मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ प्रथम कोल्हापूरला होण्यासाठी प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केले स्पष्ट

मुंबई – कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, ही गेल्या ३० वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. प्रथम कोल्हापूरला खंडपिठास मान्यता द्यावी आणि त्यानंतर पुणे येथील खंडपिठाचा विचार करावा, अशी विनंती राज्यशासनाने मुंबई उच्च न्यायालयास यापूर्वीच केली आहे. तरीही पुन्हा एकदा उच्च न्यायालयास कोल्हापूर खंडपीठ प्रश्नी विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या चालू असलेल्या अधिवेशनात ७ मार्च या दिवशी स्पष्ट केले.

‘मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे व्हावे’, अशी मागणी काही लोकप्रतिनिधी सभागृहात करत होते. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरील भूमिका स्पष्ट केली.

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावे, यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ६ जिह्यांतील अधिवक्ता गेल्या ३० वर्षांपासून लढा देत आहेत. विविध मार्गाने या मागणीकडे राज्यशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न अधिवक्ता संघटना आणि पक्षकार करत आहेत. कोल्हापूर खंडपिठाविषयी महायुती सरकारने यापूर्वीच मंत्रीमंडळात ठराव घेतला आहे. ‘प्रथम कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करावे, त्यानंतरच पुण्याचा विचार करावा’, अशी विनंती मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांना करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.