नुकताच गुढीपाडवा झाला; परंतु तरीही काही द्वेषमूलक संदेश समाजमाध्यमात फिरत असतात. ‘भगवी पताका हीच आमुची खरी गुढी, आता नाही लटकवीणार घरावर साडी, अशुभ आहे हो तो उलटा तांब्या… मयतालाच लागतात कडुंनिबाच्या फांद्या, तिरडीला बांधतो एंरडाची काठी, सोडा मायबापहो हे फक्त आपल्या शंभूराजासाठी, चला या वर्षापासून आपण सर्व भगवा झेंड्याची गुडी उभारूया !’, असे अत्यंत हिंदुद्वेषी आणि जातीद्वेषमूलक लिखाण सामाजिक माध्यमावर फिरत असते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूच्या सहस्रो वर्षे आधीपासूनच गुढीपाडवा साजरा केला जातो. प्रभु श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हापासून गुढ्या उभारणे, तोरणे लावणे, ही हिंदु परंपरा आहे. ती बंद पाडण्याचे धोरण संस्कृती विध्वंसक जोपासत आहेत. याला काय म्हणावे ?
गुढीपाडव्याचा उल्लेख केवळ रामायण आणि महाभारत यांमध्येच नाही, तर संत ज्ञानेश्वरांनीही ‘ज्ञानेश्वरी’मध्येही गुढीविषयी स्पष्टपणे केला उल्लेख केला आहे. ‘ज्ञानेश्वरी’मध्ये त्यांनी शेती, ऋतूचक्र आणि सण यांचा परस्पर संबंध सांगतांना गुढीपाडव्याचा उल्लेख केला आहे. वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळावरसुद्धा गुढी उभारली जाते. ‘गुढीपाडव्याला विरोध म्हणून भगवा झेंडा उभारा’, असे म्हणणे, म्हणजे हिंदूंची दिशाभूल करणे आहे. त्यांचा मूळ कावा हिंदूंच्या प्रत्येक सणाला विरोध करणे, हाच आहे. भगव्या झेंड्याच्या आडून ते गुढीपाडवा ही सहस्रो वर्षांची परंपरा आहे, त्याला बंद पाडण्याचा घाट घालत आहेत. त्यासाठी त्यांनी भगवा ध्वज आणि साक्षात् छत्रपती शंभूराजांनाच पुढे केले आहे ! भगवा ध्वज हा हिंदवी स्वराज्याचे प्रतीक आहे आणि तो ३६५ दिवस आपल्या घरावर फडकू द्या; किंबहुना भगव्या ध्वजाला सांभाळण्यासाठीच गुढीपाडवा आहे, भगव्या ध्वजाचे, म्हणजेच विजयश्रीचे प्रतीक म्हणजे गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा केवळ विजयश्रीचा सण नाही, तर त्याला अनन्यसाधारण असे आध्यात्मिक महत्त्व आहे आणि म्हणूनच गुढीपाडव्याला गुढीला विरोध म्हणून केवळ भगवा ध्वज उभारण्याचे आवाहन करणे, हा निव्वळ हिंदुद्वेष आहे. गुढी ही साधू-संतांनीही उभारली आहे. शालिवाहनांनी शकांवर मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ गुढ्या उभारल्या होत्या. शिवछत्रपतींच्या, थोरले शाहू महाराजांच्या काळातही गुढीपाडवा तिथीचा उल्लेख मिळतो. कलश अशुभ नसून तो चैतन्याचा स्रोत आहे. म्हणून खरा इतिहास तपासून या जातीद्वेषमूलक प्रसाराचा निषेध करून हिंदूंनी धर्मशास्त्रालाच धरून रहाणे, हीच जात्यंधांना चपराक आहे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे