा जन्मदिवस म्हणून गौरवला. सावरकर म्हणतात, ‘‘अयोध्येच्या महाप्रतापी राजा रामचंद्राने लंकेत आपले विजयी पाऊल टाकले आणि उत्तर हिमालयापासून दक्षिण समुद्रापर्यंत सर्व भूमी एकछत्री सत्तेखाली आणली. त्याच दिवशी स्वराष्ट्र आणि स्वदेश निर्मितीचे जे महान कार्य सिंधूंनी अंगीकृत केले, त्या कार्याची परिपूर्ती झाली. भौगोलिक मर्यादेच्या दृष्टीने त्याने अंतिम सीमा हस्तगत केली. ज्या दिवशी अश्वमेधाचा विजयी घोडा कुठेही प्रतिरोध न होता अजिंक्य असाच अयोध्येला परत आला, ज्या दिवशी त्या अप्रमेय अशा प्रभु रामचंद्रांच्या, त्या लोकाभिराम रामचंद्राच्या साम्राज्य सिंहासनावर सम्राटाच्या चक्रवर्तित्वाचे निदर्शक असे भव्य श्वेत छत्र धरले गेले. ज्या दिवशी आर्य म्हणणार्‍या नृपश्रेष्ठांनीच नाही, तर भक्तीपूर्वक हनुमान, बिभीषण, सुग्रीम यांनीही या सिंहासनाला त्यांची भक्तीपूर्वक राजनिष्ठा सादर केली, तोच दिवस आपल्या खर्‍याखुर्‍या हिंदु राष्ट्राचा, हिंदुजातीचा जन्मदिवस ठरला. तो खरा आपला राष्ट्रीयदिन ! आर्य आणि अनार्य यांनी एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळून नवीन संघटित राष्ट्राला त्या दिवशी जन्म दिला.

(समग्र सावरकर, खंड १०, हिंदुत्व)

५. भारतियांच्या मनावर रुजलेले श्रीरामायणाचे संस्कार !

श्रीरामायणाचे संस्कार भारतीय जनतेवर किती खोलवर रुजले आहेत, त्याची साक्ष काही ऐतिहासिक घटनांमधून दिसून येते. अयोध्येवर राजा म्हणून विराजमान होण्याचा अधिकार श्रीरामाचा होता. ‘त्या राजगादीवर आपला अधिकार नाही’, असे भरत सांगतो. श्रीराम वनवासातून परत येईपर्यंत भरताने श्रीरामाच्या पादुका राज सिंहासनावर ठेवून त्याचा प्रतिनिधी म्हणून १४ वर्षे अयोध्येचा राज्यकारभार पाहिला. श्रीराम वनवासातून आल्यावर लगेच त्यांच्या हाती सत्ता सुपूर्द केली.

राजसत्ता आपल्याला प्राप्त व्हावी, यासाठी चारही भावांमध्ये साधा वादसुद्धा निर्माण झाला नाही. उलट मोठ्या भावाने राजा व्हावे, असा आग्रह तिन्ही भावांनी धरला. थोडक्यात ‘मला राज्य नको, मी राजगादीचा खरा उत्तराधिकारी नाही’, असे सांगणारे भाऊ आदर्श उभा करून समाजाला कसे वागावे, असा वस्तूपाठ घालून देतात. हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज यांचा छत्रपतीपदाचा अधिकार लक्षात घेऊन छत्रपतीपद नाकारणारे शिवपुत्र राजाराम महाराष्ट्राच्या भूमीत झाले. रामायणाचा हा संस्कार मनावर किती खोलवर रुजला आहे, याची साक्ष पटते.

(क्रमश:)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, लेखक आणि व्याख्याते

‘वाल्मीकि श्रीरामायण’ हा श्रेष्ठतम ग्रंथ लिहिणार्‍या वाल्मिकींची पूर्वपीठिका !

भारतमातेच्या कंठातील कौस्तुभ मणी म्हणजे ‘वाल्मीकि श्रीरामायण’ हा श्रेष्ठतम ग्रंथ आहे. असा हा अलौकिक ग्रंथ लिहिणारे वाल्मिकी कोण होते, याचे उत्तर आपल्याला स्कंदपुराणात मिळते. सुमती नावाचा वेदशास्त्रसंपन्न विद्वान ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव कौशिकी असे होते. त्यांना अग्निशर्मा नावाचा मुलगा होता. मुलाने वेद आणि उपनिषदे यांचा अभ्यास करावा, अशी दांपत्याची इच्छा होती; पण मुलगा कुसंगतीत वाढत होता. तो वेदांच्या अध्ययनाचा तिरस्कार करत होता. त्याची ज्ञानलालसेपेक्षा धनलालसा वरचढ ठरली. स्वार्थ, अहंकार, उर्मटपणा अशा दुर्गुणांच्या विळख्यात तो सुखाने वावरत होता. त्याला लुटमार करणे, मारामारी करणे यात आनंद मिळत होता. ‘खावे, प्यावे, मजा करावी आणि जीवन कंठावे’, असा त्याचा स्वभाव होता. त्याच्या या वर्तनाला कंटाळून माता-पित्याने घरदार सोडले आणि ते वानप्रस्थाश्रमात गेले.

अग्निशर्माला त्याचे काही वाटले नाही. त्याने विवाह केला; पण लूटमारी, मारामारी थांबली नाही. एकदा त्याने वनातून जाणार्‍या सप्तऋषींना लुटण्यासाठी अडवले. ऋषिगणांचे प्रमुख अत्रिऋषी होते. त्यांनी त्याला उपदेश केला, त्याच्या या दुष्कृत्याचे फळ त्याला एकट्यालाच भोगावे लागणार. त्याच्या या पापाचे कुणीही वाटेकरी होणार नाही, याची जाणीव त्याला करून दिली. त्याला अनुभूती आली ! आता अग्निशर्मा पश्चातापाच्या अग्नीत होरपळू लागला. त्याला जगणे अशक्य वाटू लागले. अत्रिऋषींनी त्याला मार्गदर्शन केले आणि रामनामाचा जप अखंड करायला सांगितला. ऋषिगण त्यांच्या मार्गाने निघून गेले.

अत्यंत श्रद्धापूर्ण अंतःकरणाने त्याने अखंड रामनामाचा जप केला. अनेक वर्षे तो नामजपात रंगून गेला. त्याच्या अंगावर वारुळ तयार झाले; पण त्याची त्याला जाणीव नव्हती. त्याच सप्तऋषींचा समूह त्याच मार्गाने पुन्हा जात असतांना त्यांना ‘श्रीराम’ असा जप कुणीतरी करत असल्याचा आवाज ऐकला. त्यांनी आवाजाच्या दिशेने शोध घेतला; तेव्हा त्यांना वारुळातून रामनाम ऐकू येत असल्याचे जाणवले. त्यांनी वारूळ हलकेच दूर केले. आत अग्निशर्मा पद्मासनात ध्यानस्थ बसला होता. त्याच्या मुखातून अखंड श्रीरामाचे नाव बाहेर पडत होते. अत्रिऋषींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला सावध केले. सावध होताच त्याने अत्रिऋषींसह सर्व ऋषींना नमस्कार केला. वारुळातून बाहेर आलेल्या अग्निशर्माला अत्रिऋषी म्हणाले, ‘‘अनेक वर्षे ‘श्रीराम’ हा अखंड जप केल्यामुळे तुझे सर्व पातक नष्ट झाले आहे. आता तुझा नवा जन्म झाला असे समज. तुला आम्ही वारूळातून बाहेर काढले; म्हणून ‘वाल्मिकी’ या नावाने तू ओळखला जाशील.’’

अशा प्रकारे लुटारू अग्निशर्मा रामनामाने शुद्ध, पवित्र, सात्त्विक आणि तपस्वी झाला अन् महर्षि वाल्मिकी या नावाने जगात प्रातःस्मरणीय ठरला.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर